डॉ. निर्मोही फडके यांच्या व्याख्यानाने होणार उद्घाटन

ठाणे  : राज्यभरात १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉ. निर्मोही फडके यांचे ‘जगू मराठीचे रंगी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सोमवारी, कै. नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी उपस्थित होते.
ग्रंथदिंडी व पुस्तक प्रदर्शन
या पंधरवड्यात, सोमवार, २० जानेवारी रोजी स. १०.३० ते स. ११.३० या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर, प्राच्य विद्या संस्थेच्या सहकार्याने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्याचवेळी, सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची संधी मिळेल.
पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येतील. तसेच, पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार, २० आणि मंगळवार २१ रोजी स. १० ते सायं. ६ वाजेपर्यंत खुले राहील.

महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या स्पर्धा

बुधवार, २२ जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध, सुलेखन (हस्ताक्षर), शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या पंधरवड्याच्या काळात, शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे

प्रा. प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि समारोप

मंगळवार, २८ जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ केै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल. त्यात, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिेके देण्यात येतील. त्यानंतर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल. हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *