Category: ठाणे

Thane news

बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी ‘पाणीबाणी’

तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात येत्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी…

ठाणे टोल हटवा, नाहीतर मतदानावर बहिष्कार

ठाणे : ठाण्याच्या वेशीवर असणारा मुलुंड चेकनाका येथील टोलनाका रद्द करा नाहीतर मतदावर बहिष्कार टाकू अशी आक्रमक भुमिका ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी घेतली आहे. तब्बल दहा हजार…

पीएचडी करणाऱे दलित विद्यार्थी नेते रामदास यांना निलंबित करणाऱ्या

टीआयएसएस प्रशासनाचा निषेध अनिल ठाणेकर ठाणे : पीएचडीसाठी अभ्यास करणारे दलित विद्यार्थी नेते रामदास यांना दोन वर्षे निलंबित करण्याच्या व रामदास यांना टीआयएसएसच्या सर्व कॅम्पसमध्ये प्रवेशास बंदी घालण्याच्या, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) च्या प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व सरचिटणीस डॉ. विजू कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. रामदास हे प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ) चे सरचिटणीस होते, आणि आज ते एसएफआय च्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य असून एसएफआय च्या महाराष्ट्र राज्य कमिटीचे सहसचिव आहेत. युनायटेड स्टुडंट्स ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांच्या देशव्यापी मंचाचेही ते प्रतिनिधी आहेत. रामदास यांच्याविरुद्ध काढण्यात आलेला निलंबनाचा आदेश हा भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर तसेच मतस्वातंत्र्यावर हल्ला करण्याचे जे देशव्यापी कारस्थान चालले आहे, त्याचाच एक अविभाज्य भाग आहे. टीआयएसएस च्या प्रशासनाने या कारस्थानात सामील होऊन आणि रामदास यांच्या कृतींवर राष्ट्रविरोधी हा ठराविक शिक्का मारून लोकशाही मूल्ये आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. रामदास यांचे निलंबन हे अशा प्रकारचे एकच उदाहरण नाही. देशातील अनेक कॅम्पसवर होत असलेल्या हुकूमशाही हल्ल्यांचा तो भाग आहे. भाजप व आरएसएस यांच्या केंद्र सरकारच्या विद्यार्थीविरोधी आणि शिक्षणविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठवाल तर त्याचा हाच परिणाम होईल अशी देशातील समग्र विद्यार्थी समुदायाला दिलेली ती धमकी आहे. पण विद्यार्थी समुदाय अशा हल्ल्यांचा व धमक्यांचा धैर्याने सामना करत आहे. अलीकडेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या एकजुटीने आरएसएस च्या अभाविप या विद्यार्थी संघटनेचा जो धुव्वा उडवला, त्यातून हवा कोणत्या दिशेने वाहत आहे याची झलक पाहायला मिळते. टीआयएसएस चे विद्यार्थी सुद्धा अशा हल्ल्यांच्या प्रतिकाराच्या अग्रभागी राहतील याचा आम्हाला विश्वास आहे. रामदास यांचे निलंबन ताबडतोब मागे घ्यावे, आणि स्वातंत्र्य व लोकशाहीवरील अशा हल्ल्यांविरुद्ध विद्यार्थी, शेतकरी, आणि सर्व जनतेनेच आपला बुलंद आवाज उठवावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने डॉ. अशोक ढवळे व डॉ. विजू कृष्णन यांनी केले आहे.

वाघबीळ गावात रस्त्यावर गटारगंगा

रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ गावातील रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी साचत असून या पाण्यामधून नागरिकांना वाट काढत घर गाठावे लागत आहे. हे पाणी अंगावर उडाल्यास खाज येण्याचे प्रकार घडत असून यामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून रस्त्यावर वाहणारी गटारगंगा बंद करण्याची मागणी केली. ही समस्या सुटली नाहीतर, येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रहिवाशांनी यावेळी दिला. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागात मोठी मोठी गृह संकुले उभी राहत असून याठिकाणी भूमिपुत्रांची गावे आहेत. वाघबीळ गावात रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याने गावकऱ्यांची वाट अडविल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावर गेल्या १० वर्षांपासून सांडपाणी वाहत असून रस्त्यावर काही भागात सांडपाणी साचून तिथे मोठे डबके तयार झाले आहे. या पाण्यावर हिरवा रंगाचे हे पाणी दिसून येत असून या पाण्यामुळे गावकऱ्यांना रस्त्यावर चालणे शक्य होत नाही. रस्त्याच्या कडेने वाट करून त्यांना घरापर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यातही पाणी अंगावर उडाले तर, अंगाला खाज सुटते. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे हा त्रास सहन करावा लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. वाघबीळ गावातील सांडपाण्याच्या समस्येमुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ठाणे शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच वाघबीळ गावातील सांडपाणी रस्त्यावर साचण्याची समस्या आहे. या संदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही महापालिका प्रशासन कोणतीच पाऊले उचलत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या दिड महिनाभरात पावसाळा सुरु होत असून पावसाळ्यात येथून चालणे शक्य होणार नाही, असे रहिवाशांनी सांगितले. रस्त्यावर वाहणारी गटारगंगा बंद करण्याची मागणी करत ही समस्या सुटली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रहिवाशांनी यावेळी दिला.

संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी-कोलशेत-ढोकाळी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला

ठाणे : वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा मार्ग पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांनी संजय भोईर यांचे आभार मानले आहेत. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी मागील वर्षी ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर बदल केले. कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्गही वाहतूक विभाग आणि ठाणे मनपा प्रशासनाने बंद केला होता. हा मार्ग बंद झाल्याने कोलशेत, ढोकाळी, मनोरमानगर, मानपाडा, आझादनगर, ब्रह्मांड, लोढा अमारा येथील सुमारे पावणे दोन लाख रहिवाशांची यामुळे फरफट होत होती. हा मार्ग बंद झाल्याने हायलँड अथवा बाळकूम येथील राम मारुती रोडने रहिवाशांना प्रवास करावा लागत होता. परिणामी या रस्त्यांवर देखिल प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा हा मार्ग जरी बंद केला असला तरी कापूरबावडीच्या विरुध्द दिशेने या मार्गावर अनेक जण वाहतूक प्रवास करत असल्याने कापूरबावडी येथे वाहतूक कोंडी पूर्वीप्रमाणेच होत होती. तसेच वयोवृध्द नागरिक, महिला आणि शालेय मुलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच अपघाताचीही भिती होती. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी विरोधी पक्षनेते देवाराम भोईर, मा. नगरसेविका उषा संजय भोईर, मा. नगरसेवक भुषण भोईर आणि युवा नेते विकेश भोईर यांनी ठाणे महपालिका आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी हायलंड येथील मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तेव्हाही संजय भोईर यांनी या रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. आज अखेर संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला.

बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान 

प्रत्येक महिन्याला ‘बुक कल्चर’मार्फत बालवाचक कट्टा आयोजित करण्यात येईल – संदीप माळवी ठाणे : लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यात सुरु केली आहे. सविता राणे यांच्या बुक कल्चर मधील एक लहान मूल वर्षाला १०० पुस्तके वाचत आहे. ही चळवळ ठाण्यापुरती न राहता त्याचा प्रसार होणे आवश्यक आहे. वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारतांनाच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही कौतुक करायला हवे. प्रत्येक महिन्याला बुक कल्चर मार्फत बाल वाचक कट्टा आयोजित करण्यात येईल, असे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी जाहीर केले. ठाणे, आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरने मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱया वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्रसिद्ध कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे सुरु केलेल्या बुक कल्चर चळवळीचे त्यांनी कौतुक केले. बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली. आज बुक कल्चरमध्ये दोन हजाराहून अधिक बालवाचक आहेत. या उपक्रमात पालकांचेही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी करत भविष्यात हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यात शंकाच नाही असे मत शेवटी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सेशा अय्यर हिने पहाडी आवाजात शिवगर्जना सादर केली. बुक कल्चरच्या वेबसाईटचेही उद्घाटन यावेळी संपन्न झाले.

अथर्व, अर्जुन, आर्यन चमकले

ठाणे : अथर्व अधिकारी, अर्जुन बागायतकरची दमदार शतके आणि आर्यन दलालच्या पाच विकेट्सच्या जोरावर यजमान स्पोर्टींग क्लब कमिटीने मांडवी मुस्लिम संघाचा १८९ धावांनी धुव्वा उडवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती समरलीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. अथर्वच्या नाबाद १०३ आणि अर्जुनच्या १०४ धावांच्या जोरावर २० षटकात २ बाद २४८ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर आर्यन दलालने आपल्या भेदक गोलंदाजीने मांडवी मुस्लिम संघाला अवघ्या ५९ धावांवर गुंडाळत संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम फलंदाजी करताना अथर्व आणि अर्जुनने मोठ्या खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची शतकी भागीदारी केली. अथर्वने आक्रमक खेळी करताना ५७ चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद शतक झळकवले. तर अर्जुनने ३० चेंडूत ११ चौकार आणि पाच षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. या डावात प्रशांत मोरे आणि प्रशांत ठोंबरे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नांत आर्यनच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीसमोर मांडवी मुस्लिमच्या फलंदाजानी अक्षरशः शरणगती पत्करली .आर्यनने  ४ षटकात २ निर्धाव षटकांसह अवघ्या ७ धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा अर्धा संघ गारद केला. निरेक गावंड आणि  यश जठारने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : २० षटकात २ बाद २४८ (अथर्व अधिकारी नाबाद १०३, अर्जुन बागायतकर १०४, प्रशांत मोरे ४-३५-१, प्रशांत ठोंबरे ३-२९-१) विजयी विरुद्ध मांडवी मुस्लिम क्लब : १३.१ षटकात सर्वबाद ५९ (आर्यन दलाल ४-२-७-५,निरेक गावंड २.१-१-१३-२, यश जठार ३-१४-२).

‘मतदान जनजागृती सेल्फी स्टॅण्ड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाणे : ‘उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा’, ‘मतदान राजा ठेव कर्तव्याचे भान’, ‘सशक्त लोकशाहीसाठी कर मतदान’ असे आवाहन सेल्फी स्टॅण्डच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी हातभार तक्रारीचा, बोटभर उपाय असा जनजागृती करणारा सेल्फी स्टॅण्ड ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला असून कार्यालयात येणारे नागरिक या ठिकाणी सेल्फी घेत आहेत. देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घेवून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृतीवर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेला सेल्फी स्टॅण्ड या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘तुमचे मत तुमचा अधिकार’, ‘वृद्ध असो किंवा जवान’, ‘सर्वजण करा मतदान, तुमचे मत खरा आधार लोकशाहीचा’ आदी घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हानिवडणूक कार्यालयाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीपअंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.‍ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेला हा सेल्फी स्टॅण्ड नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून याठिकाणी नागरिक सेल्फी देखील काढत आहे. सेल्फी स्टॅण्डवर मतदारांना ऑफलाईन माहितीसाठी मतदार मदत क्रमांक देण्यात आला आहे. नागरिकांनी या सेल्फी स्टॅण्डचा लाभ घेवून मतदान प्रक्रियेत स्वत: सहभागी व्हावे व आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

अंबरनाथमध्ये ९०० नव्या पुस्तकांचे प्रदर्शन

‘ग्रंथाभिसरण’ वाचनालयाची वाचकांसाठी साहित्‍यिक मेजवानी अंबरनाथ-  वाचनसंस्कृती वाढावी, यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील ग्रंथाभिसरण वाचनालयाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त तब्बल ९०० नव्या कोऱ्या पुस्तकांच्या संचांचे प्रदर्शन आयोजित करून साहित्यिक मेजवानी दिली आहे. पुस्‍तक प्रदर्शनाला वाचकांनी…

पालिकेने हटविली निविदेतील ‘ती’ अट!

अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात ठाणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत व्हावी यासाठी महापालिकेने यंदा आधीच पावले उचलली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथील केल्या. अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. ठाणे महापलिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक २०१ नाले असून त्याखालोखाल दिव्यात १३१, नौपाडा प्रभाग समितीत ४९, वागळे इस्टेटमध्ये ३८, लोकमान्य-सावरकरात ३४, उथळसमध्ये ३४, वर्तकनगरात २९, माजीवाडा- मानपाडा ४४, मुंब्रयात ८० नाले असल्याची नोंद आहे. यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यामुळे पालिकेने मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांच्या नऊ प्रभाग समितीनिहाय निविदा काढल्या होत्या. महापालिकेने टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. तसेच यंदा खर्चात देखील तीन कोटींची कपात केली होती. त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजविली होती. त्यामुळे पालिकेने वारंवार निविदेला मुदतवाढ दिली. त्यानंतर वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर याठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदेला मुदतवाढ देत २२ एप्रिल पर्यंत वाढविली होती. ही मुदतवाढ देत असतांना निविदेत असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाई करण्याची अट शिथील करण्यात आली. ही अट शिथिल करण्यात आल्याने अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींना ठेकेदार मिळाले आहेत. त्यानुसार आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.