Category: ठाणे

Thane news

वैशाली दरेकर यांना पक्षाकडून एबी फॉर्म

मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा फॉर्म देण्यात आला असून येत्या मंगळवारी 30 एप्रिलला दरेकर या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पक्षाकडून शुक्रवारी एबी फॉर्म देण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडून हा एबी फॉर्म देण्यात आला आहे. यावेळी मातोश्रीवर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. 30 एप्रिलला वैशाली दरेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली, तसेच त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी आपल्या प्रचारास देखील सुरवात केली आहे. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा कधी होते याची सर्वच वाट पाहत आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी येथे देखील उमेदवारांचे अर्ज दाखल करताना महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून त्याची आखणी पक्षाकडून केली जात आहे. आता महाविकास आघाडी येत्या 30 तारखेला कशा प्रकारे शक्तिप्रदर्शन करते हे पहावे लागेल.

 शेअर रिक्षांच्या भाडेवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी

ठाणे : दिवा शहरातील जवळपास 90% वाहतूक व्यवस्था ही रिक्षा वाहतुकीवर अवलंबून आहे. सुरवातीपासूनच दिव्यात शेअर पध्द्तीनुसार रिक्षा भाडे आकारणी केली जात आहे. नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियन कडून वाढवण्यात आले. ज्याची अंमलबजावणी दिनांक २१ एप्रिल २०२४ पासून करण्यात आलेली आहे. रिक्षा युनियनकडून करण्यात आलेल्या या दरवाढीला सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला विरोध, भाडेवाढीवर नाराजी ही व्हॉट्स ॲप आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवरून दिसून येत आहे. तर रिक्षा युनियनला ही फोन करून व प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी ही रिक्षा भाडेवाढीला विरोध दाखवला आहे. वास्तविक पाहता दिवा शहरातील मुख्य लोकवस्ती ही साधारणपणे दिवा रेल्वे स्थानकापासून एक ते साडे तीन किलोमीटरच्या पट्यात पसरलेली आहे. उदा. दिवा स्टेशन ते आगासन फाटक (3 किमी), दिवा स्टेशन ते बेडेकर नगर (2.1 किमी), दिवा स्टेशन ते गणेश नगर (1.9 किमी), दिवा स्टेशन ते ग्लोबल शाळा (1.6 किमी), दिवा स्टेशन ते दातिवली फाटक (1.7 किमी), दिवा स्टेशन ते विठ्ठल मंदिर- दातिवली (1.5 किमी), दिवा स्टेशन ते साबे जीवदानी मंदिर (1.5 किमी) प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) ने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मीटर नुसार रिक्षा वाहतुकीचे भाडे पहिल्या दिड किलोमीटर साठी 23 रुपये आकारले जाते. त्यानुसार जर साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळे पर्यंतचे अंतर हे अनुक्रमे 1 किमी आणि 1.6 किमी आहे. नवीन दरानुसार साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळेपर्यंत 15 रुपये दर करण्यात आला आहे. तीन सीट प्रमाणे त्याचे मूल्यमापन केल्यास रिक्षाचालकला साधारणपणे 45 रु. मिळतात. मार्च 2020 लॉकडाऊन पूर्वी ग्लोबल शाळेकडून दिवा स्टेशनसाठी सीटमागे प्रत्येकी 10 रुपये आकारले जात होते. पण शासनाने त्यावेळी परिस्थिती अनुरूप रिक्षा मध्ये फक्त दोन प्रवासी बसवण्याची सक्ती केली होती म्हणून रिक्षा चालकांकडून 10 रुपयांच्या ऐवजी 15 रुपये आकारण्यास सुरवात करण्यात आली. नागरिकांनीही त्यास विरोध केला नाही, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. पण काळानुरूप जेव्हा परिस्थिती सामान्य होऊन पूर्वीप्रमाणे रिक्षा प्रवासी संख्या सुरू करण्यात आली; तेव्हा मात्र रिक्षाचे वाढवण्यात आलेले भाडे तसेच ठेवण्यात आले, असे नागरिकांचे म्हणणे आहे. डोंबिवली स्टेशन पासून रिजेन्सी अनंतम गेट पर्यंत साधारण 20 रुपये शेअर ऑटोचे भाडे आकारले जाते. किलोमीटनुसार पाहायला गेल्यास हे अंतर अंदाजे 3 किलोमीटर आहे. त्या हिशोबाने दिव्यात नक्कीच रिक्षा भाडेवाढ जास्तच असल्याने नागरिक उघडपणे विरोध दाखवत आहेत. तर डोंबिवली सारखे दिव्यातील शेअर ऑटोचे दर देखील आकारले गेल्यास दिव्यातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच इतर शहारांप्रमाणे दिव्यातही मीटरनुसार रिक्षा सेवा वाहतूक विभागाने सुरू केल्यास त्याचा फायदा रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांनाही होऊ शकेल, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. ज्यांना शेअर भाडे जास्त वाटत असेल ते मीटर प्रमाणे रिक्षा वापरू शकतील. तर प्रादेशिक परिवहन विभागाने दिव्यातील दोन्ही रिक्षा युनियन आणि प्रवाशांशी चर्चा करून यावर सर्वसहमत असा मार्ग काढण्याची मागणी दिव्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

ठाण्याची हवा समाधानकारक

हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असून त्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. हवा प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणात झालेले बदल यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन पालिकांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार ठाणे महापालिकेने बांधकाम प्रकल्पांना नोटीसा बजावून धुळ प्रदुषण रोखण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु केली होती. शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून त्याद्वारे प्रदुषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते पाण्याने धुण्यात येत होते. याशिवाय, सर्वंकष स्वच्छता मोहिम शहरात राबविण्यात येत होती. यामध्ये रस्ते आणि गल्लीबोळात साफसफाई केली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम काही दिवसांपुर्वी दिसून आले होते. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १३० पर्यंत आले होते. यामुळे हवेची नोंद मध्यम गटात झाली होती. त्यापाठोपाठ आता शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचे दिसून येत आहे.

 डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली

इंडिकेटर यंत्रणेतील गोंधळामुळे डोंबिवली:-  डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची चुकीची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकातील दर्शक फलकावर (इंडिकेटर) देण्यात येत होती. या चुकीमुळे…

मतदान करा, जागरूक नागरिक व्हा!

ठाणे शहरात सोसायट्यांमध्ये मतदान जनजागृती मोहीम ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ठाणे शहरात २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात ठाणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी,यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. स्वीप पथकामार्फत गृहनिर्माण संकुलात,  इमारती तसेच झोपडपट्टी परिसरात मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नुकतीच लोढा स्टर्लिंग सोसायटी,कोलशेत रोड णे येथे मतदान जनजागृती करण्यात आली. सदर मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वा मध्ये पार पडला. स्वाभिमानी मतदार या संकल्पने मधून मतदारांना मतदानाचे महत्व व स्वरूप स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्त्रिया,पुरुष,ज्येष्ठ नागरिक व युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. मतदान जनजागृती राबविण्याचा उद्देश यावेळी नागरिकांना पटवून देण्यात आला  देशात सर्वत्र  लोकसभा उत्सव सुरू आहे. या राष्ट्रीय उत्सवात नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी प्रशासनामार्फत  विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून देतांना त्यांच्या प्रश्नाचे व शंकाचे निरसनही करण्यात आले. यावेळी नवमतदारांना मतदान यादीत नाव कसे नोंदवावे, ऑनलाईन अर्ज कसे भरायचे यांचे प्रशिक्षण स्वीप पथकाकडून देण्यात आले. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करा, निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करा.  योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते अशी जनजागृती नागरिकांमध्ये करण्यात आले. नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी देण्यात आली. निवडणुकीच्या निमित्ताने देशाची शान, मतदान हा तुमचा हक्क आणि तुमची जबाबदारी, नैतिकतेने मतदान करा, माझे मत हा माझा हक्क आहे, तुमचे मत तुमचे भविष्य आहे, असे विविध जनजागृती करणारे फलक लावून मतदारांना माहिती देण्यात आली.    लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

कल्याणमधील २ तर भिवंडीतून ५४ अर्ज दाखल

कल्याण : ठाणे, लोकसभा निवडणूकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दोन तर भिवंडीतून एकदम ५४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी…

खर्च विषयक बाबींसाठी आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

  ठाणे:-  ठाणे,भारत निवडणूक आयोगाने ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक बाबींसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून चित्तरंजन धनगडा माझी (आयआरएस), २४ कल्याण मतदारसंघासाठी नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि २५  ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमती चंद्रा प्रकाश मीना (आयआरएस) व राहिल गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने कळविली आहे.

निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडले सापाच्या विळख्यातील भंगारजमा ईव्हीएम !

ठाणे जिल्ह्यातून २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार असताना २७ भंगारजमा ईव्हीएम सापडले ! अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणूक सुरु असतानाच आणि देशभर ईव्हीएमबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच निवडणूक आयोगाच्या ताब्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गाळ्यात सापाच्या विळख्यातील भंगारजमा ईव्हीएम सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महत्वाचे म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार असताना २७ भंगारजमा ईव्हीएम सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या मालकीचे दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील प्रेक्षक गॅलरी (स्टॅण्ड)च्या खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. यातील  खोलीत निवडणूक आयोगाकडून निवडणूकीशी संबंधित काही गोष्टींचा साठा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या ताब्यातील खोलीत २०१४ च्या निवडणुकीनंतर निवडणुकीशी संबंधित काही वस्तु ठेवल्या असल्याची आठवण १० वर्षानंतर निवडणूक आयोगातील अधिकार्‍यांना झाली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील पोलीस, तलाठी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासह येथे धाव घेत सदर खोली उघडण्याचा प्रयत्न केला. अर्धवट तुटलेल्या दरवाजाचे कुलुप चावीने उघडण्याचा प्रयत्न केला असता ते उघडले जात नसल्याने दगडाने कुलुप तोडून दरवाजा उघडण्यात आला. सदर खोलीत प्रवेश केला असता खोलीत वीजेची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. मोबाईल टाॅर्चच्या उजेडात खोलीत पहाण्याचा प्रयत्न केल्यावर गंज लागलेल्या अवस्थेतील अनेक पेट्या आढळून आल्या. या पेट्या उघडल्यावर निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडले. सापाच्या विळख्यातील पेटीमध्ये शेकडो तयार मतदान ओळखपत्रे, बंद लिफाफे व २७ भंगारजमा झालेले ईव्हीएम आढळून आले. महत्वाचे म्हणजे या खोलीत सापांचे अस्तित्व आढळून आले. गंज लागलेल्या पेटींवर साप फिरताना दिसत होते. ठाणे महापालिकेकडून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खोली २०१४ साली गोदाम म्हणून वापरण्यासाठी निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. ही खोली जवळपास १० वर्षे उघडण्यातच आली नव्हती आता लोकसभा निवडणूका सुरु असताना २०२४ साली ही खोली उघडण्यात आली. यात सापडलेले शेकडो तयार मतदान ओळखपत्रांचे वाटपच झाले नसल्याचे दिसून येते आहे. २०१४ साली ठाणे जिल्ह्यातील २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार करण्यात आली होती. येथे तर प्रत्यक्षात भंगारजमा झालेले २७ ईव्हीएम सापडले असल्याने गायब झालेले ईव्हीएम हेच आहेत का याची चौकशी करण्याची मागणी विरोधी राजकीय पक्षांनी केली आहे. अशावेळी याची शहानिशा न करताच सापडलेले या सर्व वस्तू चक्क भंगारात विकण्याचे आदेश संबंधित यंत्रणेकडून देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. याविषयी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. चौकट निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडलेल्या ईव्हीएमबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, ही घटना म्हणजे काय निर्लज्जपणा चाललेला आहे ते पहा. लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.

डोंबिवलीत आयरे गावातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

मढवी बंगल्याजवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतीवर कारवाई डोंबिवली: येथील पूर्व भागातील ग प्रभाग हद्दीतील आयरेगाव सरस्वती शाळेच्या मागील बाजूस भूमाफियांनी उभारलेल्या बेकायदा चाळी, चाळींसाठी बांधलेले १४ जोते ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण नियंत्रण पथकाने मंगळवारी जमिनदोस्त केले. याशिवाय म्हात्रेनगर मधील राजाजी रस्ता भागातील मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे, शिव यादव या भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीत व्यापारी आणि निवासी असे दोन भाग आहेत. या बेकायदा इमारतीवर यापूर्वी दोन वेळा तोडण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात आली होती. आता पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. हे पाहून भूमाफिया प्रवीण म्हात्रे यांनी तोडलेल्या इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरू केले होते. ही माहिती समजताच साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांनी पोलीस बंदोस्तात ही बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले आहे. या इमारतीच्या चारही बाजला वाहन जाण्याची सुविधा नसल्याने कामगारांच्या साहाय्याने या इमारतीचे तोडकाम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. आयरेगाव सरस्वती शाळेच्या मागे भूमाफियांनी बेकायदा चाळी आणि नवीन चाळींसाठी १४ हून अधिक जोते बांधले आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी मिळाली होती. याविषयी तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खात्री केल्यावर ग प्रभागाच्या तोडकाम पथकाने जेसीबीच्या साहाय्याने बेकायदा चाळी आणि जोते साहाय्यक आयुक्त कुमावत यांंच्या उपस्थितीत जमीनदोस्त केले. यावेळी भूमाफिया घटनास्थळावरून पळून गेले होते. राजाजी रस्ता मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे यांनी बांधलेल्या बेकायदा इमारतीवर यापूर्वी दोन वेळा तोडकामाची कारवाई करूनही त्यांनी पुन्हा बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती मिळताच, तोडकाम पथकाने या बेकायदा इमारतीवर कामगारांच्या साहाय्याने तोडकामाची कारवाई सुरू केली आहे. या बेकायदा इमारतीला पालिकेच्या कोणत्याही परवानग्या भूमाफिया प्रवीण म्हात्रे यांनी घेतल्या नाहीत. पालिका आणि महसूल विभागाचा महसूल बुडवून प्रवीण यांनी बेकायदा इमारत उभारल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई पालिकेकडून केली जाणार आहे. या इमारतीच्या बाजुला सामासिक अंतर सोडण्यात आलेले नाही. या इमारतीमुळे आजुबाजुच्या इमारतींचा पाणी पुरवठा, मलनिस्सारणावर परिणाम झाला होता. त्यामुळे ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करावी, अशा तक्रारी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे तक्रारदारांकडून प्राप्त झाल्या होत्या. आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशावरून कुमावतयांनी ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने मढवी बंगला परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आयरेगाव हद्दीतील बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. मढवी बंंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे यांनी उभारलेली सात माळ्याची बेकायदा इमारत भुईसपाट करण्याच्या कामास सुरूवात केली आहे. या इमारतीजवळ जाण्यास जेसीबी किंवा अन्य वाहन रस्ता नाही. कामगारांच्या साहाय्याने हे बांधकाम जमीनदोस्त केले जाईल. या भूमाफियावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याचा खुराडा तोडण्याचे आदेश

कल्याण : डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला दिवा बाजुने कोंबड्यांच्या खुराड्यासाठी बांधण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसात हा खुराडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. कोपर रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम बाजुला भूमाफियांनी हरितपट्ट्यावर बेकायदा बांधकाम करून तेथे एक बेकायदा बांधकाम केले होते. या ठिकाणी निवासी वस्ती सुरू करण्यासाठी भूमाफिया प्रयत्नशील असल्याचे दृश्य होते. परंतु, या बांधकामात कोंबड्यांचा खुराडा सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रवाशांना समजताच त्यांनी या खुराड्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करून हा खुराडा तात्काळ पालिका आणि रेल्वेने तोडून टाकावा अशी मागणी केली होती. अतिशय लपूनछपून करण्यात आलेले हे बेकायदा बांधकाम ‘लोकसत्ता’ ठाणे सहदैनिकाने उघडडकीला आणले आहे. आयुक्त डाॅ.इंंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांंनी या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश ह प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी बुधवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम श्रीकांत पाटील या भूमाफियाने या भागातील हरितपट्टा नष्ट करून बांधला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांंगितले. या बेकायदा बांधकामाला कोपरमधील पश्चिम मंडळातील एका पदाधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याच्या तक्रारी आहेत. कोपर मधील एका स्थानिक ज्येष्ठ राजकीय नेत्याने मात्र या बेकायदा बांधकामाला कडाडून विरोध केला आहे. उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांनीही या बेकायदा बांधकामाची पाहणी केली असल्याचे समजते. रेल्वे स्थानकाजवळ कोंंबड्याचा खुराडा सुरू झाला तर कोपर रेल्वे स्थानक भागात कोंंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी पसरेल. फलाटावर प्रवाशांना उभे राहणे मुश्किल होईल आणि परिसरातील रहिवाशांंनाही या दुर्गंधीचा त्रास सहन होणार होता. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना स्वताहून हे बांधकाम काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पालिकेकडून हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करून पाडकामाचा खर्च प्रशासन वसूल करील, अशी तंबी साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना दिली आहे. हे बेकायदा बांधकाम वाचविण्यासाठी भूूमाफियांची एक फळी गेल्या काही दिवसांंपासून सक्रिय आहे. कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यावरील बेकायदा बांंधकाम संबंधितांंना स्वताहून काढून घेण्याची सूचना केली आहे. स्वताहून हे बांधकाम तोडले नाहीतर पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात हे बेकायदा बांधकाम भुईसपाट केले जाईल. तसे नियोजन करण्यात आले आहे. राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली)