Category: ठाणे

Thane news

मुंब्रा येथे कपड्याच्या दुकानाला आग

आगीत दोन दुकानांमधील वस्तू खाक मुंब्राः येथील दोन कपडे विक्रीच्या दुकानांना लागलेल्या आगीत दुकानातील कपडे तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या.मुंब्रा शहरातील कौसा भागातील नशेमन काँलेनी परीसरातीलएका एका  हाँटेलच्या जवळ असलेल्या दहा बाय दहा फूट आकाराच्या कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि  मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी एक फायर आणि दोन हायराईज फायर वाहनांच्या मदतीने अल्पावधित  आग पूर्णपणे विझवली.या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु भाडेतत्वावर दुकान चालवत असलेल्या अब्दुल लतिफ आणि मोहम्मद शेख या दोघांच्या  दुकानातील कपडे,कपाट,विद्युत वायरींग,वातानाकुलित यंत्र(एसी) पूर्णपणे जळून खाक झाले असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. दरम्यान सदरच्या दुकानांमधील आग शाँर्टसर्किटमुळे लागल्याची तसेच दोन  दुकानांमधील लाकडी पार्टिशनमुळे ती दुस-या दुकानामध्ये पसरल्याची माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे स्थानक प्रमुख एन.वाय.शिंदे यांनी दिली.

ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज

ठाणे : ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिस वरून वळसा मारून शिवाजी मैदान अशी रॅली काढून शक्ती प्रर्दशन केले. ठाणे  लोकसभा  मतदार संघातून उद्धव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे अकरा वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील  समाधीस्थळाला भेट देऊन त्यांचे आर्शिवाद घेतले.त्यानंतर  त्यानंतर  तेथूनच  एक   रॅली काढण्यात आली.या रॅलीत  जांभळी नाका परिसरात  शिवसेनानेने  युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, हे सामील झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते.या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते. दुपारी साडे बारा च्या मुहुर्तावर विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे, मुलगी लतिका विचारे, धनश्री विचारे हे उपस्थित होते.

शाळांमधून मतदानाविषयी जनजागृतीपर उपक्रमांचे उत्साही आयोजन

ठाणे : 25 ठाणे सार्वत्रिक लोकसभा २०२४ ची निवडणूक 20 मे रोजी होत असून या निवडणुकीच्या मतदार जागृतीसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासोबतच मुलांमार्फत पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन स्तरावरही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये – आईबाबांस मतदान करण्याविषयीचे पत्रलेखन, मतदानाचा संदेश प्रसारित करणारी चित्रकला आणि रांगोळी रेखाटन, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंधलेखन, गायन, प्रभातफेरी, पथनाटय असे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय शाळांमध्ये पालकसभा आयोजित करून त्याठिकाणीही पालकांना मतदानाचे महत्व विशद करीत लोकसभा निवडणूकीत मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा आणि त्यालगतच्या परिसरातील नागरिकांचेही प्रबोधन करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळाशाळांतील विद्यार्थ्यांनी केला. हे नानाविध उपक्रम महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी श्रीम अरूणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील 174 शाळा आणि 39 कनिष्ठ महाविद्यालये याठिकाणी बेलापूर, शिरवणे, तुर्भे आणि वाशी या केंद्रांचे केंद्र समन्वयक श्रीम.रेखा पाटील, श्री.सागरनाथ भंडारी, श्रीम. जयमाला पाटील आणि श्री.प्रशांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

सह्याद्रीच्या अंतरंगाची वेगळी ओळख करून देणा-या सदाशिव टेटविलकर लिखित ‘सह्याद्री परिक्रमा’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

ठाणे : सह्याद्रीचे अभेद्य कवच असल्यामुळेच इथल्या पर्यावरणाची जपणूक झाली व निसर्गसंपन्नता वाढली. सह्याद्रीच्या डोंगरद-यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकारण्यात बहुमोल योगदान दिले. अशा सह्याद्रीचे विलक्षण आकर्षण माझ्यासह प्रत्येकाला वाटते. त्यामुळे इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या 4 मित्रांसह 40 वर्षांपूर्वी केलेली सह्याद्री पदभ्रमणाची पुस्तकरूपात प्रकाशित होत असलेली मोहीम सह्याद्रीच्या अंतरंगाची अधिक माहिती करून देणारी व त्याच्याविषयीची ओढ अधिकच वाढविणारी असल्याचे मत उद्योजक रविंद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. ठाणे येथील शिवसमर्थ विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित व श्रीकृपा प्रकाशन प्रकाशित ‘सह्याद्री परिक्रमा’ या पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रविंद्र प्रभुदेसाई बोलत होते. याप्रसंगी शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक प्रदीप केळकर, ज्येष्ठ संपादक मिलींद बल्लाळ, आनंद विश्व गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते. लेखणीतील सातत्य हे टेटविलकरांचे वैशिष्ट्य असून त्यांची 13 पुस्तके इतिहासाच्या अनेक दुर्लक्षित घटकांकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतात असे सांगत रविंद्र प्रभुदेसाई यांनी विविध उत्पादनांतून पितांबरी उद्योगसमुह कार्यरत  असताना त्यात सेवाभावी दृष्टीकोन जपण्यामुळे समाजाचे ऋणमुक्त होण्याचे समाधान लाभते असे मत मांडले. विक्रमवीर गिर्यारोहक प्रदीप केळकर यांनी सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य कर्तृत्व गाजविणारे सदाशिव टेटविलकरांचे व्यक्तिमत्व आम्हां दुर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत सह्याद्रीची परिक्रमा हे त्यांचे पुस्तक भटक्यांचा मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले. सह्याद्रीने आम्हाला माणुसकी शिकवली असे सांगून त्यांनी आपण निसर्ग वाचवायला शिकले पाहीजे हे अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. ज्येष्ठ संपादक मिलींद बल्लाळ यांनी साध्यासोप्या शैलीत इतिहास मांडणा-या टेटविलकरांच्या लेखनशैलीचे कौतुक करीत स्थानिक इतिहास जपण्यासाठी डॉ. दाऊद दळवी, सदाशिव टेटविलकर अशा व्यक्तींनी केलेल्या ठोस स्वरूपाच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. ठाण्यात वस्तुसंग्रहालय उभे राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने आपण प्रयत्नरत असल्याचे सांगत नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी असून त्यांनी मुलांना मॉलऐवजी म्युझियमची सफर घडवावी असा पर्याय त्यांनी सांगितला. आनंद विश्व गुरूकुलचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी 50 वर्षांपासूनच्या टेटविलकरांशी असलेल्या मैत्रीच्या आठवणींचा पट खुला करीत साधेपणा आणि सहनशीलता हा त्यांचा महत्वाचा गुण असल्याचे सांगितले. लेखक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या मनोगतात 1983 मध्ये 4 मित्रांसह केलेल्या सह्याद्री परिक्रमेच्या आठवणी सांगताना दुर्गप्रेमी गो.नी.दांडेकर यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रोत्साहक वरदहस्त याचा विशेष उल्लेख केला. 40 वर्षांपूर्वी प्रवासाची वा संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी परिक्रमा करताना द-या, खो-या, जंगल, डोंगरवाटा पार करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याच्या चित्तथरारक आठवणी त्यांनी सांगितल्या. सह्याद्रीच्या द-याखो-यातील माणसांनी ‘अतिथी देवो भव’ म्हणत केलेल्या सहकार्याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. सीमा टेटविलकर – कोंडे यांनी भावना व्यक्त करताना आपल्या वडिलांनी केलेल्या साधेपणाच्या संस्कारांचा आवर्जून उल्लेख करीत त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपसुक तयार झाला आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची जडणघडण होत गेली असे सांगितले. लहानपणापासून वडिलांनी फिरायला नेले ते किल्ल्यांवरच हे सांगताना त्यांनी सह्याद्री भ्रमणासाठी मित्रांसह बाहेर पडलेल्या वडिलांनी तिथून पाठवलेल्या खुशालीचे पत्र आल्यानंतर आईला झालेल्या आनंदाचे वर्णन केले. महेंद्र कोंडे यांनी ओघवते सूत्रसंचालन केलेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी लेखक सदाशिव टेटविलकरांसोबत सह्याद्री परिक्रमेत सहभागी झालेले त्यांचे मित्र सुभाष मांडले तसेच पुस्तक निर्मितीत सहकार्य करणारे पद्माकर शिरवाडकर व सरिता जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कोकण इतिहास परिषदेच्या सचिव विद्या प्रभू व पदाधिकारी भारती जोशी तसेच रसिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

‘आरटीई’त मिळणारे मोफत शिक्षण खासगी इंग्रजी शाळांमधून बंद

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी वेधले लक्ष ठाणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधून गरीब मुलांना मिळणारे मोफत शिक्षण यंदाच्या वर्षापासून बंद झाले आहे. या निर्णयामुळे गरीब मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमधून मिळणाऱ्या मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रश्नाची दखल घेऊन भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन दिले. तसेच खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण कायम ठेवण्याची मागणी केली आहे. या वेळी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचीही उपस्थिती होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २००९ पासून मुलांना मोफत शिक्षण दिले जात होते. मात्र, या वर्षी बदललेल्या नियमानुसार `आरटीई’मध्ये महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. तर खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्यात आल्या आहेत. त्याचा फटका इंग्रजी शिक्षणासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या प्रश्नावर पालकांच्या भावना तीव्र असून, राज्य सरकारने पूर्वीच्या नियमांप्रमाणेच `आरटीई’मधून गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण द्यावे, अशी मागणी अनेक पालकांनी माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या निर्णयामुळे राज्यभरात शेकडो गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना इंग्रजी शिक्षण मिळण्यास अडचणी येणार आहेत. काही जणांना नाईलाजाने इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, याकडे श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. या प्रश्नावर निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

‘स्वच्छ सर्वेक्षणमधील उद्दिष्टपूर्ती साधणे हे सगळ्यांचे कर्तव्य’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन स्वच्छ सर्वेक्षण २०२४ साठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून काम करण्याचे निर्देश ठाणे : स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत साध्य करायची सगळी उद्दिष्ट ही महापालिका म्हणून आपली प्राथमिक कर्तव्य आहेत. त्यामुळे ती साध्य करण्यासाठी संपूर्ण महापालिकेने एक टीम बनून योग्य रणनीती आखून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. त्याची माहिती देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकाऱ्यांचे क्षमता वृध्दी सत्र महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये, ठाणे महापालिकेने २०२३मध्ये केलेली कामगिरी, त्यातील त्रुटी, सुधारणा यांची माहिती देण्यात आली. तसेच, २०२४साठी अपेक्षित असलेली उद्दिष्ट, त्यासाठी तयारी, जनजागृती आणि लोक सहभाग याबद्दल सविस्तर सादरीकरण घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले. प्रास्ताविक उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला केंद्र सरकारने शास्त्रोक्त स्वरूप दिले आहे. इंदोर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड आदी ठिकाणी त्यांचे सकारात्मक परिमाण दिसले आहेत. तेथील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्या महापालिका क्षेत्रात त्यातील कोणत्या गोष्टी घेता येतील याचा अभ्यास करण्याच्या सूचना या सत्रात आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. या अभियानात चांगले गुण मिळवणे हे एक प्रमुख साध्य आहेच, परंतु, या सगळ्या गोष्टी नागरिकांचे जीवनमान उंचावण्याशी निगडित आहे. महापालिकेची जी प्राथमिक जबाबदारी आहे तीच या अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. सहायक आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्या टीमने काम करावे. मुख्यालयातून त्यासाठी आवश्यक धोरण ठरवले जाईल. त्याशिवाय, स्थानिक पातळीवर नावीन्यपूर्ण उपक्रम करावेत, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यासाठीच, प्रभाग समिती स्तरावर स्वच्छ वॉर्ड ही स्पर्धाही आयोजित केली जात असल्याची घोषणा यावेळी आयुक्त राव यांनी केली. त्यावेळी, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, दिनेश तायडे, वर्षा दीक्षित, सर्व सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी दोन उमेवारांचे अर्ज

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या 20 मे 2024 रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री राजन बाबुराव विचारे व ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत 21 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. यात अपक्ष 10, दिल्ली जनता पार्टी 3, लोकराज्य पक्ष 1, हिंदू समाज पार्टी 3, धर्मवीर आनंद दिघे साहेब विचार आणि सेवा मंच 1,बहुजन समाज पार्टी 2, भारतीय राष्ट्रवादी पार्टी 1 आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.

ठाकरे गटाच्या मढवींना पोलीस कोठडी

ठाणे : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एम के मढवी आणि अनिल मोरे यांना खंडणी विरोधी पथकाकडून त्यांना अटक करण्यात…

ठाण्यात कोण ? सस्पेंस कायम

ठाणे: एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेंस रविवारीही कायम राहीलाय. अवघ्या २२ दिवसावर मतदान येऊन ठेपलेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे यांनी…

पावसाळ्यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण करण्याचे निर्देश

उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि ठेकेदारात बैठक उल्हासनगर – महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या एकून घेतल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश देऊन यापुढे रस्ते न खोदण्याच्या सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात कंत्राटदार व ठेकेदार असोसिएशनची बैठक बोलाविली होती. पावसाळा तोंडावर आला असून त्यापूर्वी शहरातील विकास कामे पूर्ण करा. असा सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला केले. तसेच त्यांच्या समस्या एकून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापालिका बांधकाम विभागामार्फत रस्त्याची तर पाणीपुरवठा विभागामार्फत मलनिस्सारण योजनेची कामे सुरू आहेत. दोन्ही विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून कामे केल्यास समस्या निर्माण होणार नाही. असा सल्ला महापालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना आयुक्त शेख यांनी दिला. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत करण्यात यावीत, तसेच नवीन खोदकाम करण्यात येवू नये, रस्त्यावर धूळ होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, नागरिकांना वाहतूक कोंडीची त्रास होणार नाही. यासह दक्षता व सुरक्षा विषयक साधनांचा वापर करावा. अशा सूचना यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. महापालिका ठेकेदाराच्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांनी ठेकेदारांच्या समस्यांबाबत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त किशोर गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण शेवकानी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लडाख, सोनु खटवाणी, शशी जगत्यांनी, प्रभु चंद्राणी यांच्यासह अन्य ठेकेदार उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार असेही आयुक म्हणाले.