वेध

जनार्दन पाटील

कर्नाटकमध्ये आता मुस्लिमांना सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले जात आहे. काँग्रेसने सर्व मुस्लिमांना ओबीसी कोट्यात टाकून ओबीसी बनवले आणि या समाजातील आधीच्या लोकांना दिलेले आरक्षण निरर्थक केले, असा आरोप मोदी यांनी केला. या निर्णयावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने कर्नाटक सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा विषय चर्चेत आहे. त्याबाबतचा हा वृतांत.

राजकारणाचे विविध कंगोरे आणि विविध बाजू असल्या तरी जाती, धर्माच्या नावाने होणारे राजकारण नेहमीच अफूच्या गोळीसारखे असते, हे नाकारुन चालणार नाही. एकदा ते दिले की लोक गुंगीत राहतात आणि मग वास्तविक प्रश्नांची जाणही राहत नाही. एकदा लोकांना भावनिक राजकारणात गुंतवले की त्या लहरीवर निवडणूक जिंकता येते, हे एव्हाना राजकारण्यांना चांगलेच समजले आहे. त्यातून मुस्लिमांच्या कल्याणाची भाषा करायची आणि त्याच मुस्लिमांना काही द्यायची वेळ आली की हिंदुत्त्वावाद्यांचे तुष्टीकरण करायचे, असेही वारंवार बघायला मिळते. कर्नाटकमध्ये पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजपने तो रद्द करून लिंगायत आणि वोक्कलिंगा समाजामध्ये ते आरक्षण वाटून टाकले. असे असताना तेव्हा त्यात राजकारण नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. आरक्षण धर्मावर आधारित नसावे, याबाबत दुमत नाही; परंतु एखाद्या धर्मात काही गरीब असतील तर त्यांना ओबीसीतून आरक्षण देता येते. महाराष्ट्रात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. न्यायालयानेच या मागण्या फेटाळल्या आहेत. परंतु मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ नसतानाही राज्य सरकारने निर्णय घेऊनही आरक्षण दिले नाही. आता मात्र काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये ते लागू केले आहे. यावरुन देशात रण माजले.
कर्नाटकमध्ये मुस्लिम आरक्षणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अकांडतांडव करत असताना २९ वर्षांपूर्वी एच. डी. देवेगौडा यांनी सर्वात आधी मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला होता हे लक्षात घ्यायला हवे. मात्र त्यांच्याच मांडीला मांडी लावून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार्‍या पक्षांनी याबद्दल त्यांना जाब विचारल्याचे ऐकिवात नाही. शिवाय कर्नाटकमध्ये मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न गंभीर नाही. आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण जास्त असले तरी तिथे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मुस्लिमांच्या मागासलेपणाचे प्रमाण अधिक आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. मुस्लिमांमधील काही जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये मुस्लिमांना सरसकट ओबीसीत आरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयात टिकणार नसला तरी त्याचे राजकीय भांडवल करण्याचा काँग्रेसचा पुरेपूर प्रयत्न आहे. अर्थात हे कोलीत काँग्रेसनेच ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या हाती दिले. आता हा लोकसभा निवडणुकीतला मुख्य मुद्दा बनला आहे. याबाबत भाजप सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. सर्व मुस्लिमांचा ओबीसी कोट्यात समावेश करून काँग्रेस मागासवर्गीयांचे हक्क नष्ट करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानेही कर्नाटक सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली असल्यास नवल नाही.
खरे तर देशातील आरक्षण व्यवस्था धर्मावर आधारित नसून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांसाठी आहे. भारतामध्ये आरक्षणाचा लाभ घेणार्‍या मुस्लिम जातींचा समावेश ओबीसींमध्ये केला जातो. ही व्यवस्था राज्यघटनेच्या कलम १६(४) अन्वये करण्यात आली आहे. कर्नाटकसह भारतातील पाच राज्यांमध्ये सर्व मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ दिला जातो. यासाठी संबंधित राज्यांमधील सर्व मुस्लिमांना ओबीसी मानण्यात आले आहे. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीतही या मुद्द्याने जोर पकडला होता. देशात केंद्रीय ओबीसी यादीत किंवा राज्याच्या यादीत समावेश असणार्‍या मुस्लिम जातींनाच आरक्षण मिळते. असे असले तरी राज्ये वेळोवेळी या याद्यांमध्ये बदल करतात आणि त्यात इतर जातींचा समावेश करतात. यामध्ये केरळ आणि तामिळनाडू आघाडीवर आहेत. याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचाही या राज्यांमध्ये समावेश आहे. विशेषत: तेलंगणामध्ये माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना मुस्लिमांसाठी ओबीसी उपश्रेणीतील निश्चित चार टक्के आरक्षण वाढवून बारा टक्के करायचे होते. त्यांनी विधानसभेत तसा ठरावही केला होता. मात्र केंद्र सरकारने तो फेटाळला. देशातील इतर राज्यांमध्ये ही प्रणाली लागू आहे. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये केवळ मुस्लिमांच्या मागासलेल्या जातींनाच ओबीसी कोट्यातील आरक्षणाचा लाभ दिला जातो. असे असताना कर्नाटकमध्ये मात्र गदारोळ झाला.
कर्नाटकमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळाची संहिता राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या नसतानाच्या काळातच लिहिण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी कर्नाटकमधील सर्व मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून दिलेले चार टक्के आरक्षण रद्द केले होते. राज्यातील ओबीसींसाठी राखीव असणार्‍या ३२ टक्के कोट्यामध्ये चार टक्के अशी उपश्रेणी तयार करण्यात आली होती. भाजपने हा कोटा लिंगायत आणि वोक्कलिंगा समाजामध्ये विभागला. त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणामध्ये आपले सरकार आल्यास मुस्लिमांसाठीचे चार टक्के आरक्षण रद्द करण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र तिथे काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसने मुस्लिमांचे आरक्षण रद्द करण्याच्या कर्नाटकमधील तत्कालीन भाजप सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता आणि आपले सरकार सत्तेत आल्यास मुस्लिमांचा कोटा पुनर्संचयित करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याच्या भाजपच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे आरक्षण लागू करण्याचा अधिकार राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या काँग्रेसला मिळाला. मागासवर्ग आयोगाचे म्हणणे आहे की, कर्नाटक सरकारने सर्व मुस्लिम समाजाचा समावेश ओबीसीमध्ये केला आहे. याचा अर्थ कर्नाटकमध्ये आता मुस्लिमांना सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले जात आहे. काँग्रेसने सर्व मुस्लिमांना ओबीसी कोट्यात टाकून ओबीसी बनवले आणि या समाजातील लोकांना दिलेले आरक्षण तोडले, असा आरोप मोदी यांनी केला. या निर्णयावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने कर्नाटक सरकारकडून स्पष्टीकरण मागवले.
भारतीय राज्यघटनेच्या कलम १६ नुसार प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळण्याची समान संधी असायला हवी. जात, धर्म, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला जाऊ शकत नाही. अनुच्छेद १६(४) अन्वये सरकारी सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळवू न शकणार्‍या मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्याचा अधिकार राज्याला आहे. मागासवर्गीयांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाविष्ट आहेत. बालाजी विरुद्ध म्हैसूर राज्य (१९६३) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, केवळ जातीच्या आधारावर समाजाच्या मागासलेपणाचा निर्णय होऊ शकत नाही. यामध्ये त्यांची गरिबी किंवा ते कुठे राहतात याचाही विचार करावा लागेल. टी. देवदशन विरुद्ध केंद्र सरकार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांच्या नोकर्‍यांमध्ये पुढील वर्षापर्यंत रिक्त पदे ठेवण्याचा नियम घटनाबाह्य ठरवला आहे. कोणत्याही वर्षी रिक्त पदे भरल्यामुळे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास हा नियम संविधानाच्या विरुद्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हा ५० टक्क्यांचा नियम कलम १६(४) अंतर्गत केलेल्या अस्सल आरक्षणांनाच लागू होतो.
आंध्र प्रदेशमधील मुस्लिमांना एससी/एसटी आरक्षण देण्याचा प्रयत्न हा एक पायलट प्रोजेक्ट होता. काँग्रेसला संपूर्ण देशात हा प्रयत्न करायचा होता. २००४ ते २०१० या काळात काँग्रेसने आंध्र प्रदेशमध्ये चार वेळा मुस्लिम आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सजगतेमुळे ते आपला हेतू पूर्ण करू शकले नाहीत, अशी टीका मोदी यांनी केली. हे सर्व संविधानाच्या मूळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे माहीत असतानाही काँग्रेसने राजकारण आणि व्होटबँकेसाठी अनेकविध प्रयत्न केले. मुस्लिम कोटा लागू करणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहे.
कर्नाटकमध्ये मुस्लिम लोकसंख्या १३ टक्के आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे आयोगाने म्हटले आहे की सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जाती आणि गटांकडे संपूर्ण धर्माच्या पातळीवर पाहिले जाऊ शकत नाही. कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजातील सर्व जाती आणि गट सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याचे विधान योग्य नाही. मुस्लिम समाजात काही वर्ग दीर्घकाळापासून वंचित आहेत आणि त्यांना समाजातच भेदभावाचे बळी बनवले गेल्याचे आयोगाने मान्य केले आहे. मात्र यात सरसकट सगळ्यांचा समावेश होत नाही. एकूणच प्रश्न गुंतांगुतीचा असला तरी आरक्षणाला विरोध आढळत आहे. मुस्लिम समाजात जातिव्यवस्था नाही, असे आयोगाने म्हटले आहे. परंतु व्यवहारात इस्लाम जातिवादापासून मुक्त आहे, असे ठामपणे सांगता येणार नाही. म्हणजेच या आरक्षणाचे विविध कंगोरे लक्षात घेऊन न्यायालयानेच निवाडा करणे आवश्यक आहे.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *