Category: ठाणे

Thane news

रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथके नेमण्यात यावीत

रोकड वाहतूक रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांचे निर्देश ठाणे : मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलगाड्यांमधून निवडणुक काळात रोख रक्कमेची वाहतूक होण्याची शक्यता व्यक्त करत असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीफची कुमक वाढवावी, अशी सुचनाही त्यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना आणि राहील गुप्ता उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या लोकसभा मतदारसंघातील निवडणूका नि:पक्षपातीपणे, शांततेत आणि भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे. सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय ठेवावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी बैठकीत दिले. मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात रेल्वे स्थानके आहेत. लोकल सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रोकडची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत रेल्वे स्थानकांवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याची सूचना निरिक्षकांनी बैठकीत केली. मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले. भिवंडी, ओवळा – माजिवडा हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले.

३७वी श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धा

आर्यनचे बळींचे सप्तक ठाणे : आर्यन दलालच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्यामुळे यजमान स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने सलग दुसरा मोठा विजय मिळवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धे च्या बाद फेरीत स्थान मिळवले. आर्यनने सात बळी मिळवत मुंबई क्रिकेट अकॅडमीला अवघ्या ४९ धावांवर गुंडाळल्यावर यजमानांनी ४.२ षटकात एका फलंदाजांच्या मोबदल्यात ५३ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा यजमानाच्या कर्णधाराचा निर्णय आर्यनने  एकदम सार्थ ठरवला. आर्यनने केवळ १९ धावांच्या मोबदल्यात सात फलंदाजाना माघारी पाठवले. आर्यनच्या गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या दोघांच फलंदाजांना दुहेरी धावांचा पल्ला पार करता आला. विक्रम पैच्या १४ आणि अक्षत कांबळेच्या १० धावांमुळे मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या खात्यात बऱ्यापैकी धावा जमा झाल्या. त्यांनतर शंकर सुब्रमणियमने १० चेंडूत तीन चौकार मारत नाबाद १६ धावा केल्या. तर पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या अथर्व अधिकारीने १३ चेंडूत पाच चौकारासह नाबाद २४ धावांची खेळी केली. संक्षिप्त धावफलक : मुंबई क्रिकेट अकॅडमी : १२ षटकांत सर्वबाद ४९ ( विक्रम पै १४, अक्षत कांबळे १० , आर्यन दलाल ४-१-१९-७, यश जठार ३-०-१२-२, तुषार कार्विझया २-०-६-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : ४.२ षटकात १ बाद ५३ (शंकर सुब्रमणियम नाबाद १६, अथर्व अधिकारी नाबाद २४, शिवेन मिश्रा २-०-१९-१).

ठाण्यात विचारेंनी अर्ज घेतला: महायुतीत अजुनही सस्पेंस

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमका कोण उमेदवार उभे राहणार याबाबत अद्यापही संस्पेंस कायम आहे. एकीकडे राजन…

ईव्हिएमवर ठाण्यात साप तर नांदेडमध्ये कुऱ्हाड !

ठाणे : शुक्रवारचा दिवस ईव्हिएमचा होता. एकीकडे सुप्रीम कोर्ट ईव्हिएमवर विश्वास दाखवित असतानाच आज नांदेडमध्ये एका एमए झालेल्या युवकाने मतदान सुर असताना कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएमचे दोन तुकडे केले तर…

पाणपोईसाठी बाजारात रांजणच मिळेना

ठाणे : वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी ठाणे पालिकेने पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शहरात १५० तात्पुरत्या पाणपोई उभारण्याचे नियोजन आखले आहे. त्यापैकी तीन पाणपोई उभारल्या आहेत; मात्र इतर ठिकाणी पाणपोई उभारण्यासाठी आवश्यक असलेले रांजणच बाजारात उपलब्ध नसल्यामुळे पाणपोई उभारायची कशी, असा पेच पालिका प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. दिवसेंदिवस ठाणे शहराच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यात शहरातील उष्णतेचा पार ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे याची दक्षता घेत ठाणे पालिकेने नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून १५० ठिकाणी पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. त्यापैकी ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू केली आहे. पाणपोईसाठी आणखी २५ ठिकाणांची निवड पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केली आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर पालिकेने चर्चा सुरू केली आहे. या संस्थांही पाणपोई उभारणीसाठी पुढे येत आहेत. बाजारात छोटी मडकी उपलब्ध आहेत; मात्र पाणपोईसाठी १०० ते ७५ लिटरच्या रांजणची आवश्यकता आहे, ते बाजारात उपलब्ध होत नसल्याने पालिकेपुढे पाणपोई उभारणीचा पेच निर्माण झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. पाणपोई आहे; पण पाणीच नाही सध्याच्या घडीला ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू केली आहे. त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्थांमार्फत करण्यात येत आहे. अशातच ठाणे स्थानकात १०० लिटरचे रांजण ठेवून पाणपाई उभारण्यात आली आहे; मात्र त्यात पाणीच उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेमार्फत जनजागृती तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका, काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायर्नमेंट ॲण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी उष्माघात, लक्षणे, घ्यायची काळजी यांची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे.

उल्हासनगर महापालिकेचे माझी वसुंधरा अभियान

उल्हासनगर : महापालिका पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांचे शिक्षक यांना पर्यावरण दुत म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली. उल्हासनगर महापालिका पर्यावरण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर व प्रदुषणमुक्त व्हावे, यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी दिली. महापालिका महासभा सभागृहामध्ये शुक्रवारी महापालिका शाळांतील शिक्षक प्रतिनिधी यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. प्रशिक्षणानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील विविध कृतीमधुन पर्यावरणाविषयी जनजागृतीचे धडे देणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक, पालकांमार्फत त्यांचे आप्तेष्ट शेजारी आदींना जनजागृती होण्यास मदत होणार आहे. असे आयुक्त अजीज शेख म्हणाले. शिक्षक हे पर्यावरण दुत म्हणून महत्वाचा घटक असुन प्रशिक्षण कार्यक्रमा नंतर ३७ शिक्षकांना पर्यावरण दूत म्हणून घोषित करुन प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे. पर्यावरण प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. सिमा कांबळे, प्राचार्य डी.डी. विपुते आदींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरण विभागामार्फत इन्फिनिटी रिलेशन्स या संस्थेमार्फत करण्यात आले होते. तथापि, सदर कार्यक्रमासाठी पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत, जनसंपर्क अधिकारी, छाया डांगळे आदीजन उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील तिन्ही लोकसभांच्या उमेदवारीसाठी १३४ उमेदवारी अर्ज वाटप

दोघांची उमेदवारी दाखल ! ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभेच्या उमेदवारी (नामनिर्देशन) अर्जाचे  तेथील कार्यालयांमधून वाटप केले जात आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ठाणे लोकसभेसाठी ४३ अर्ज, तर कल्याणसाठी ३७,आणि भिवंडी लोकसभेच्या उमेदवारीसाठी ५४ अर्ज आदी मिळून आजच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याभरातून १३४ उमेदवारी अर्जांचे वितरण ठिकठिकाणच्या निवडणूक कार्यालयातून झाले आहे. इच्छुकांकडून अर्ज घेऊन जाण्याची संख्या अधिक असूनही त्यापैकी आज फक्त् दोन जणांचे उमेदवारी अर्ज कल्याणला जमा करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह इच्छुक अपक्षांनी आजच्या पहिल्या दिवशी मात्र उमेदवारी अर्ज घेऊन जाण्याची भूमिका पार पाडली आहे. तर कल्याणमध्ये दाेघांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) या पक्षाकडून सुशिला कांबळे यांच्यासह राईट टू रिकॉल पार्टीचे अमित उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लाेकसभेच्या निवडणुकसाठी आज दाखल झाला, असे निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी सांगितले. यासह आज दिवसभरात या कल्याण लाेकसभेसाठी दिवसभरात ३७ उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात ओले आहेत. यामध्ये अपक्षांकडून १६ अर्ज घेण्यात आले आहेत. तर शिवसेना, बहुजन समाज पार्टीने (आंबेडकर), पिपल्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर बहुजन समाज पार्टीच्या प्रतिनिधीने तीन आण दलित पँथरच्या प्रतिनिधीने दाेन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. याशिवाय लोकराज्य पार्टी, राईट टू रिकाॅल पार्टी, राष्ट्रीय किसान बहुजन एसपार्टी आणि बहुजन मुक्ती पार्टी आदी पक्षांच्या प्रतिनधीने प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज घेतल्याची नाेंद भिवंडी लाेकसभेच्या उमेदवारीसाठी आज सर्वाधिक म्हणजे ५४ उमेदवारी अर्ज गेले आहेत. यामध्ये भाजपाकडून तीन अर्ज नेण्यात आलेले आहेत. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सात अर्ज, धनवान भारत पार्टीने एक अर्ज, सायुंकत भारत पक्षाकडून एक, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीने चार, राष्र्टवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाच अर्ज नेण्यात आलेले आहे. याप्रमाणेच पिल्पलस पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी तीन, किसान पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी प्रत्येकी एक अर्ज, लोकराज्य पार्टीकडून दाेन तर अपक्षांकडून २६ अर्ज नेण्यात आले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ४३ उमेदवारी अर्ज संबंधिताना वितरीत करण्यात आले, असे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी सांगितले. यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चार उमेदवारी अर्ज आज घेतले आहे. तर पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकने तीन अर्ज घेतले. याप्रमाणेच बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, संयुक्त भारत पक्ष, रिपब्लिकन बहुजन सेना, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय जवान किसन पार्टी आदी पक्षांच्या इच्छुकांनी प्रत्येकी दाेन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर भारतीय राजनिती विकास पार्टी, आम आदमी पार्टी, भूमिपूत्र पार्टी, बहुजन शक्ती, हिंदुस्थान मानव पक्ष आदी पक्षांच्या इच्छुकांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज घेतलला आहे. या छाेट्यामाेठ्या राजकीय पक्षांप्रमाणेच अपक्ष उमेदवारांनी तब्बल १९ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

‘दोस्तीका’ गठबंधनाची स्टिकर्स झळकली

टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर – ओमी कलानी यांनी महायुतीतील कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. दोस्तीच्या या पाठिंब्यामुळे शिवसेना वगळून महायुतीतील घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच, उल्हासनगरातील टीम ओमी कलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची स्टिकर्स झळकली आहेत. या स्टिकर्सचे अनावरण करतानाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्याची प्रतिक्रिया डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तीन चार दिवसांपूर्वी कलानी महलवर झालेल्या टीम ओमी कलानीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दोस्तीच्या भावनेतून महाविकास आघाडीचा भाग असलेल्या कलानी परिवाराने डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. तेंव्हा ओमी कलानी हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असल्याची शाबासकी डॉ. शिंदे यांनी दिली होती.याच मेळाव्यात डम्पिंग ग्राउंड, भूमिगत वाहनतळ, दफनभूमी, धोकादायक इमारत, उत्तर भारतीय भवन, म्हारळ गाव ते वडोल गाव उन्नत महामार्ग अश्या सहा समस्या सोडविण्या संबंधी गॅरंटीची मागणी टीओकेकडून मनोज लासी यांनी केली. पेट्रोल पंपावर बॅनर लावून जे गॅरंटी देतात त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, आमचा विश्वास फक्त खासदार श्रीकांत शिंदेंवर असल्याची टिका मोदी यांचे नाव न घेता टीका टीओके प्रवक्ता कमलेश निकम यांनी केली होती. याबाबतची नाराजी महायुतीतील भाजप, रिपाई आठवले गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी व्यक्त करीत महायुतीच्या जव्हार हॉटेल येथे पार पडलेल्या समन्वय बैठकीत टिओकेचा बॉयकॉट केला होता. यावरून मास मीडियावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी आमनेसामने आले होते. दरम्यान टीओकेच्या मेळाव्याला काही दिवस झाले असतानाच टीम ओमी कलानी-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दोस्तीका गठबंधनाची 5 हजार स्टिकर्स झळकली आहेत. कारच्या मागील काचेवर ही स्टिकर्स चिकटवण्यात येणार आहेत. त्यावर डॉ. श्रीकांत शिंदे,ओमी कलानी या दोघांची फोटो असून धनुष्यबाण ही निशाणी दिसत आहे. डॉ. शिंदे यांनी या स्टिकर्सचे अनावरण त्यांच्या डोंबिवली निवासस्थाना समोर केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, टीओकेचे कमलेश निकम, मनोज लासी, नरेंद्रकुमारी ठाकूर, अजित माखिजानी, संतोष पांडे, अवि पंजाबी, सुंदर मुदलियार आदी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६१३ योजनांची कामे पूर्ण – डॉ.  भरत बास्टेवाड

अलिबाग :जल जीवन मिशन अंतर्गत ६१३ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पुढील महिनाभरात ४९ योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी व्यक्त केले आहे. रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४९६ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४० योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला आहे. जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. या योजनेच्या माध्यमातून १५ तालुक्यांमध्ये १ हजार ४९६ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ६१३ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.

ठाणे मतदारसंघात पहिल्या दिवशी ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

१ मेला अर्ज स्वीकारले जाणार नाहीत –  अशोक शिनगारे अशोक गायकवाड ठाणे :नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम तारीख ३ मे असून नामनिर्देशन पत्रांची छाननी  ४ मेला करण्यात येणार आहे. उमेदवारी  अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ६ मे आहे. शनिवार,२७ एप्रिल,  रविवार,२८ एप्रिल  व  बुधवार १ मे २०२४ महाराष्ट्र  दिन या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २० मेला होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी काल सकाळी १० वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरूवात झाली. काल दूपारपर्यंत एकूण ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती २५ ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली. २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. सकाळी १० वाजल्यापासून विविध पक्षाच्या उमेदवारांच्या २५ प्रतिनिधींनी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी हजेरी लावली होती. दुपारपर्यत एकूण ४३ नामनिर्देशनपत्र देण्यात आले. यात भारतीय राजनिती विकास पार्टी १, आम आदमी पार्टी १, अपक्ष १९, भूमीपुत्र पार्टी १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी २, बहुजन शक्ती १, संयुक्त भारत पक्ष ३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन बहुजन सेना २,  पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ३, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी २, बहुजन मुक्ती पार्टी २, भारतीय जवान किसन पार्टी २ आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.