Category: ठाणे

Thane news

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सांगता

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सांगता कल्याण: संकल्प संस्था आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा सांगता व प्रमाणपत्र वितरण सोहळा पंतवालावलकर स्कूल, नेहरू नगर येथे मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच समाजकार्याची आवड असलेल्यांसाठी संकल्प संस्थेच्या वतीने १९ आठवड्यांचा सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आला होता. या प्रशिक्षणामध्ये समाजकार्य म्हणजे काय, समाजकार्याचे महत्त्व, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, गटकार्य, प्रचार- प्रसिद्धी माध्यमे, समाजकार्यकर्त्यांची भूमिका तसेच विविध सामाजिक समस्या अशा एकूण ५२ विषयांवर ३५ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून चार शनिवारी विविध सामाजिक संस्था, संघटना व शासकीय कार्यालयांमध्ये शैक्षणिक भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. यासोबतच दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, स्वयं- परिचय व गट उपक्रम यांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या गायत्री सज्जन वरिष्ठ वैद्यकीय समाज विकास अधिकारी, के. जे. सोमय्या हॉस्पिटल उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून युगंधरा कोळी अभिनेत्री, मॉडेल व रील स्टार तसेच गौरी राव अखिल चित्रपट महामंडळ सदस्या आणि अभिनेत्री व शास्त्रीय कथ्थक नृत्यांगना तसेच सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पाटील व रेश्मा जगताप यांनी उत्कृष्ट प्रकारे केले.

 मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार

मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार आसनगाव उड्डाणपुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक ठाणे: शहापूर तालुका येथील गर्दीचे एकमेव स्थानक म्हणून आसनगाव रेल्वे स्थानक ओळखले जाते.दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.मात्र,रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका स्थानिक नागरिक व प्रवाशांना बसत आहे. स्थानक परिसरातील एकमेव जुने फाटक रेल्वेने संरक्षक भिंत उभारून बंद केल्यामुळे हजारो नागरिक आणि प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.त्यामुळे तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. आसनगाव परिसराचा झपाट्याने विकास होत असून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मात्र, पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल नसल्यामुळे अनेकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.सुरक्षित व सोयीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली असली तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. उड्डाणपूल नसल्यामुळे स्थानिक वाहनचालक आणि चाकरमानी प्रवाशांना तब्बल तीन ते चार किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.हनुमान मंदिराजवळील रस्ताही रेल्वेने बंद केल्याने शिवाजी चौकातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली असून अनेकांचा रोजगार धोक्यात आला आहे. जुने फाटक बंद केल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या नागरिकांना एक ते दीड  किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.शिवाय उंच स्थानकावरील जिने चढताना महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात अनेकदा निवेदने दिली असून माजी खासदार कपिल पाटील यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र,अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे स्थानिकांमध्ये रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त होत असून लवकरच जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रतिक्रिया : “आसनगाव फाटकातून गेली अनेक वर्षे आम्ही पश्चिमेकडून पूर्वेला जात होतो. विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी हा मार्ग सोयीचा होता.पण आता संरक्षक भिंत उभारून सर्व रस्ते बंद केल्यामुळे आम्हाला मोठा फेरा मारावा लागतो.या समस्येमुळे आम्ही खूप त्रस्त आहोत. – संजय उमवणे, स्थानिक नागरिक

  वाहने सावकाश चालवा येथे निलगायी आहेत

वाहने सावकाश चालवा येथे निलगायी आहेत शहापूरात शेत, माळरानावर नीलगायींचे कळप, अविनाश उबाळे ठाणे : नीलगायींचे कळप स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत.यावेळी रस्ता ओलांडून जाताना निलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात नीलगायींचा अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत.नीलगायींचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी व नीलगायी संरक्षणासाठी वनविभागाकडून आता जनजागृती केली जात आहे.रस्त्यावर वाहनं सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत. किन्हवली परिसरात रस्त्याकडे लावण्यात आलेले हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग व विविध धरण प्रकल्प व रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहे.काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट,हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत.परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत.दुसरीकडे अन्न व पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांकडे कुच करीत आहेत.अशाच प्रकारे जंगलातील नीलगायींचे कळप हे गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत.हे नीलगायींचे तांडे शेतकऱ्यांच्या रोज नजरेस पडत आहेत.शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या निलगायींचे कळप हे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत. निलगायी या भाजीपाला आणि कडधान्य फस्त करीत आहेत. निलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत. शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव, कुडशेत, मुसई बेडीसगाव, परटोली, उंब्रई, कानवे, चेरवली, आष्टा, आदिवासी, लवले, ठुणे आणि किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर निलगायी आढळून येत आहेत. या निलगायी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा, वाल, मटकी इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी, घोसाळी, शिरवळे, भोपळा, गवार, काकडी व पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत. यामुळे मोठे अर्थीक नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकऱ्यांनसमोर आता उभे राहिले आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.रब्बी हंगामात निलगायींच्या शेत मळ्यातील वाढत्या उपद्रवामुळे अर्थीक नुकसानाला देखील तोंड द्यावे लागते आहे अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.या निलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत.या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत.या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.एकिकडे जंगल भुईसपाट होत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.तर दुसरीकडे अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या वन्यजीवांची वाताहत होताना दिसत आहे.असे हे विदारक चित्र येथे दिसत आहे.नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये

बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये ठाणे -बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील बुध्द विहाराचा समन्वय करण्याच्या उद्देशाने गेले अनेक वर्षे काम करीत आहेत. या समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला…

भाजपाच्या करवाढी विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन-अरविंद जोशी

भाजपाच्या करवाढी विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन-अरविंद जोशी मीरारोड – विधिमंडळात विरोधकांचा जोमाने एकत्रित मुकाबला करणारे सत्ताधारी महायुतीतील भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना रस्त्यावर मात्र एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी असल्याचे…

 बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा

बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची केडीएमसी महापौरांकडे मागणी कल्याण : बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली असून याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे १२२ नगरसेवक दिनांक १६ जानेवारी रोजी निवडून आले असून, ३ फेब्रुवारी रोजी महापौरपदी नियुक्ती हर्षाली चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. तथापि, बीपीएमसी कायद्या  मधील तरतुदीनुसार  महानगरपालिकेचे कर व दर हे दिनांक २० फेब्रुवारीपूर्वी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात कोणतीही महासभा घेण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. गेल्या पाच वर्षांपासून महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालू होता. नागरिकांनी व लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून दिलेल्या १२२ नगरसेवकांच्या अस्तित्वातही जर अशा महत्त्वाच्या विषयांवर महासभा होत नसेल, तर पुन्हा प्रशासनाचा कारभार प्रशासकांच्या हातीच राहणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नगरसेवकांच्या मनात निर्माण होत आहे. महासभा ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च निर्णयप्रक्रिया असून, तिच्यामार्फतच कर व दर निधित होणे अपेक्षित आहे. यामध्ये विलंब होणे हे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे तातडीने महासभा बोलवून कर व दर निश्चित करण्याचा विषय मांडण्यात यावा. महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या अधिकारानुसार निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी महापौरांकडे केली आहे.

केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कल्याण : ८ मार्च २०२६ रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा करिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्य क्षेत्रातील सर्व महिलांनी आपण केलेल्या कामगिरी बाबतची संपूर्ण माहिती कागदपत्रे अर्जा सहित महिला व बालकल्याण विभाग, कल्याण डोंबिवली महानगपालिका येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी केले आहे.

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव अत्यंत चिंताजनक बनला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची मागणी कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण (पूर्व) येथे राहणारे आयेश अमीन या युवकाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर रेबिजची भीती मनात निर्माण झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लसीचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाच्या नियोजनातील त्रुटी व निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येतो. कुत्रा चावल्यानंतर तात्काळ व पूर्ण लसीकरण होणे आवश्यक असताना लसीची अनुपलब्धता नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे. तरी परिसरात तातडीने कुत्रे पकड मोहीम राबवावी. सर्व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी मोहिम युद्धपातळीवर राबवावी. महानगरपालिका रुग्णालयांत रेबीज लस कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावी. संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. नागरिकांसाठी जनजागृती मोहीम व आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी राहुल काटकर यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

 शहापूर,मुरबाड,भिवंडी या तालुक्यातील आदिवासींच्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर

शहापूर,मुरबाड,भिवंडी या तालुक्यातील आदिवासींच्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर शेकडो मुले  शिक्षणापासून वंचित अविनाश उबाळे ठाणे -ठाणे जिल्हयातील शहापूर,मुरबाड, भिवंडी,या तालुक्यातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील आदिवासी कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर शहराकडे वीटभट्ट्यांवर रोजगारासाठी स्थलांतर…

 धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न

धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न अल्फी मेक्कदतचा दुहेरी मुकुट, जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची चमकदार कामगिरी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथे पार पडलेली धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा  अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात यशस्वीरीत्या संपन्न झाली. ठाणे महानगरपालिकेच्या आश्रयाखाली ठाणे सिटी अँड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील १० गटांमध्ये सामने खेळविण्यात आले आणि तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाने जिल्ह्यातील बॅडमिंटन वातावरण अधिक बळकट केले. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरला अल्फी मेक्कदत याचा दुहेरी किताब. अल्फीने अंडर १३ मुलांच्या एकेरी गटात तसेच अंडर १५ मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले. दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये त्याने अत्यंत प्रतिभावान पियूष सुतारवर मात करत दोन उदयोन्मुख चॅम्पियनमधील थरारक आणि उच्च दर्जाच्या लढती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. अंडर ९ मुलांच्या एकेरी गटात शिवांश चव्हाण विजेता ठरला तर विहान अनिखिंडी उपविजेता झाला. अंडर ९ मुलींच्या एकेरीत यश्वी कोरगावकर हिने विजेतेपद पटकावले आणि यम्मी मानोन हिला उपविजेतेपद मिळाले. अंडर ११ मुलांच्या एकेरीत योहान नायर विजेता ठरला तर वेद चव्हाण उपविजेता ठरला. अंडर ११ मुलींच्या एकेरीत नैरा पहारिया हिने बाजी मारली आणि सान्वी वागळे उपविजेती ठरली. अंडर १३ मुलींच्या एकेरीत शनाया तावटे हिने विजेतेपद पटकावले तर अद्विका मोरे उपविजेती ठरली. अंडर १५ मुलींच्या एकेरी गटात आर्या शिंदे विजेती ठरली आणि शुभ्रा कुलकर्णी उपविजेती ठरली. खुल्या गटातील मुलांच्या एकेरीत मंथन पाडेल विजेता झाला तर अर्णव सावंत उपविजेता ठरला. खुल्या गटातील मुलींच्या एकेरीत आर्या घाडगे हिने विजेतेपद मिळवले आणि गुंजन कोठारी उपविजेती ठरली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा वरिष्ठ बॅडमिंटनपटू व क्रीडाप्रेमी  उदय गायकवाड,  रामदास शिंदे आणि  सुनील सोपारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  उदय गायकवाड आणि  रामदास शिंदे यांनी विजेत्या खेळाडूंना नैतिक मार्गदर्शन देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा दिली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून  नरेश गुंडले यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामने पार पाडले. या भव्य आयोजनामागे संदीप कांबळे आणि प्राजक्ता रानडे-कांबळे यांचे विशेष परिश्रम मोलाचे ठरले. तसेच धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती आणि ठाणे महानगर पालिकेच्या क्रीडा उप-आयुक्त मीनल पालांडे यांचा देखील  या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात सिंहाचा वाटा होता. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड तसेच प्रशिक्षक मितेश हाजीरनीस, फुलचंद पासी, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर उपस्थित होते.  श्रीकांत वाड यांनी खेळाडूंसोबतच पालकांनाही योग्य मार्गदर्शन करत स्पर्धेच्या दर्जात भर घातली. धर्मवीर क्रीडा संस्थेच्या पुढाकारामुळे आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून, ठाणे जिल्ह्यातील बॅडमिंटनला नवी दिशा देणारा हा क्रीडा महोत्सव ठरला आहे. भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.