ठाणे : मुंबईहून ठाणेमार्गे वसई विरार, गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर नागमोडी घाट रस्ते आहेत. त्यामुळे घाटात अनेकदा वाहने बंद पडणे, तसेच पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असते. त्यामुळे या घाटरस्ता मार्गावरील चढण कमी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे; मात्र त्याला वन विभागाची अद्यापही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही या रस्त्यावर खड्डे व पाणी साचून कोंडीत भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई, ठाणे, उरण, गुजरात आणि नाशिक भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील घाटरस्त्याचे काम प्रस्तावित आहे. गोदामांच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी हा एक मार्ग आहे. या मार्गावर घाट रस्ता असून तिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. नागमोडी रस्ता असलेल्या घाटातील चढणीवर अनेक अवजड वाहने बंद पडतात आणि त्यामुळे कोंडी होते. त्यामुळे अनेकजण विरुद्ध मार्गावरून वाहतूक करतात. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडते. त्याचा परिणाम थेट शहरातील वाहतुकीवरदेखील होत असल्याचे दिसून येत असते. ही बाब लक्षात घेत ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५०० मीटर चढणीच्या रस्त्यावरील चढण कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला कार्यादेश दिले आहेत. असे असले तरी, हा रस्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात मोडत आहे. त्यामुळे या कामाची सुरुवात करण्यासाठी मंजुरी मिळावी, यासाठीचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवला आहे; मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात प्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे अद्याप परवानगी न मिळाल्याने घाट रस्त्याचे काम रखडलेले आहे.

नुकतीच ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात मेट्रो, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी गायमुख येथील घाट रस्त्याचे कामही वन विभागाच्या परवानगीमुळे सुरू होऊ शकलेले नसल्याची बाब समोर आली. या पावसाळ्यात हा मार्ग सुस्थितीत राहील, याची दक्षता बांधकाम विभागाने घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. मात्र, कामे वेळेत पूर्ण न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात घोडबंदरवरील गायमुख रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कार्यादेशाला वर्ष लोटले

घोडबंदर घाटात चेना पूल ते काजूपाडा भागात अनेक ठिकाणी चढ-उताराचा भाग आहे. येथे अनेक अपघात घडत असतात. अवजड वाहनेही रस्त्यावर बंद पडतात. त्यामुळे हा घाटमार्ग समांतर पातळीवर केला जाणार आहे. या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला कार्यादेश देऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला; मात्र अद्यापही वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे काम रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *