ठाणे : नेलेस इंडिया प्रा. लि.(पार्ट ऑफ वालमेट) या ठाणे जिल्ह्यातील, डोंबिवली आणि अंबरनाथ येथे कार्यरत असलेल्या आस्थापनांमधील ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सदस्यांचे स्नेहसंमेलन शुक्रवार, २ ऑगस्ट-२०२४ रोजी, अंबरनाथ येथील आनंद-सागर रिसॉर्टमध्ये पार पडले.
सुमारे वर्षभरापूर्वी संपन्न झालेल्या, कामगारांच्या त्रैवार्षिक करारात नमूद केल्याप्रमाणे, हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. गेल्या २५ ते ३० वर्षांत पहिल्यांदाच, अशाप्रकारचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आल्यामुळे, कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष बाब म्हणजे, दोन्ही आस्थापनांमधील कायम कामगारांसोबतच, कंत्राटी कामगार, सफाई कामगार यांच्यासह, व्यवस्थापनातील अधिकारीवर्ग आणि कर्मचारीवर्गदेखील मोठ्या उत्साहाने या संयुक्त स्नेहसंमेलनात सहभागी झाला होता. उल्लेखनीय बाब अशी की, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, ठाणे ते अंबरनाथ असा लोकल ट्रेनचा प्रवास करुन, आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. मुंबईची “लाईफ-लाईन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करताना राजन राजे यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर आणि सचिव समीर चव्हाण हेदेखील सहप्रवासी म्हणून उपस्थित होते. दरम्यान, या स्नेहसंमेलनात ‘नेलेस’ व्यवस्थापनाचे अध्यक्ष कुणाल भावसार, मॅनेजर नितेश पोतदार, एच. आर. रीना, प्रफुल्ल जोशी, मनीष लाहोटी, सेफ्टी इन्चार्ज कैलास कुंभार, स्वप्नील भागवत, ॲडमिन नितीन ढमे आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आदी मान्यवर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी राजन राजे यांनी, उपस्थित कामगार-कर्मचारीवर्गाला समयोचीत मार्गदर्शन केले, त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार प्रतिसाद दिला. या स्नेहसंमेलनाचे आयोजन युनियन युनिट कमिटी आणि सांस्कृतिक कमिटी यांनी संयुक्तपणे केले.
