– रेरा घोटाळ्यात फसवणूक झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांना न्याय द्यावा
भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे मागणी ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील काही इमारतींमधील रेरा नोंदणी घोटाळ्यात सामान्य ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. आता या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजाविल्यानंतर रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांना महापालिकेने दिलासा देण्यासाठी निर्देश द्यावेत. तसेच संबंधित बिल्डरांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे केली. घरग्राहकांच्या संरक्षणासाठी असलेल्या रेरा कायद्यांतर्गतची नोंदणी व बिल्डरने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून मंजूर झालेल्या कर्जातून कल्याण-डोंबिवलीतील ५८ इमारतींमध्ये शेकडो रहिवाशांनी घरे घेतली असून, सहा हजार नागरिक राहत आहेत. कालांतराने रेरा कायद्याअंतर्गत मंजुरी मिळविण्यासाठी बिल्डरांनी महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिकेने संबंधित इमारती जमीनदोस्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकारामुळे रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांची व्यथा आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत आज मांडली. या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घ्यावी. तसेच सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेला निर्देश द्यावेत. तसेच या प्रकरणी बिल्डरांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली