मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसात उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या आठवड्यात राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा सह अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तापामानात वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअस पार पोहोचलं आहे.
आज अकोला आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमान वाढ पाहायला मिळत आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामानाबाबत ताजी अपडेट दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत, काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज आहे. तसेच काही भागात गारपिटी होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, काही भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अकोला, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सोमवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या आठवड्या दरम्यान, महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागात आयएमडीने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांवर गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
