Category: ठाणे

Thane news

आरोग्य केंद्रातील कॅन्टीन इमरती वापराविना पडून

आरोग्य केंद्रातील कॅन्टीन इमरती वापराविना पडून ठाणे: प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या कॅन्टीन इमारती अनेक वर्षे कुलूप बंद अवस्थेत वापराविना पडून आहेत.या कॅन्टीन इमारती भाडे तत्वावर देण्याच्या निविदेअभावी धूळ खात पडून आहेत. आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही कॅन्टीन योजना फोल ठरल्याचे दिसून येत आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गाव पाड्यातील गोरगरीब आदिवासी रुग्णांना स्वस्तात चहा,नाष्टा उपलब्ध व्हावा तसेच शासनालाही भाडे मिळेल या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सन २०१४ ते २०१५ दरम्यान प्रत्येकी १० लाख रुपये खर्च करून जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या नाविन्य पूर्ण योजनेतून लाखो रुपये खर्च करून कॅन्टीनसाठी इमारती उभारल्या आहेत.शहापूर तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना याचा लाभ झाला आहे.कॅन्टीनसाठी उभारलेल्या या इमारतींना दहा वर्ष होऊनही शासनाकडून या कॅन्टीन भाडे तत्वावर देण्यासाठीच्या निविदाच आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याने प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे शासनाची ही योजना फोल ठरल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

 सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पळस फुलांचे अनोखे सौंदर्य

 सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पळस फुलांचे अनोखे सौंदर्य  शहापूरच्या वनराईत निसर्गाची लालसर उधळण – अविनाश उबाळे, ठाणे फेब्रुवारीच्या कडक उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच सह्याद्री पर्वतरांग मध्ये पळस फुलांच्या गडद लाल रंगांनी निसर्ग अक्षरशः बहरून गेला आहे.…

महाराष्ट्र अंनिसच्या बुकस्टॉलला ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद

विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्यातील महाराष्ट्र अंनिसच्या बुकस्टॉलला ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद अनिल ठाणेकर ठाणे: जिल्हा न्याय प्राधिकरण आयोजित विधिसेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यातील ठाणे महाविद्यालयाच्या प्रांगणातील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती-ठाणे शहर शाखेच्या बुकस्टॉलला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी महाराष्ट्र अंनिस राज्य प्रकाशन विभाग कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंढे, राज्य कायदे विभाग पदाधिकारी ॲड तृप्ती पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुषमा बसवंत, ठाणे शहर प्रधान सचिव अशोक मोहिते, पुस्तक प्रकाशन व वितरण विभाग कार्यवाह प्रमोद तामसे यांनी सहभाग नोंदविला. दिवसभर अगदी सकाळी १० पासूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती-ठाणे शहर शाखेच्या या बुकस्टॉलला विविध जनसमुह भेट देत होते. हळूहू ही गर्दी वाढतच होती. महा अंनिसचे कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंढे यांनी, पैशांचा पाऊस पाडणे, नारळात कपड्यांचे तुकडे दाखवणे, मनातले आकडे ओळखणे, लिंबूमधून दोरा फिरवल्यास दोऱ्याचा रंग बदलणे, नाकातून दूध टाकून कानातून काढणे, तांदळाचा चंबू मंत्राचा साहाय्याने उचलणे आदी चमत्काराच्या प्रयोगातून उपस्थितांचे प्रबोधन केले. लोकांनी यावेळी मोठ्यासंख्येने पुस्तक विक्री केली.ज्येष्ठ साहित्यिक यशवंत बैसाने यांनीही अनिसच्या या बुकस्टॉलला भेट दिली. जिल्हा न्यायाधीशांनी महा. अंनिसच्या सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

 एसएसटी महाविद्यालयात गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन उत्साहात

एसएसटी महाविद्यालयात गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन उत्साहात ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’कडून दखल कल्याण- शिखांचे नववे गुरू “हिंद दी चादर”  परमपूज्य गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त २३ फेब्रुवारी रोजी आयोजित सामूहिक गीत गायन उपक्रमाची ‘ बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस’ कडून विशेष दखल घेतली जाणार असून, या ऐतिहासिक उपक्रमात एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात एनएसएस सह महाविद्यालयाच्या सर्व विभागांतील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. गुरु तेग बहादूरजींच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीताचे सामूहिक सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बलिदानाची परंपरा जपण्याचा संदेश दिला. कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक-कर्मचारी एकाच वेळी सहभागी झाल्याने हा उपक्रम वैश्विक स्तरावर नोंद घेण्याजोगा ठरला आहे. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ठाणे जिल्हा एनएसएस समन्वयक प्रा. जीवन विचारे यांनी गुरू तेग बहादुर यांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ.दीपक गवादे, उपप्राचार्य डॉ. संतोष करमानी, सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

महापालिका शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधण्याचा आनंद वेगळाच –  दत्तू मोरे

महापालिका शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधण्याचा आनंद वेगळाच –  दत्तू मोरे अनिल ठाणेकर ठाणे- ‘स्वत: ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. १११ चा माजी विद्यार्थी असून शाळेत असताना याच मंचावरुन मला प्रथम क्रमाकांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. शाळेच्या मंचावरुन सुरू झालेला हा प्रवास आज हास्यजत्राच्या मंचापर्यत पोहचला आहे, त्यामुळे आज शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधताना एक वेगळाच आनंद वाटत आहे’, असं हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता म्हणून ओळख मिळेपर्यंत कसा झाला, याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित मध्यवर्ती सांस्कृ तिक महोत्सव २०२५-२०२६ हा आज दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गडकरी रंगायतन येथे उत्साहात व जल्लोषात पार पडला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपआयुक्त उमेश बिरारी, उपआयुक्त (शिक्षण) मिताली संचेती, नगरसेवक मनोहर डुंबरे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने झाली.  या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये एकूण १०२ शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इयत्ता १ ली ते ५ वी नृत्य विभाग, इयत्ता ६ वी ते ८ वी नृत्य विभाग तसेच इयत्ता १ ली ते ८ वी नाट्य विभाग अशा विभागनिहाय स्पर्धा दि. २३ व २४ डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. इयत्ता १ ली ते ५ वी नृत्य विभाग: शाळा क्र. ५३ – प्रथम क्रमांक, इयत्ता ६ वी ते ८ वी नृत्य विभाग: शाळा क्र. ५९ – प्रथम क्रमांक, नाट्य विभाग: शाळा क्र. ११ – प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या कलागुणांना उत्तेजन देणारे मनोगत व्यक्त केले. मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता चौधरी, उपकार्याध्यक्षा नीलिमा पाटील, चिटणीस वर्षा मटकर, सहचिटणीस आशा पाटे, युआरसी प्रमुख रविंद्र पाटील, मुश्ताक पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे व गटाधिकारी संगीता बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. तसेच ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबाजी फापाळे, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक जगन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील व वनिता जाधव यांनी प्रभावीपणे केले.एकूणच उत्साह, जल्लोष आणि आनंदाने ओतप्रोत भरलेला हा मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.खांचे नववे गुरु, “हिंद दी चादर” परमपूज्य गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित भक्तिगीताचे समूहगान सादर करण्यात आले. मनपा शाळा क्र. १३ व ४१ च्या विद्यार्थिनींनी सुरेल ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.

ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ शानू पठाण

ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ शानू पठाण अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अशरफ ऊ शानू पठाण यांची निवड झाल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत केली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी सभागृह नेते हणमंत जगदाळे व विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना पक्षाचे गटनेते पवन कदम, भारतीय जनता पार्टीचे गटनेते मुकेश मोकाशी, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला, एमआयएमचे सरफराज खान ऊर्फ सैफ पठान यांचेही पुष्पगुच्छ देवून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अभिनंदन केले.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी नवी मुंबई: स्वच्छता, सामाजिक न्याय आणि सुधारणांवर भर देणारे आधुनिक संत म्हणून नावजले गेलेल्या संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, नगरसेविका माधुरी सुतार, सायली शिंदे, शैला पाटील, प्रिती भगत, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त अमोल पालवे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, मुख्य विधी अधिकारी  अभय जाधव, कार्यकारी अभियंता  तानाजी शिंदे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

  उल्हासनगरात बुद्ध विहारांचे राष्ट्रीय अधिवेशन

उल्हासनगरात बुद्ध विहारांचे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. भदंत उपगुप्त महास्थवीर अधिवेशन अध्यक्ष तर डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर प्रमुख पाहुणे ठाणे : (प्रतिनिधी) बुध्द विहार समन्वय समिती द्वारा आयोजीत बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च, २०२६ रोजी शहीद जनरल अरूण कुमार वैद्य टाऊन हॉल, उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे, कोंकण विभाग मध्ये आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूजनीय डॉ. भदंत उपगुप्त महास्थविर (पूर्णा जिल्हा परभणी) हे अधिवेशनाचे अध्यक्ष राहणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन, कामगार नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चे राष्ट्रीय अध्यक्ष शामदादा गायकवाड करतील. मुख्य अतिथी भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर राहतील. अतिथी म्हणून महाबोधी बुद्ध गया मुक्ती आंदोलन नेते आकाश लामा, तामिळनाडू बौध्द नेते जी. मोहनन, राजस्थान चे विचारवंत भेरुलाल नामा, बुद्धीस्ट समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश नागदिवे राहतील. दिल्ली विद्यापीठ दिल्लीच्या प्रोफेसर डॉ. हेमलता महिश्वर महीला चर्चासत्र, पणजी (गोवा) येथील संबोधी ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. उल्हास आंबेडकर (चांदेलकर) हे युवा सत्राचे, ठाणे येथील समन संघाचे राजेश कांबळे हे डिस्कशन प्यानलचे, बुध्द विहार समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. घनशाम धावर्डे हे प्रतिनिधी सत्राचे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध हे समारोप सत्राचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत. बुध्द विहाराचे समन्वयात महिला, युवक, युवती, धम्म प्रचारक, विचारवंत यांची भूमिका या विषयावर चर्चा होईल. मुख्य आयोजक अशोक सरस्वती बौध्द यांचे नेतृत्वात शंभर कार्यकर्त्यांची आयोजन समिती अधिवेशन यशस्वी करण्यासाठी परिश्रम करीत आहे, अशी माहिती संयोजन समिती सदस्य प्रा. राजेश सोनवणे यांनी दिली.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार देण्यात यावा

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार देण्यात यावा बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघातर्फे साजरी, शासकीय यंत्रणेला मात्र विसर पडल्याचे चित्र पोंभुर्ले – पत्रकारांचे दैवत तसेच आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ वी जयंती आज २० फेब्रुवारी रोजी पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील वंशज सुधाकर रामचंद्र जांभेकर व कुटुंबीय उपस्थित होते. मात्र शासकीय यंत्रणेला पोंभुर्ले येथील स्मारकाच्या ठिकाणी येवून अभिवादन करण्यासाठी विसर पडल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. २० फेब्रुवारी रोजी थोर महापुरुष व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ व्या जयंती निमित्ताने पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. त्यामुळे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची जयंती शासन पातळीवर सर्वच ठिकाणी साजरी झाली पाहिजे होती. मात्र बाळशास्त्री जांभेकरांच्या मूळ गावी पोंभुर्ले येथे खरं म्हणजे शासनाच्या वतीने अभिवादन झाले पाहिजे होते, मात्र शासनाची यावेळीं उदासीनता दिसून आली. शासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी या थोर महापुरुषांच्या जन्मस्थानी फिरकले देखील नसल्याची खंत जर्नालिस्ट युनियन ऑफ  महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी हाच दिवस जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्रित आणून जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली होती. दरवर्षी येथे जयंती साजरी करण्यात येईल अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली होती. मात्र यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांना व शासकीय यंत्रणेला याचा विसर पडला अशी भावना जांभेकर कुटुंबीयांनी व्यक्त करुन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस पत्रकार राजेंद्र साळसकर, खजिनदार सतिश साटम, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार उदय दुधवडकर, सचिव संजय खानविलकर, महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे सिंधुदुर्ग अध्यक्ष गणेश चव्हाण, सुनिल आचरेकर, बाजीराव जांभेकर, दळवी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत  हाटकर आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. पत्रकारितेचे संस्थापक व समाजातील सुविचारांचे व्यासपिठाचे जनक असलेले तसेच समाजाचा आरसा पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना  मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा. बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने कोकणात पत्रकारितेचे विद्यापीठ व्हावे. पोंभुर्ले गांवास जागतिक दर्जाचे प्रेक्षणीय व माहिती स्थळ म्हणून मान्यता मिळावी. अशा मागण्या शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे   जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष पांचाळ यांनी सांगितले. फोटो ओळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारकात त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जर्नालिस्ट युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ, राज्य सरचिटणीस राजेंद्र साळसकर, सुधाकर जांभेकर, सतीश साटम, उदय दुधवडकर, संजय खानविलकर, गणेश चव्हाण, बाजीराव जांभेकर, प्रा.प्रशांत हटकर व इतर

  १३४ औद्योगिक भूखंडांवरील उद्योग बंद

१३४ औद्योगिक भूखंडांवरील उद्योग बंद विहित कालावधीत उत्पादन न झाल्यास भूखंड ताब्यात घेणार कल्याण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत उद्योजकांना औद्योगिक विकासाच्या उद्देशाने विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येते. सदर भूखंड धारकांनी करारातील अटी व शर्तीप्रमाणे विहित कालावधीत आवश्यक परवानग्या प्राप्त करून उद्योग सुरू करणे व प्रत्यक्ष उत्पादनात जाणे बंधनकारक असते. या अनुषंगाने, प्रादेशिक कार्यालय, ठाणे–२ यांच्या पथकाकडून अंबरनाथ, कल्याण, भिवंडी व मुरबाड तालुक्यांतील अंतर्गत औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले. या पाहणीअंती एकूण १३४ भूखंडांवरील उद्योग बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित भूखंड धारकांनी अद्यापपर्यंत आवश्यक शासकीय परवानग्या प्राप्त करून उद्योग सुरू केलेला नाही किंवा उत्पादन प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे आढळून आले आहे. करारनामा व लागू नियमांनुसार भूखंडाचा उद्देशपूर्ण वापर न केल्यास किंवा निर्धारित मुदतीत उत्पादन सुरू न केल्यास संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार, संबंधित भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. विहित कालावधीत समाधानकारक खुलासा न मिळाल्यास किंवा उद्योग प्रत्यक्ष सुरू न झाल्यास, संबंधित भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ताब्यात घेणार आहे. त्यानंतर नियमावलीनुसार व पारदर्शक पद्धतीने सदर भूखंड गरजू व पात्र उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या मिलाप  पोर्टल वरून ऑनलाइन पद्धतीने पुनर्वाटप करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे औद्योगिक क्षेत्रातील निष्क्रिय भूखंडांचा प्रभावी वापर होऊन स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व औद्योगिक विकासास चालना मिळण्यास मदत होईल, अशी माहिती प्रादेशिक कार्यालय, ठाणे–२ यांच्याकडून देण्यात आली आहे.