काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्या निवासस्थानी एक चोर शिरला. चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या या चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. नंतर लगेचच हा हल्लेखोर पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू झाला, आणि लगेचच काही तासात आकाश कनोजिया नामक व्यक्तीला रेल्वेतून पकडण्यात आले.
आकाशला पकडण्यात आले हे दृश्य सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वारंवार दाखवले. आकाशला अटक केली. त्याला न्यायालयात नेले. त्याची चौकशी सुरू आहे, यावर २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी सातत्याने वृत्तही दाखवले, आणि त्यानिमित्ताने आकाशचा चेहराही सातत्याने दाखवला गेला.
नंतर २ दिवसांनी खरे आरोपी पकडले गेले. त्यावेळी आकाश कनोजिया निर्दोष आहे हे सिद्ध झाले, आणि त्याला सोडून देण्यात आले. हे वृत्तही सर्वत्र प्रसारित केले गेले.
मात्र निर्दोष सुटलेल्या आकाशने काही दिवसांनी माध्यमांकडे तक्रार केली की यामुळे माझी बदनामी केली गेली आहे. परिणामी माझी नोकरी गेली आणि माझे ठरलेले लग्नही मोडलेले आहे. माझ्या कुटुंबीयांना देखील या प्रकरणात हकनाक त्रास झाला आहे. याप्रकरणी आपण दाद मागण्यासाठी सैफ अली खान याच्या घरासमोर या आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्याने केलेली आहे.
त्याच्या या घोषणामुळे खळबळ माजणे सहाजिकच आहे. यानिमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. त्याचा आपण कधी विचार करणार आहोत का हा मुद्दाही आपण कुठेतरी विचारात घेतला पाहिजे.
इथे प्रश्न असा निर्माण होतो की कारण नसताना आकाश या प्रकरणात बदनाम झाला. त्याला कारण असे होते की सीसीटीव्ही मध्ये आरोपीचा जो चेहरा दिसत होता त्या चेहऱ्याशी आकाशचा चेहरा मिळता जुळता होता. मात्र आकाशच्या म्हणण्यानुसार मला मिशी आहे आणि कथित आरोपीला मिशी नव्हती. तरीही चेहऱ्यात साम्य दिसते म्हणून मला अटक करण्यात आली. खरे तर एकसारखे दिसणारे किमान सात चेहरे तरी पृथ्वीतलावर उपलब्ध आहेत असे एका ठिकाणी नमूद करून ठेवले आहे. आपण अमिताभ बच्चनचा डमी बघितला होताच ना. मला आठवते, कॉलेजमध्ये शिकत असताना मला नागपूरच्या विद्यापीठ ग्रंथालयात एक जया भादुरीसारखी दिसणारी मुलगी दिसली होती. तो जमाना जया भादुरीचा होता. त्यामुळे काही दिवस मी तिच्या मागे सायकलनेही फिरत होतो. मात्र पुढे जाऊन या मुलीचे लग्न झाले आणि ती नागपूरसोडून गेली तर सांगायचे तात्पर्य असे की एक सारखे अनेक लोक दिसतात. त्यामुळे इथे पोलिसांनीही थोडे तारतम्य बाळगायला हवे असे सुचवावेसे वाटते.
आणखी एक मुद्दा इथे नमूद करावासा वाटतो मान्य आहे की सैफ अली खान हा एक मान्यवर अभिनेता आहे. म्हणून त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचे आठ दिवस सतत थेट प्रक्षेपण करण्याची गरज काय? आमच्या देशात जेव्हापासून २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या सुरू झाल्या आहेत तेव्हापासून हे प्रकार सातत्याने होत आहेत. आम्ही कोणत्याही छोट्याशा गोष्टीचा मोठा बाऊ करतो आणि त्याचे दिवसचे दिवस लाईव्ह टेलिकास्ट करतो. मला आठवते काही वर्षांपूर्वी एका विहिरीत एक लहान मुलगा पडला. या मुलाला बाहेर काढण्यासाठी दोन दिवस प्रशासनाला धडपड करावी लागली, ते दोन्ही दिवस त्या प्रकाराचे थेट प्रक्षेपण देशातल्या सर्व वृत्तवाहिन्यांनी केले होते. त्याच काळात गुजरातेत एका कुटुंबात सुनेला सासू-सासरे छळत होते. नवराही लक्ष देत नव्हता, म्हणून त्या विवाहित सुनेने पोलिसात तक्रार केली. मात्र सासरच्यांच्या दबावामुळे की काय, पण पोलीस दखल घेत नव्हते. शेवटी त्या विवाहितेने अंगातली सर्व वस्त्र उतरवून फक्त अंडरवेअर आणि ब्रेसीयरवर धावत पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाण्याचा मार्ग पत्करला. त्यावेळी सर्व वृत्तवाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून हे वृत्त दाखवले आणि लाखो प्रेक्षकांनी चविष्ट पणे ते दृश्य बघितले. इथे लाखो प्रेक्षक बघतात आणि वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढतो म्हणून वृत्तवाहिन्या खुश होत्या, आणि काहीतरी वेगळे बघायला मिळाले म्हणून आंबटशौकीन प्रेक्षक खूष होते. मात्र एका महिलेची अब्रू अशी चव्हाट्यावर टाकली जाते आहे याचे वैषम्य ना त्या वृत्तवाहिनीच्या छायाचित्रकाराला होते, ना संपादकाला, न बघणाऱ्या प्रेक्षकांना. हे बघता आपल्या समाजाची वैचारिक आणि भावनिक पातळी किती घसरली आहे याचा अंदाज लावता येतो.
सैफ अली खान च्या बाबतीत नेमके हेच झाले. त्याच्या घरात चोर शिरला त्याने सैफ वर हल्ला केला. तो चोर पळून गेला सैफ जखमी अवस्थेत रिक्षाने लीलावती हॉस्पिटल मध्ये गेला. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. ५ दिवस राहून तो घरी परतला. २५ वर्षांपूर्वीची परिस्थिती असती, तर दूरदर्शनवर एका किंवा दोन बुलेटिन मध्ये हे वृत्त दाखवले गेले असते. वृत्तपत्रातही दोन किंवा तीन कॉलमची बातमी आली असती. दोन-तीन दिवस त्याच्या प्रकृती बद्दल माहिती देणारी बातमी जरूर आली असती. मात्र हळूहळू आकार कमी होत ती बातमी सिंगल कॉलम वर आली असती. वाचकांनी इतर बातम्यांच्या गोंधळात कदाचित ती सिंगल कॉलम बातमी वाचलीही नसती. काही दिवसांनी सर्वसामान्य लोक ही घटना दिसूनही गेल्या असते.
मात्र आजकाल प्रत्येक गोष्टीचा इशू केला जातो. सैफला लीलावतीमध्ये नेल्यावर त्याला नेणाऱ्या रिक्षावाल्याला शोधून त्याच्या वारंवार मुलाखतीत दाखवल्या गेल्या. त्याच्या इमारतीतले सीसीटीव्ही फुटेज वारंवार एक्सक्लुझिव्ह बातमी म्हणून दाखवले गेले. आकाश कनोजिया हा तर पुढचा आरोपी सापडेपर्यंत सातत्याने दाखवला गेला. यावेळी आपण एखाद्याला आयुष्यातून तर उठवत नाही ना याचे भान कोणालाही नव्हते. त्यातूनच आकाश सारख्या निरपराध माणसाची आणि त्याच्या कुटुंबाची नाहक बदनामी केली जात आहे याचे कोणालाही भान नव्हते. आज आकाश कनोजिया याची नोकरी सुटली आहे, त्याचे ठरलेले लग्न मोडले आहे. सध्या तरी त्याला कोणीही दुसरी नोकरी देणार नाही. तसेच त्याला कोणी मुलगीही देणार नाही. म्हणजेच त्याचे आयुष्य आज तरी बरबाद झालेले दिसते आहे. त्याच्या कुटुंबालाही नाहक मनस्ताप झाला आहे. मात्र त्याचे सोयर सुतक ना सैफ अली खानला आहे, ना पोलिसांना, ना वृत्तवाहिन्यांना.
वृत्तवाहिन्यांच्या या अति उत्साही थेट प्रक्षेपणामुळे हकनाक एका नवजवान तरुणांचे आयुष्य बरबाद झाले आहे, याचा आज २४ तास बातम्या दाखवणाऱ्या आणि टीआरपी मिळतो म्हणून खूष असलेल्या वृत्तवाहिन्यांनी कुठेतरी विचार करायला हवा. समाजानेही त्यांना उघडा डोळे बघा नीट हे ठणकावून सांगायला हवे.
खरे तर यानिमित्ताने खरोखरी २४ तास वृत्तवाहिन्यांची गरज आहे का याचाही विचार व्हायला हवा. आपल्या देशात खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या सुरू होण्यापूर्वी फक्त दूरदर्शन होते. दूरदर्शनवर दिवसातून तीन किंवा चार वार्तापत्रे दाखवली जात होती. त्यात दिवसभरातील घटनांचा आढावा घेतला जायचा. नंतर खाजगी वाहिन्या सुरू झाल्या त्यावरही दिवसभरात तीन किंवा चार वार्तापत्रेच होती. नंतर दर तासाला पाच मिनिटाची वार्तापत्र सुरू झाली. इथपर्यंत ठीक होते. माझ्या आठवणीनुसार १९९९ साली आज तक ची पहिली २४ तास वृत्तवाहिनी सुरू झाली. नंतर हळूहळू सर्वांच्याच वृत्त वाहिन्या सुरू झाल्या .आज सर्वच भाषांमध्ये असलेल्या वृत्तवाहिन्यांची संख्या भाषानिहाय दोन आकड्यांमध्येच आहे. त्यांना प्रत्येकाला प्रेक्षक हवा आहे. त्यामुळे ते कसेही करून मसालेदार बातमी दाखवायची ही स्पर्धा करीत असतात. त्यातूनच असे प्रकार घडतात. मात्र यातून अनेकदा कोणाच्यातरी आयुष्याचे आपण नुकसान करतो याचे भान त्यांना नसते. त्यामुळे आता याचा विचार प्रेक्षकांनीच करण्याची वेळ आली आहे. प्रेक्षकांच्या हातात दूरदर्शनसंचाचा रिमोट कंट्रोल आहे. अशा जीवघेण्या बातम्या दाखवणाऱ्या वृत्तवाहिनीवर आता प्रेक्षकांनीच रिमोट चा वापर करून बहिष्कार घालायला हवा. तरच असे प्रकार थांबतील आणि आकाश सारख्या अनेक निरपराधांचे बरबाद होणारी आयुष्यही वाचतील.