रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट दावा करताना निवडणुकीच्या रिंगणात उतण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, याच ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये महायुतीत जोरदार ठशन सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून नारायण राणेंनी माघार घेत असल्याचे संकेत दिले होते. मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून बुथ मेळावे आयोजित करण्यात आल्यानंतर आता रत्नागिरी शहरात सुद्धा शिवसेनेकडून मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झालं नाही ना? अशी सुद्धा चर्चा मतदारसंघांमध्ये रंगली आहे. किरण सामंत यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे ट्विट केलं होतं. मात्र, त्यानंतरही या घडामोडी घडत असल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मेळावा उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी दावा केला असला तरी शिवसेनेने अजूनही या मतदारसंघातील आपला दावा कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात यावी याबाबत कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. त्यांना उमेदवारी मिळेल असा आशावाद कायम आहे.
