विशेष
राज भंडारी
आयुर्विमा पॉलिसी काढल्यानंतर त्या विविध कारणांनी बंद पडतात. अशा पॉलिसींमध्ये भरलेल्या प्रीमियमचा लाभ घेण्याच्या उद्देशाने विमाधारक या पॉलिसी सरेंडर करतात. परंतु विमा कंपन्या जेव्हा त्यांना सरेंडर पॉलिसी ची रक्कम कळवतात तेव्हा मात्र पॉलिसीधारकांच्या प्रचंड नैराश्य पसरते. आयुर्विमा पॉलिसी तज्ञ रणजीत कुलकर्णी यांच्या समवेत आमच्या प्रतिनिधीनिने या प्रकाराबाबत सविस्तर चर्चा केली.
आयुर्विमा धारकाची पॉलिसी सरेंडर करताना त्याचे मूल्य का कमी येते याचे तांत्रिकदृष्ट्या पृथ:करण करताना कुलकर्णी म्हणाले की, विमाधारकाला पॉलिसीची विक्री करताना ती पॉलिसी एका शाश्वत कालावधी करता चालेल असे गृहीत धरलेले असते. एक ठराविक कालावधी मध्ये, एका ठराविक रकमेचे प्रीमियम मूल्य जमा होईल असे आडाखे बांधलेले असतात. याच जमा मूल्यातून विमा कंपनी गुंतवणूक करत असते तसेच विमाधारकाला लाभ देण्यासाठी खर्च करत असते. त्या मोबदल्यात विमाधारकाला विमा कवच पॉलिसी दिल्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेले असते.
उपरोक्त परिस्थितीमध्ये जर का पॉलिसीधारकाने ठरलेल्या कालखंडापूर्वी पॉलिसी सरेंडर करून त्याच्या परतावा मूल्याची मागणी केली तर विमा देणाऱ्या कंपनीवर दोन प्रकारे भार पडतो. भविष्यात जरी क्लेम देण्याची शक्यता कमी असली किंवा अपेक्षित लाभ देण्याची शक्यता अत्यंत कमी असली तरी सुद्धा आत्ता या क्षणी ठरल्याप्रमाणे प्रीमियम मूल्य आलेले नसले तरी देखील परतावा द्यावा लागतो. आणि दुसरा भार म्हणजे ठरलेल्या प्रीमियम जमा होणार नसतो. पॉलिसी चालू न ठेवल्याने अपेक्षित प्रीमियम रक्कम गुंतवलेली गेलेली नसते त्यामुळे अपेक्षित परतावा विमा कंपनीला न आल्याने विमा कंपनीला दुहेरी नुकसान सहन करावे लागत असते. संपूर्ण प्रीमियम न भरणाऱ्या पॉलिसी होल्डरला त्याचा परतावा देताना या तफावतींचे मूल्यांकन करणे जिकरचे असते. अपेक्षित गणितांच्यात विसंगती आलेली असते, म्हणूनच या सगळ्याचा सारासार बुद्धीने संतुलित विचार करून परतावा मूल्य द्यावयाचे असते.
साधारणतः कुठल्याही विमा पॉलिसीमध्ये लाभ देण्यासाठी प्रत्येक विमा कंपनीला एक निश्चित कालावधी लागतो. पॉलिसीचे अंडर रायटिंग, पॉलिसी इश्युईंग प्रोसेस हे सर्व खर्च देखील विमा कंपनीला करावयाचे असतात. त्यामुळे अर्धवट प्रीमियम भरलेल्या किंवा बंद पडलेल्या पॉलिसी परतावा देणे हे विमा कंपनीचे निश्चितच नुकसान असते. हे नुकसान जसे विमा पॉलिसी धारकाचे असते तसेच ते विमा देणाऱ्या कंपनीचे सुद्धा असते. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी साधारणतः तीन ते पाच वर्ष प्रीमियम भरावेत मगच पॉलिसी सरेंडर चा विचार करावा.
विमा पॉलिसी धारकाला पॉलिसी सरेंडर करताना कमी मूल्य प्राप्त होण्याचे आणखीन एक कारण हे आहे की विमाधारक याने प्रॉमिस केलेल्या कालखंडापूर्वी तो पॉलिसी बंद करून लाभाची अपेक्षा करत असतो. उदाहरणार्थ एखाद्या पॉलिसीचे टर्म पंधरा वर्षे आहे असे गृहीत धरू. यामध्ये सलग दहा वर्षे प्रीमियम भरणे अपेक्षित आहे याचा अर्थ विमा कंपनी आणि विमा पॉलिसी काढणारा यांच्यात एक करार झाला आहे. त्या करारानुसार त्यांनी दहा वर्षे या पॉलिसीमध्ये प्रीमियम भरणे अभिप्रेत असते व त्या बदल्यात विमा कंपनी त्याला लाभ,परतावा व अन्य सुविधा देत असते. जर विमाधारकाने पाच वर्ष प्रीमियम भरला आणि त्यानंतर जर का तो पॉलिसीचे लाभ काढण्यासाठी पॉलिसी बंद करून परतावा मूल्याची अपेक्षा करत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हा एक करारभंग आहे. तसेच अपेक्षित गुंतवणूक प्रक्रिया बाधित होत आहे अर्थातच लाभ देखील बाधित होणार. अशाप्रकारे गुंतवणूक आणि लाभ यांची गणिते चुकल्यामुळे विमा पॉलिसी धारकाला अत्यंत कमी मूल्य पदरात पडते.
आणखीन दुसरे कारण देखील ध्यानात घेतले पाहिजे. विमा क्षेत्रामध्ये विशेष प्रकारच्या विमा पॉलिसी देखील असतात. उदाहरणार्थ एंडोमेंट प्रकारच्या पॉलिसी. भारतामध्ये एंडोमेंट प्रकारच्या पॉलिसी खूप प्रसिद्ध आहेत. या प्रकारच्या पॉलिसीमध्ये परतावा अत्यंत आकर्षक मिळत असल्यामुळे या पॉलिसी ग्राहकांची पहिली पसंती ठरतात. परंतु प्रत्येक विमाधारकाची उदरनिर्वाहासाठी काम करण्याची निरनिराळी साधने असतात. पॉलिसी धारकाच्या जीविताला किती धोका आहे या मापदंडानुसार प्रत्येकाचे रिस्क प्रोफाईल वेगळे वेगळे असते. उदाहरणार्थ एअर कंडिशन ऑफिस मध्ये खुर्ची टेबलवर काम करणाऱ्या पेक्षा एखाद्या उंचीवर स्किल काम करणाऱ्या माणसाच्या मृत्यूची रिस्क जास्त असते. अशा रीतीने प्रत्येकासाठी वेगळे गणित मांडल्यास सगळ्यांना आकर्षक परतावा देता येणार नाही.असे असले तरी देखील प्रीमियम इन्शुरन्स कवच आणि परतावा लाभ सगळ्यांना समान देता यावा या उद्देशाने सगळ्यांची रिस्क प्रोफाईल समान आहे असे गृहीत धरले जाते. अशावेळी एखाद्याने मध्येच पॉलिसी सरेंडर केल्यास हे त्याचे विमा कंपनीचे आणि त्या प्रकारची पॉलिसी काढणाऱ्या प्रत्येकाचे नुकसान ठरते.
पॉलिसी सरेंडर करताना उपरोक्त सगळी गुंतागुंतीची कॅल्क्युलेशन्स ध्यानात घेतली जातात त्याचसोबत विमा पॉलिसी बंद करणाऱ्या चे मानसिकतेचे देखील मूल्यांकन केल्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक पाहता कुणीही विमा पॉलिसी बंद करण्याकरता ती काढत नसतो. विमा पॉलिसी सरेंडर करणं यात दोघांचेही नुकसान असते. खरे तर आता आपण ज्या वेगाने प्रगती करतोय ती ध्यानात घेता पॉलिसी सरेंडर या सेगमेंटमध्ये पॉलिसीधारक आणि विमा कंपनी या दोघांच्याही मदतीला देवदूताप्रमाणे धावून येणारी एखादी तिसरी संस्था निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
