Month: September 2024

गणेशोत्सव उत्कृष्ट सजावट स्पर्धेत स्वप्नील कळंबे प्रथम

माथेरान : स्व. संतोष पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्कृष्ट सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये स्वप्नील कळंबे यांनी वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनपटाची आकर्षक सजावट साकारली होती त्यास प्रथम क्रमांक मिळाला असून सागर जोशी यांनी प्रास्तावित रोपवे बाबत उत्तम देखावा सादर केला होता त्यास द्वितीय क्रमांक मिळाला असून पतसंस्थेचे माजी सभापती हेमंत पवार यांनी सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचा देखावा सादर केला होता त्यासाठी त्यांना तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. स्व.संतोष पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. येथील एका हॉटेलमध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये आणि मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम तसेच सन्मान चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले याचबरोबर विविध क्षेत्रात कामगिरी बजावणारे मान्यवर यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणारे शिक्षक योगेश जाधव आणि सुनील कदम यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ई रिक्षाचे जनक सुनील शिंदे,पुष्पा केरेकर आणि सह्याद्री मित्र आपत्कालीन सेवा संस्था यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांसह अन्य पत्रकार मित्र आदी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुसज्ज व्यवस्थेत सातव्या दिवशी 3086 बाप्पांना भावपूर्ण निरोप

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम विसर्जनस्थळी केलेल्या सुसज्ज विसर्जन व्यवस्थेमध्ये सातव्या दिवशी 3086 श्रीगणेशमूर्तींना भाविकांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात भावपूर्ण निरोप दिला. विशेष म्हणजे यात 333 शाडूच्या मूर्तींचा समावेश होता. पीओपी ऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-या गणेशभक्तांना विशेष प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 137 इतक्या मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात श्रीमूर्तींचे विसर्जन करणा-या 591 पर्यावरण जागरूक नागरिकांनाही कापडी पिशव्यांचे वितरण करून गौरविण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्याच्या आवाहनास पर्यावरण जागरूक नवी मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वच विसर्जन स्थळांवर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी विविध सोयी पुरविण्यात आलेल्या होत्या. नागरिकांना विसर्जनस्थळी निरोपाची आरती करण्यासाठी स्वतंत्र टेबलची पुरेशा संख्येने मांडणी करण्यात आलेली होती. निर्माल्य टाकण्यासाठी ओल्या व सुक्या स्वतंत्र निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ते संकलित निर्माल्य वाहून नेण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय कचरामुक्तीच्या दिशेने आणखी पुढचे पाऊल उचलत मुख्य विसर्जनस्थळांवर ‘फोर आर’ च्या अनुषंगाने चार डबे ठेवून जागरूकता करण्यात आली. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था होती तसेच आवश्यक विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था करण्यात आली होती. नैसर्गिक विसर्जन स्थळापासून नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्याठिकाणी वैद्यकीय पथके तैनात होती व विसर्जन व्यवस्थित रितीने व्हावे याकरिता आवश्यक संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स विभाग कार्यालयांमार्फत कार्यरत होते. यासोबत नमुंमपा अग्निशमन दलाचे जवानही सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष होते. कोपरखैरणे सेक्टर-19 येथील धारण तलावात आधुनिक स्वरुपाचा यांत्रिकी तराफा बसविण्यात आला असून त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग आकाराने मोठ्या व वजन जास्त असलेल्या गणेशमूर्तींसाठी झाला. सार्वजनिक गणेशोत्साव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या यांत्रिकी तराफ्याच्या आधुनिक सुविधेचे कौतुक केले. कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सुयोग्य व्यवस्था होती. 137 इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे तसेच सुसज्ज पोलीस यंत्रणेमुळे सर्व ठिकाणचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले. नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 2341 घरगुती तसेच 154 सार्वजनिक मंडळांच्या 2495 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 137 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 588 घरगुती तसेच 3 सार्वजनिक मंडळांच्या 591 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 2495 घरगुती व 591 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 3086 श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन सातव्या दिवशी सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 333 श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. यामध्ये – बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 277 घरगुती व 10 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 31 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 336 घरगुती व 26 सार्वजनिक तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 66 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 189 घरगुती व 14 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 48 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 302 घरगुती व 25 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 160 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले. कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 388 घरगुती व 30 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 107 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 465 घरगुती व 29 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 47 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 237 घरगुती व 7 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 104 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 147 घरगुती व 13 सार्वजनिक तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 25 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 159 विसर्जन स्थळांवर 3086 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. यापुढील विसर्जन सोहळा मंगळवार, दि.17 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून यादिवशी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व विसर्जन स्थळांवर असणारी यंत्रणा आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्षमतेने कार्यरत असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. वाहतुक पोलीस विभागाच्या वतीनेही वाहतुकीविषयी सूचना प्रसारित करण्यात येतील. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून अनेकांनी पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे तसेच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करून अनेक नागरिक पर्यावरण जपणूकीचा संदेश प्रसारित करीत आहेत. अशाच प्रकारचे सहकार्य अनंतचतुर्दशीदिनी होणा-या विसर्जनप्रसंगीही नागरिकांनी द्यावे व घराजवळच्या कृत्रिम तलावात श्रीमूर्तींचे शांततेने व भाविकतेने विसर्जन करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

पाग(चिपळूण) येथील गोरक्षनाथ तांबडे, पाडुंरंग तांबडे व रुपेश तांबडे यांच्या घरी स्थानापन्न झालेली श्री गणरायाची सुबक मूर्ती.

उल्हासनगरातील ४ मजली अवैध इमारतीवर पाडकाम कारवाई

उल्हासनगर : कॅम्प नं-२, सोनार गल्लीत उभी राहिलेली अवैध ४ मजल्याची इमारतीवर आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशानुसार पाडकाम कारवाई सुरू केली. अश्या अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे. उल्हासनगरात विना परवाना अवैध बांधकामे सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्याकडे आल्या आहेत. त्यापैकी कॅम्प नं-२, सोनार गल्लीत उभी राहिलेल्या ४ मजली अवैध इमारतीवर पाडकाम कारवाई करण्याचे आदेश आयुक्त ढाकणे यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह संबंधित प्रभाग अधिकाऱ्याला दिले. त्यानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली. अश्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे. कॅम्प नं-३ मधून वाहणाऱ्या वालधुनी नदी किनारी शांतीनगर व हिराघाट परिसरात अवैध शेड उभे राहिले असून गावडे शाळेजवळ अवैधपणे असंख्य खोल्या बांधण्यात येत आहे. तसेच महादेव कंपाऊंड व जुन्या डम्पिंग परिसरात अवैध बांधकामे उभे राहिल्याची चर्चा शहरात होत आहे. उल्हासनगर म्हणजे अवैध बांधकामाचे शहर असे समीकरण झाले आहे. अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर राज्य शासनाने अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी विशेष अध्यादेश काढला. त्यामध्ये वेळोवेळी बदल करून अतीधोकादायक इमारतीचा प्रश्न समाविष्ट करण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने, बांधकाम नियमित झालेल्या इमारतीची पुनर्बांधणी रखडली आहे. तर दुसरीकडे अवैध बांधकामावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप शहरातून होत आहे. सोनार गल्लीतील शौचालये गेले कुठे? कॅम्प नं-२, शिरू चौक ते सोनार गल्ली परिसरात चक्क महापालिका शौचालये भूमाफियांनी हडप करून अवैध बांधकामे उभी राहिली आहे. एकेकाळी सार्वजनिक शौचालयासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनार गल्लीत अपवादात्मक एखादे शौचालये शिल्लक राहिले आहे. तसेच शौचालये हडप करून बांधलेल्या अवैध बांधकामावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा

भव्या सोळंकीला विजेतेपद मुंबई : श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत निर्णायक क्षणी अचूक फटकेबाज खेळ करणारा विवा कॉलेज-विरारचा भव्या सोळंकी विजेता ठरला. पहिले दोन बोर्ड हातचे निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरला अंतिम फेरीत  भव्या सोळंकीने १५-० असे सहज नमविले. परिणामी सार्थक केरकरला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या-उपविजेत्यांना श्रीकांत चषक व स्ट्रायकर पुरस्कार देऊन माजी नगरसेवक ठाकूर सागर सिंह, उद्योजक शैलेश दलाल, तेजस शहा, संदीप आयरे, चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित विनाशुल्क कॅरम स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील ज्युनियर ४८ खेळाडूंनी भाग घेतला होता. कांदिवली-पूर्व येथील कानकश्री सभागृहामध्ये झालेल्या उपांत्य फेरीत पुष्कर गोळेने दमदार प्रारंभ करूनही उत्तरार्धात भव्या सोळंकीने त्याला १०-४ असे चकविले. सार्थक केरकरने श्रीशान पालवणकरचे आव्हान ७-३ असे संपुष्टात आणून अंतिम फेरी गाठली. उपांत्य उपविजेतेपदाचा पुरस्कार पुष्कर गोळे व श्रीशान पालवणकर यांनी; उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार वेदांत राणे, अथर्व म्हात्रे, प्रसन्ना गोळे, नील म्हात्रे यांनी आणि उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार अर्णव गावडे, तृशांत कांबळी, रेहान शेख, ओमकार वडार, अंश जाधव, अवैस खान, शेख अब्दुल, वेदांत पाटणकर यांनी मिळविला. शालेय-कॉलेज खेळाडूंच्या आग्रहास्तव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व सुमती सेवा मंडळ-दहिसरतर्फे माहीम ज्युवेनील स्पोर्ट्स क्लब सहकार्याने माजी केंद्रीय राज्य अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १६ सप्टेंबर रोजी आनंदराव अडसूळ अमृतमहोत्सवी चषक शालेय-कॉलेज प्रमुख ज्युनियर खेळाडूंची सुपर लीग कॅरम स्पर्धा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात येणार आहे. सुपर लीगमध्ये गणाधीश चषक व श्रीकांत चषक कॅरम स्पर्धेमधील १६ खेळाडूंना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सुमती सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पार्टे यांनी दिली.

 धाराशिवला राज्य किशोर, किशोरी चाचणीस सुरुवात

राज्यातून १३६ खेळाडूंचा सहभाग धाराशिव : ३४ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता मैदान निवड चाचणी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मैदानावर सुरु झाली. या चाचणीत राज्यातील विविध जिल्ह्यातून ६० किशोर व ७६ किशोरी असे १३६ खेळाडूंनी भाग घेतला आहे. यातून भारतीय खो खो महासंघाच्या वतीने ३४ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे किशोर व किशोरी संघ निवडण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धा  २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान झारखंड येथे होणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेबरोबर वडोदरा, गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला लीग करिता किशोरी संघ निवड होणार आहे. अशा प्रकारे किशोरीचे दोन संघ निवडण्यात येणार आहेत. अमोल मुटकुळे (हिंगोली), विशाल पाटील (जळगाव), राजाराम शितोळे (सोलापूर) व वर्षा कछवा (बीड) हे निवड समिती सदस्य महाराष्ट्राचे संघ निवडणार आहेत.  किशोर व किशोर संघाचे सराव शिबिर मुंबई येथे १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून चाचणीस सुरुवात झाली. यावेळी यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे चेअरमन सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, माजी सचिव संदीप तावडे, सहसचिव डॉ. पवन पाटील, डॉ. राजेश सोनवणे, कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार, धाराशिव जिल्हा खोखो संघटनेचे सचिव प्रवीण बागल आदी उपस्थित होते.

रक्षेतून वृक्षारोपणाने दिवंगताला श्रद्धांजली

मुरबाड : शहरालगतच्या टेंभरे (बु.) गावचे जेष्ठ ग्रामस्थ नंदा गौरू गायकवाड यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन जावई, दोन मुले, दोन पुतणी, दोन पुतणे व नऊ नातवंडे असा कटुंब असून तालुक्यात गायकवाड कुटुंबाचा मोठा गोतावळा असल्याने अंत्यविधी कार्याला मोठ्याप्रमाणात गर्दी होती. गावच्या वेशीवरील मुरबाडी नदीकाठी त्यांचा अंत्यविधी उरकल्यावर प्रेताची रक्षा नदीत न वाहता गायकवाड कुटुंबीयांनी सदर राखेतून पर्यावरण पूरक निर्णय घेतला. एरवी गावच्या स्मशानभूमीत दहन केलेल्या प्रेताची राख स्मशानभूमीच्या शेजारील मुरबाडी नदीत सोडली जाते. सदर नदीचा पाणी गावात दैनंदिन कामांसाठी वापरला जातो. तसेच गावातील जनावरे दररोज नदीवर पाणी पिण्यासाठी येत असून गावातील महिलांची दिवसभर कपडे धुवण्यासाठी नदीवर गर्दी असते. त्यामुळे प्रेताच्या राखेने नदीपात्र दूषित होण्याची संभावना असल्याने ती राख व वाहिलेली हार, फुले गोणींमध्ये भरून गायकवाड कुटुंबीयांनी नदीपात्रात न टाकता नदीकाठी खड्डे करून उपस्थितीतांच्या हस्ते त्यात जांभूळ, आंबा, वड, पिंपळ, फणस, करंज, कदंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यासाठी वापरली. त्यामुळे रोपांना खत मिळून निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागेल व हीच बाबांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना गायकवाड कटुंबियांनी व्यक्त केली. तर या निर्णयाने जुन्या अनिष्ट प्रथांचा नायनाट होण्यास मदत होऊन तालुक्यातून एक सामाजिक तथा वैज्ञानिक प्रबोधनाचा संदेश सर्वत्र जाईल व एका नवीन नैसर्गिक विचारसरणीचा पाया मुरबाड तालुक्यातून रोवला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

 ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे दुःखद निधन 

 ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष, एकता विनायक संस्थेचे उपनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मागाठाणे मित्र मंडळ, प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय अशा विविध संस्थांचे संस्थापक, आधारस्तंभ विजय दत्तात्रय वैद्य यांचे शनिवारी सकाळी  दुःखद निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा वैभव, विक्रांत, सुना प्रतिमा आणि अनघा, नातवंडे हर्षल आणि गौरी असा परिवार आहे. शुक्रवारी दिवसभर उपनगरचा राजा गणेशोत्सव मंडळाची आमंत्रणे वाटण्याचे काम त्यांनी केले होते. शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांची तिथेच प्राणज्योत मालवली. दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा एका सजवलेल्या रथातून ॲम्ब्रोसिया येथून निघाली. विजय वैद्य यांची कर्मभूमी असलेल्या जय महाराष्ट्र नगर येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. तेथे अंतीम इच्छेनुसार आजच्या सर्व वर्तमानपत्रे त्यांच्या पार्थिवा जवळ ठेवण्यात आली. बॅंड पथकाने भक्तीगीते वाजवून त्यांना मानवंदना दिली. हा स्वर्गरथ जय महाराष्ट्र नगर येथून बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमी येथे नेण्यात आला. सर्व वैदिक विधी पूर्ण करण्यात आले. ज्येष्ठ चिरंजीव वैभव याने पार्थिवाला शोकाकुल वातावरणात अग्नी दिला. ॲम्ब्रोसिया, जय महाराष्ट्र नगर आणि दौलतनगर स्मशानभूमी येथे सर्व स्तरातील लोकांनी उपस्थित राहून साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी, वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे यांचे प्रतिनिधी, विविध राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, रिक्षाचालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घरेलू कामगार असे सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.  विजय वैद्य यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पा. सामक जीवनगौरव पुरस्कार तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला होता. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. उपनगर साहित्य संमेलन सुद्धा त्यांनी भरविले होते.

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या  निषेधार्थ  आरपीआय आठवले गटाच्या वतीने शुक्रवारी मुंबईत आझाद मैदानात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष संजय पवार,जिल्हा सरचिटणीस शिरीष चिखलकर, जिल्हा उपाध्यक्ष…

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पालघरमध्ये निषेध

खासदार सवरा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने योगेश चांदेकर पालघरः लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारत विरोधी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने विक्रमगड येथील छत्रपती शिवाजी चौकात निषेध करण्यात आला. डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली या वेळी आंदोलन करण्यात आले. अमेरिकेने रशियाची शकले केली. रशियानंतर भारत हा जगातील मोठी शक्ती असून, तिला भारताची शकले करायची आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या या कूट कारस्थानाला हातभार लावण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा या वेळी खा. सवरा यांनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६१ मध्ये देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण रद्द करण्यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्राचा संदर्भ देऊन डॉ. सवरा यांनी पंडित नेहरू यांचा हा विचार विरोधामुळे कसा रद्द करावा लागला, हे सांगितले. पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत काँग्रेसचे सर्वच नेते कसे आरक्षण विरोधी आहेत आणि त्यांची नाटक कंपनी देशात एक आणि परदेशात वेगळेच नाटक कसे करत आहे, हे सांगून जनतेला आता काँग्रेसचा खरा चेहरा सांगितला पाहिजे, असे ते म्हणाले. संविधान डोक्यावर घेणाऱ्यांचे ढोंग उघडे राहुल गांधी लोकसभेत येताना संविधान डोक्यावर घेऊन येतात आणि लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कसे वचनबद्ध आहोत असे सांगतात. हे त्यांचे ढोंग अमेरिकेतील त्यांच्या वक्तव्याने उघडे पाडले आहे. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ आणि २०१९मध्ये प्रचंड बहुमत असतानाही आरक्षणाला कसा धक्का लागू दिला नाही, याचा उल्लेख करून खा. सवरा म्हणाले, की मोदी यांनी स्वतःच लोकसभेत सांगितले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी पुन्हा अवतरले, तरी आरक्षण बदलू शकत नाही, एवढे आरक्षण भक्कम आहे. विधानसभेत आरक्षणविरोधकांची सत्ता येऊ देणार नाही भारतात किंवा महाराष्ट्रात काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांची सत्ता येऊ द्यायची नसेल, तर त्या विरोधात जनजागृती करावी लागेल. जनतेला विश्वासात घ्यावे लागेल आणि आरक्षण संपवण्यास निघालेल्या या पक्षांना घरी बसवावे लागेल, असा इशारा डॉ. सवरा यांनी दिला. काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून त्याचा मुखवटा टराटरा पाडून आरक्षणाला विरोध करणाऱ्या या पक्षाला धडा शिकवला पाहिजे, असा ठाम निर्धार या वेळी त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता घरोघर जाऊन काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा कसा आहे, हे जनतेला पटवून द्यावे आणि आरक्षण विरोधक आता सत्तेत नको, अशी मानसिकता जनतेची तयार करायला हवी. अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण रद्द करायला निघालेल्या या काँग्रेसला आता कधीच सत्तेत येणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे ते म्हणाले.