ठेकेदारासह संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश
ठाणे पत्रकार भवन गैरव्यवहार प्रकरण अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा पत्रकार भवन गैरव्यवहार प्रकरणात ठेकेदारासह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन ठेकेदार राजन शर्मा आणि संबधितांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघाला राज्य शासनाने गावदेवी येथील भूखंड पत्रकार भवन बांधण्यासाठी दिला होता. पत्रकार संघाच्या तत्कालीन कार्यकारीणी सदस्यांनी ठेकेदार राजन शर्मा सोबत बेकायदेशीर करारनामा करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पत्रकार भवन उभारले होते. ठेकेदार राजन शर्मा यांनी पत्रकार भवना व्यतिरिक्त लगतच्या जागेत आणखी एक बेकायदा तीन मजली इमारत उभारली होती. याप्रकरणी शासनाने शर्तभंगाची कारवाई सुरू केली असता ठेकेदार शर्मा याने न्यायालयातुन स्थगिती मिळवली होती. तत्कालीन संघाची कार्यकारीणी, जिल्हा प्रशासन यांनी सदरची स्थगिती उठवण्याबाबत कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे गेली पंचवीस वर्षे या दोन्ही इमारतींचा ताबा ठेकेदार शर्मा याच्याकडेच होता. तो या दोन्ही इमारतींचा गैरवापर करून यातील काही गाळे भाड्याने तर काही गाळे विक्री करून शासनासह पत्रकारांची फसवणूक केली होती. पत्रकारांसाठी राखीव असलेल्या या भूखंडावरील भवनाचा उपयोग पत्रकारांना झालाच नव्हता. ही बाब ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष संजय पितळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश ३ ऑगस्ट २०२२ रोजी दिला होता. तसेच, तहसिलदारांच्या आदेशान्वये या जागेवरील इमारती निष्काषित करून रिकाम्या भूखंडाला तारेचे कंपाउंड उभारून शासनाचा बोर्ड लावला आहे. ठेकेदार शर्मा याने तत्कालीन महसुल मंत्र्याकरवी या गैरव्यवहार प्रकरणाला स्थगिती मिळवली होती. यावर जिल्हाध्यक्ष संजय पितळे यांनी,ठाणे उपविभागीय अधिकाऱ्याकडे वारंवार पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यानुसार सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, यांच्या १३ जाने. २०२२ रोजीच्या पत्रात नमूद केल्यानुसार या गैरव्यवहार प्रकरणात ठेकेदार शर्मा व संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ०००००