Category: ठाणे

Thane news

V

केडीएमसीच्या एच प्रभागात अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार, उपायुक्त समीर भुमकर व बाळासाहेब चव्हाण यांच्या निर्देशानुसार ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा (स्मशानभूमीच्या मागे) तसेच नवीन देवीचापाडा येथील २५ खोल्या आणि १० चाळीचे जोते संपूर्णत: निष्कासित करण्याची कारवाई केली. हि कारवाई फेरीवाला पथकाचे कर्मचारी, ठेकेदाराचे १० कामगार, १ जे.सी.बी. यांच्या सहाय्याने करण्यात आली.

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार 30 जानेवारीला विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व डॉ. विलास आठवले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे सह सचिव नागनाथ थिटे, सह सचिव (समिती) राजेश तारवी, उप सचिव  विजय कोमटवार, स्वाती ताडफळे, अवर सचिव सुरेश मोगल, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी २०० मुलींना मोफत लसीकरण

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी २०० मुलींना मोफत लसीकरण ठाणे: न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणे शतक महोत्सवानिमित्त सखी सावित्री समितीतर्फे, इनर व्हील क्लब्स – झोन ५ यांनी आदित्य बिर्ला ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्याने २०० मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) संरक्षणासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) सर्वावॅक एचपीव्ही (Cervavac HPV) लस यशस्वीरित्या दिली आहे. या लसीचे दोन डोस मुलींना मोफत देण्यात आले. पहिला डोस २१ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात आला, तर दुसरा डोस २८ जानेवारी २०२६ रोजी देण्यात आला. हे संपूर्ण लसीकरण वैद्यकीय देखरेखीखाली आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या सहाव्या मजल्यावरील भोळे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इनर व्हील स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी या उपक्रमाला मोठे सहकार्य केले. हा उपक्रम मुलींच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. या उपक्रमामुळे अनेक गरीब आणि गरजू मुलींना मोफत लसीचा लाभ मिळाला आहे.

 केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली कल्याण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या असह्य दुःखद प्रसंगी कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे सदस्य तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येत, अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निर्भीड नेतृत्वाची, जनतेसाठी केलेल्या कार्याची आणि संघर्षमय वाटचालीची आठवण यावेळी प्रत्येकाच्या मनात दाटून आली. दादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारे दादा आपल्या आज आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्ते वल्ली राजन यांनी दिली.

संविधान अधिकार देतो, तर भाषा आपल्याला ओळख देते- दिलीप कोरे

संविधान अधिकार देतो, तर भाषा आपल्याला ओळख देते- दिलीप कोरे कल्याण:  स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन सार्वभौम, लोकशाही प्रधान आहे. या प्रसंगी आपण आपली भाषा स्वतंत्र ठेवली आहे का? याचा विचार होणे आवश्यक आहे कारण संविधान आपल्याला अधिकार देतो तर भाषा आपल्याला ओळख देते. मराठी भाषा ही इतिहासाची भाषा आहे. अभंग, पोवाडे, लोकगीते, भारुडे यातून मराठी भाषा समृद्ध झाली आहे. परंतु सांस्कृतिक घसरण होऊ नये म्हणून मराठीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी भाषेचा सक्रीय वापर, निर्मिती, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अभिजात मराठी हस्तांतरित करा असे मोलाचे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे म्हणून कोकण ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे यांनी प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक वाचनालय कल्याण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी केले. देशाचे सज्ञान, सुजाण, आदर्श नागरिक होण्याकरिता मराठी भाषेशी समरस व्हा, आपली भाषा वापरातून जिवंत ठेवा. असा मोलाचा सल्ला वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन विद्यार्थी चालवितात वाचनालय, पुस्तक रसग्रहण स्पर्धा २०२६, माझे कल्याण शहर – प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६ अशा विविध स्पर्धातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये बिर्ला महाविद्यालय कल्याण, प्रगती महाविद्यालय, डोंबिवली, अॅचिव्हर्स महाविद्यालय,कल्याण, सी.एच.एम. महाविद्यालय, उल्हासनगर अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात सहभाग नोंदविला होता. विजयी स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा रुईता सपकाळ यांनी प्रमुख पाहुण्या म्हणुन वाचनालयाच्या सर्व उपक्रमाला व पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊन २१ हजारांची देणगी देणार असल्याचे जाहीर केले. प्रसंगी वाचनालयाच्या उपाध्यक्षा आशा जोशी, चिटणीस नीलिमा नरेगलकर, कार्यकारणी सदस्या अमिता कुकडे, कार्यकारिणी सदस्य अरुण देशपांडे, वाचक वर्ग, शिक्षक गण, विद्यार्थी वर्ग व वाचनालयाच्या ग्रंथसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

 विशेष मुलांसाठी उडान ११ चे आयोजन

लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थतर्फे विशेष मुलांसाठी उडान ११ चे आयोजन ठाणे : लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि त्यांची युथ विंग लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उडान नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार,१ फेब्रुवारी रोजी एन. के. टी सभागृहात होणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष प्रसाद खोपकर यांनी दिली. यासंदर्भात प्रसाद खोपकर म्हणाले, दिव्यांग (विशेष)मुलांना कला कौशल्याला संधी मिळावी म्हणून लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उडान ११ हे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. यावर्षी १३ विशेष शाळांमधील सुमारे १३० पेक्षा जास्त विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत.  विजेत्या शाळांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. तर, उडान ११ च्या माध्यमातून केवळ कलेचे सादरीकरण होणार नसून, त्यांना समज आणि स्वीकारण्याची भावना प्रबळ करण्याचा प्रयत्न आहे. विशेष मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लिओ क्लबच्या अध्यक्षा ग्रीष्मा इंदप यांनी केले आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान

दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने पकडून जीवदान दिल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात गुरुवारी दुपारी साडेपाच फुटी लांब कोब्रा नागाची आणि मुंगूस यांची झुंज रंगली होती. दरम्यान तिथे किल्ले दुरुस्ती काम करणारे कामगार पोहचले त्यांची चाहूल लागल्याने मंगूस पळून गेले. त्या नागाचा रूद्र अवतार पाहता मंजुराची भितीने त्रेधातिरपीट उडाली. प्रसंगावधान पाहत सुरक्षा कर्मचारी मोरे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने घटनास्थळी पोहचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी साडेपाच फुटी लांब विषारी कोब्रा नागास पकडून जीवदान दिल्याचे पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले की, गारव्यामुळे साप उन्हाची तिरिपसाठी दगडी पायरी परिसरात उबीसाठी आला असावा. संदर्भीत पकडलेल्या विषारी नागास जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पाहता भक्तांनी देखील मंदिर परिसरात जाता येताना लक्ष देत मार्गाक्रमण गरजेचे आहे.

गांधीहत्या झाली, पण गांधीविचार अजरामर – राजन राजे

गांधीहत्या झाली, पण गांधीविचार अजरामर – राजन राजे ठाणे : ३० जानेवारी — अहिंसेचे पुजारी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची याच दिवशी एका अधम प्रवृत्तीच्या माथेफिरूने कट रचून निर्घृण हत्या केली.…

टिटवाळा मंदीर परीसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करण्याची मागणी

टिटवाळा मंदीर परीसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र कल्याण : टिटवाळा मंदिर परिसरातील नागरी, व्यवसायिक सुरक्षा व वाहतूक कोंडीच्या निवारणाकरिता कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापित करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहरमार्फत करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस उपधीक्षक व कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी याबाबत चर्चा केली असता निवेदनानुसार तजवीज करणार असल्याचे आश्वासन महासंघाला देण्यात आले आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिटवाळा हे गाव महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केलेले असून, टिटवाळा हे महागणपतीचे प्रसिध्द तिर्थस्थान आहे. तेथे नियमीतपणे व विशेषतः मंगळवार, चतुर्थी व अंगारीका हया दिवशी हजारोंच्या संख्येने भावीक येत असतात व अनेकवेळा वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे याठिकाणी कायमस्व्यरूपी पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. टिटवाळा येथील महागणपती मंदिर परिसरातून मौजे गुरवली, रूंदा-फळेगाव व गोवेली या गावांकडे रस्ता जात असून या परीसरात अनेक गृहसंकुले असून, व्यावसायिक संकुले आहेत. हा परीसर नियमीतपणे वाहतुकीचा व वर्दळीचा असल्याने बाहेरूनही अनेकवेळा मालवाहतुक होत असते. तसेच अनेक गृहसंकुलनाकडे जाणा-या रस्त्यांवर आंधार पडल्यावर संशयीत फिरस्ते फिरत असतात. अनेक मद्यपी जागोजागी मद्यपान करतांना आढळून येतात त्यामुळे अंधार पडल्यावर या रहीवासी संकुलनातील महीला, वृध्द हयांना या रस्त्यावरून जाणे येणे भितीदायक होत असल्याच्या तकारी प्राप्त होत आहेत. तसेच वेळप्रसंगी चेनस्नॅचिंग, चोरी, घरपोडी व शरीराद्विरुध्दचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि परीस्थिती पहाता टिटवाळा येथील मंदीर परिसरात कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करून त्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणुक होऊन कायमस्वरूपी विशेषतः रात्रीच्या वेळची गस्त घालणे सोयीस्कर होणार असून होणा-या गुन्हयांना आळा बसणार आहे. तरी कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत टिटवाळा मंदीर परिसरात सोयीस्कर ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन होऊन त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करण्यात येऊन त्यांना रस्त्यांवर, गृहसंकुलनामध्ये रात्रीची गस्त घालण्याचे आदेश देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहरतर्फे करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका कलावंत जपणारी-संदीप माळवी

ठाणे महापालिका कलावंत जपणारी-संदीप माळवी मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन ठाणे: ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुध्दा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. तसेच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करीत आली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी केले. ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्या निमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच श्रुखंलेतील कवी संमेलन २७  जानेवारीला  कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले. पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून “न्यूजलेस कविता” असा  लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. गझलकार सुनील तांबे, वृत्त निवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत डिंगणकर यांनी कवी संमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत, कधी व्यथा.वेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य तर कधी नर्म विनोद अशा मानवी भावभावनांचा अविष्कार असणाऱ्या कविता या निमित्ताने या कवींनी सादर केल्या. गझल, हायकू, मुक्त छंद, वृत्तबध्द आणि चार ओळी असे कवितेचे विविध प्रकार हाताळणाऱ्या या कवींनी कवितेचा समृद्ध इतिहास ही या निमित्ताने उलगडून दाखवला. गिरणगावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांचे स्मरण करून आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन हे कवी संमेलन संपन्न झाले. प्रशांत डिंगणकर यांनी सादर केलेली “बा विठ्ठला” उपहासात्मक  कविता, यामिनी दळवी यांनी सादर केलेली “सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू…” ही गझल… तर “हार नाही जीत नाही” “श्वास गझल..” या सुनील तांबे यांच्या तरनुम्म मधील गझल उपस्थितांची दाद मिळवून गेल्या. पंकज दळवी यांच्या नर्म विनोदी कवितांमुळे सभागृह हशा आणि टाळ्यात भरुन गेले.