Category: ठाणे

Thane news

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा,  दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे बारवी गुरूत्ववाहिनी  क्र. १, २ व ३ वर वाहिन्याचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी गुरूवार रात्री १,२ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१  चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४  तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा  विभागातर्फे करण्यात आले आहे.

देशभक्तीच्या जयघोषात टिटवाळा पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन साजरा

देशभक्तीच्या जयघोषात टिटवाळा पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन साजरा कल्याण : भारतीय लोकशाहीचा गौरव, संविधानिक मूल्यांचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची चेतना यांचे प्रतीक असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण तालुका पोलीस स्टेशन, टिटवाळा येथे अत्यंत सन्मान, शिस्तबद्ध वातावरण आणि भावनिक देशभक्तीच्या वातावरणात भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा जागर अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमाने परिसरात राष्ट्राभिमानाची एक नवी ऊर्जा निर्माण केली. सकाळी ध्वजारोहणाच्या क्षणी राष्ट्रगीताच्या सूरांमध्ये संपूर्ण परिसर भारावून गेला. पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तिरंग्याला मानवंदना देताना उपस्थित प्रत्येकाच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागृत होताना दिसून आली. राष्ट्रध्वज फडकताना केवळ एक औपचारिक विधी नव्हे, तर देशाच्या स्वातंत्र्य, एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली निष्ठा अधिक दृढ करणारा क्षण म्हणून हा सोहळा नागरिकांना अनुभवता आला.

संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं

संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं बाबासाहेबांनी सर्व घटकांना समान न्याय व हक्क देणारे संविधान दिले   – आनंद गायकवाड कल्याण: पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय सेंट वाय सी इंग्लिश स्कूल सम्राट अशोक इंग्लिश स्कूल आणि विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानात लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पाहता संस्थेने प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांच्या हस्ते तिरंगी ध्वजारोहण केले. आनंद गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून सतत्याहत्तर वर्षे झाली. शेवटच्या घटकापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा अद्यापही मिळत नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्व घटकांना समान न्याय व  हक्क देणारे संविधान दिले  परंतु आजही देशात गरिबी आणि दारिद्र्य आहे. बिनविरोध निवडणूक करून नागरिकांचा मतांचा अधिकारच काढून घेत आहेत हे लोकशाहीला घातक आहे. संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पत्रकारितेच्या माध्यमातून घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात माझ्या हस्ते ध्वजारोहण करून माझा सन्मान केला मी धन्य झालो. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर आकर्षक कवायतीच्या माध्यमातून देशभावना जागृत केल्या.आर. एस. पी. आणि एम. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन करत तिरंगी झेंड्यास सलामी दिली. महापुरुषांच्या वेशभूषेवर आलेली लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथ. विभाग मुख्याध्यापिका सुजाता नलावडे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले.

ठाणेकरांना लवकरच कोंडीमुक्त प्रवासाची अनुभूती-एकनाथ शिंदे

ठाणेकरांना लवकरच कोंडीमुक्त प्रवासाची अनुभूती-एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडी कशी दूर होईल याला प्राधान्य देण्यात येत असुन कोस्टल रोड तसेच उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे, लवकरच ठाणेकरांना वाहतुक कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रजासत्ताक दिनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या “कार्निव्हल” चे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ठाणे शहर वाहतुक शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने साकेत येथील पोलीस क्रीडासंकुल मैदानात प्रजासत्ताक  दिनापासुन २८ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या वाहतुक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांच्या कार्निव्हलचे उद्घाटन सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, वाहतुक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट आणि स्टॅडअप कॉमेडीयन नविन प्रभाकर आदींसह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वाहतुकीच्या चित्ररूपी दिनदर्शिकेचे लोकार्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्याचे सत्कार केले. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते, त्याप्रमाणें प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांची जनजागृती लहानग्यापासून केली जात आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार काढत शिंदे यांनी, कार्निव्हलच्या प्रदर्शनात मांडलेल्या ई दुचाकी तसेच, ई मोटारी चालवण्याची अनुभुती घेतली. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी, वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी “रस्ता सुरक्षा हीच जीवन सुरक्षा” हे अधोरेखित करताना शहरातील रस्त्यांबरोबरच पदपथ राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. पदपथ नागरीकांना चालण्यासाठी आहेत, ते अबाधित ठेवले पाहिजेत. त्यामुळे पादचाऱ्यांचे अपघात कमी होण्यास मदत होईल.या अनुषंगाने, महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सर्वांनी नियम पाळले तर, अपघात होणारच नाहीत, ड्रंक एंड ड्राइव्हची मोहिम अधिक तीव्र केल्यामूळे देखील अपघात कमी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, ठाण्याची वाहतूक कोंडी कशी दूर होईल यासाठी प्राधान्य देण्याचे सुतोवाच करून ना. शिंदे यांनी घोडबंदर रोड पूर्ण खड्डेमुक्त करणार असल्याचे सांगितले. या सत्यावर अनेक ठिकाणी थोडे कट आपण बंद केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. त्याचबरोबर कोस्टल रोड, उन्नत मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे, त्यामुळे लवकरच ठाणेकरांना कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिली.

७५ महिलांच्या ७५ गुलाबी ई-रिक्षा प्रवाशांसाठी मोफत धावल्या

ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त ७५ महिलांच्या ७५ गुलाबी ई-रिक्षा प्रवाशांसाठी मोफत धावल्या ठाणे : २७ जानेवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ७५ व्या जयंती निमित्त ७५ महिलांनी आपल्या ७५ गुलाबी ई-रिक्षाने लहान मुलांपासून ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास सेवा देऊन जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी केली.  सकाळी १० वाजता ७५ महिला गुलाबी युनिफॉर्म घालून ७५ गुलाबी ई-रिक्षा सोबत शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका, ठाणे येथे उपस्थित होत्या. मिलींद बल्लाळ, राजन साप्ते आदी मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा फडकवून मोफत सेवेचे उदघाट्न करण्यात आले. वाट न बघता आज रिक्षा मिळली, आज कोणी रिक्षाने नाही म्हटले नाही,   प्रवास सुखकर झाला, अशा प्रतिक्रिया ठाणेकर नागरिकांनी दिल्या. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाजसेवेच्या दृष्टीकोनाला आणि कार्याला दिलेली ही आदरांजली आहे, असे आयोजक जयदीप कोर्डे, डॉ. श्रीकांत राजे, संजय मिरगुडे, अविनाश पावळे यांनी म्हटले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यातील विद्यार्थ्यांना शशिकांत केळशीकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यातील विद्यार्थ्यांना शशिकांत केळशीकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप भाजपा काजू महामंडळ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रुपेश बेलोसे यांची उपस्थिती दिवा : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिवा परिसरातील विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम भाजपा काजू महामंडळ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रुपेश बेलोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हा सरचिटणीस, ह्युमन राईट्स राष्ट्रीय सरचिटणीस तसेच टायगर ग्रुप ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत (सतीश) केळशीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले वह्या व शैक्षणिक साहित्य यावेळी वितरित करण्यात आले. तेथे उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत करण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थिती कोकण प्रतिष्ठान दापोली खेड मंडणगड अध्यक्ष तुषार गायकर, उपाध्यक्ष दिलीप शिगवण, सल्लागार गणेश दवंडे, तसेच भाजपा सदस्य साधना सिंग जी, पूनम सिंग व टायगर ग्रुप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोईर काका, दिवा शहर उपाध्यक्ष कैलास गोगावले, रमेश कोळी, कु. सूरज पानसरे व सर्व सहकारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले असून, अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शिळ– दिवा रस्त्यावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना निवेदन

शिळ– दिवा रस्त्यावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना निवेदन आरती परब दिवा: शिळ– दिवा रस्त्यावर सातत्याने घडणऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा प्रभाग समितीच्या वतीने दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात शिळ– दिवा रस्त्यावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तसेच महाकालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या वळणावर वाहनांची वेगवान वर्दळ होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. रस्त्यावर योग्य वेगमर्यादा दर्शविणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक तसेच आवश्यक सूचनाफलक नसल्यामुळे वाहनचा लकांना दिशा न मिळाल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढत असल्याचे सांगण्यात आले. या मार्गावर शाळा व वस्ती असल्याने लहान विद्यार्थी, नागरिक व स्थानिक रहिवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे महाकालेश्वर मंदिराजवळ, दिपक सर्विस सेंटर समोर, राॅबो स्कुल शंकर मंदिर समोर, चंद्रकांत आलिमकर घरा समोर, तुलाजा भवानी मंदिर शिळगांव प्रवेशद्वार समोर, सुभेदार स्कुल समोर या चार ठिकाणी तातडीने गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग पथ व आवश्यक सूचनाफलक बसविण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलातील ७५ हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून त्यात ठाण्याच्या सुवर्णा शिंदें…

चिन्मय मिशनच्या ७५ व्या पवित्र अमृत महोत्सवाचे आयोजन

आर्य गुरुकुलचा समष्टी अंजनेय होम चिन्मय मिशनच्या ७५ व्या पवित्र अमृत महोत्सवाचे आयोजन कल्याण : कल्याण येथील आर्य गुरुकुल, जागतिक चिन्मय मिशनच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक तेजस्वी भाग बनले. त्यांनी समष्टी अंजनेय होमचे आयोजन शनिवारी कल्याण मध्ये  केले होते.  हा एक असा यज्ञ होता ज्याने भक्ती, शिस्त आणि दैवी कृपेला एकत्र आणले. हा कार्यक्रम केवळ एक विधी नव्हता, तर एक आध्यात्मिक जागरण होते, जे वेदांताला दैनंदिन जीवनात आणि ज्ञानाला सेवेत रूपांतरित करण्याच्या गुरुदेवांच्या दृष्टिकोनाचा प्रतिध्वनी होता. दिवसाची सुरुवात राम नामावलीच्या जपाने आणि तानपुऱ्याच्या श्रुतीने झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शांतता पसरली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्याचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण भजनांनी, कृशांक मलिक (उपाध्यक्ष, चिन्मय मिशन, कल्याण) यांच्या स्वागतपर भाषणाने आणि अलका मुतालिक यांच्या सत्काराने झाली, ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्या शब्दांनी सर्वांना आठवण करून दिली की, “अमृत महोत्सवातील आर्य गुरुकुलचा सहभाग हा तरुण पिढीसाठी आध्यात्मिक जागृतीचा एक प्रकाशस्तंभ आहे.” याठिकाणी सर्वांच्या सहभागातून सामूहिक भक्तीचे दर्शन घडले. यामध्ये ४०० तरुण साधक, ७५ मार्गदर्शक, ५० समर्पित समर्थक, २१ कुटुंबे कृतज्ञता व्यक्त करणारी आणि २१ वैदिक विद्वान यांचा समावेश होता. दिवसाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘राम-की टोळी’ मिरवणूक होती, जिथे भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे आदरपूर्वक प्रतिनिधित्व करण्यात आले. एका प्रतीकात्मक कृतीत, हनुमानाने आपली गदा अम्माजींना अर्पण केली, ज्यामुळे प्रधान होमाचा प्रारंभ झाला. या पवित्र कृतीत नम्रता, भक्ती आणि सामर्थ्य यांचा संगम होता, ज्यामुळे यज्ञाच्या गहन आध्यात्मिक महत्त्वासाठी योग्य वातावरण निर्माण झाले. स्वामिनी निष्कलानंद-जी अम्मा यांचे आशीर्वादवचन या सोहळ्याचा आत्मा होता. हा कार्यक्रम म्हणजे “अनिश्चिततेने भरलेल्या जगात, आपण जागतिक शांततेसाठी जप करूया, आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेचा स्वीकार करूया—ज्याचा अर्थ संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची प्रतिक्रिया आर्य ग्लोबल अध्यक्ष भरत मलिक यांनी दिली. तर “शिक्षण हीच पूजा आहे. आजचा यज्ञ बुद्धी, हृदय आणि हात यांना एकत्र आणतो—जे सर्वांगीण शिक्षणाचे सार असल्याचे डॉ. नीलम मलिक यांनी सांगितले.

हजारो विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनची करिअर मार्गदर्शनाची दीपमाळ

हजारो विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनची करिअर मार्गदर्शनाची दीपमाळ कल्याण : करिअरच्या वाटेवर उभ्या असलेल्या किशोरवयीन मनांमध्ये संभ्रम असतो, प्रश्न असतात, भीती असते… पण योग्य शब्द, योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की तीच मनं स्वप्नांकडे झेप घेऊ लागतात. ठाणे जिल्ह्यात हेच घडलं. कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर आणि नवी मुंबई या महानगरपालिकांच्या सहकार्याने अंतरंग फाऊंडेशनने राबवलेली तीन भागांची ऑनलाइन करिअर वेबिनार मालिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेडाची दीपमाळ ठरली. ५५ हून अधिक शाळांमधील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमाने केवळ माहिती दिली नाही, तर विचारांना दिशा दिली, मनाला बळ दिलं आणि स्वप्नांना पंख दिले. “करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तो स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे” ही भावना या वेबिनार मालिकेच्या प्रत्येक संवादातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजली. शिक्षण, IT, AI आणि सोशल सेक्टरसारख्या विविध क्षेत्रांतील अनुभवी वक्त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव उघडले—संघर्षांचे दिवस, अपयशांचे क्षण, यशाची पहिली पायरी आणि त्या प्रवासातून शहाणपणाची शिदोरी मिळाली. शब्दांतून फक्त कथा नव्हत्या, तर आयुष्याची शिकवण होती; सल्ल्यांत फक्त मार्ग नव्हता, तर आत्मविश्वासाची ज्योत होती. त्यामुळे करिअर ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातली माहिती न राहता, जिवंत अनुभव बनून उभी राहिली. प्रश्नोत्तर सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी भीती झटकली, संकोच बाजूला ठेवला आणि मनातले प्रश्न मोकळेपणाने विचारले. विचार करण्याची सवय, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि स्वतःचं मत ठामपणे मांडण्याचं धाडस या उपक्रमातून नकळत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजत गेलं. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदाच “मी करू शकतो” हा विश्वास चमकताना दिसला. ऑनलाइन स्वरूपामुळे हा उपक्रम केवळ काही शाळांपुरता मर्यादित राहिला नाही. वर्गखोल्यांतील टीव्ही, प्रोजेक्टर, मोबाईलच्या स्क्रीनवरून एकाच वेळी हजारो विद्यार्थी या वेबिनारशी जोडले गेले. शहर, उपनगर, परिसर यांची सीमा मिटली आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रकाश ठाणे जिल्ह्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात पोहोचला. या यशामागे शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, समन्वयक आणि महानगरपालिकांचे भक्कम पाठबळ होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता, चळवळ बनला. अंतरंग फाऊंडेशनने या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाची नवी संस्कृती रुजवली असून, भविष्यात अधिक व्यापक, अधिक समावेशक आणि अधिक प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा संस्थेचा निर्धार या यशस्वी वेबिनार मालिकेतून ठामपणे अधोरेखित झाला आहे.