केवळ बिरसा मुंडा यांची जयंती पुण्यतिथी साजरी करु नका, आदिवासी बांधव आपलेच आहेत, आपल्याच देशात वास्तव्य करतात. त्यांच्या भागातही विकासाची गंगा पोहोचविण्याचे भगीरथ कार्य करण्याची मनीषा बाळगून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. केवळ सबका साथ सबका विकास’सबका प्रयास सबका विश्वास ही राणा भीमदेवी थाटाने घोषणा देण्याऐवजी आदिवासी भागात राज्यकर्त्यांनी कंबर कसून काम करण्याची गरज आहे, ही जाणीव आम्हाला आदिवासी भागात फिरतांना मनोमन होत होती. मनात एक संकल्पना निर्माण झाली होती आणि अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय येथून १९७२ साली जुन्या अकरावी या माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ग्रुप मधील मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने ठरविलेल्या दिवशी आदिवासी आश्रमशाळांना भेटी द्यायचा योग आला. आज वयाच्या सत्तरीत असलेलो आम्ही सर्व काहीशा उत्सुकतेने आणि कसं असेल ह्या आदिवासी पाड्यांवरील जीवन आणि शाळा एक वेगळाच अनुभव अनुभवण्यासाठी निघालो होतो. सोबत तेथील आश्रम शाळेतील छोट्या छोट्या चिमुकल्यांना काही ना काही द्यावं ह्या इच्छेने शालेय साहित्यांची गाठोडी सोबत घेतली होतीच…..!
बस मधुन जातांना जसजसा दुर्गम भाग दृष्टीक्षेपात पडू लागला तसतसं औत्सुक्य वाटू लागलं की काय खरंच ह्या ठिकाणी शाळा असतील…! शेवटी छोटी छोटी आदिवासी पाडी दिसू लागली. पाड्यांवर उतरल्यावर आजूबाजूला रहात असणाऱ्या आदिवासी लोकांच्या उत्सुकतेने भरलेल्या डोळ्यांनी नजरा आमच्यावर लागल्या होत्या. आजूबाजूला त्यांची तरटं आणि बांबुच्या झोपड्या तर काही पक्क्या विटांची निवासस्थाने होती. कोंबड्या, बकऱ्या आणि त्यांच्या पिलांची तर सभोवताली उपस्थिती आणि कुठेतरी कोपऱ्यात पाण्यासाठी छोट्याशा विहिरी दिसत होत्या, आजूबाजूला रानफुलं आणि काटेरी झाडा- वेलींचे अस्तित्व दिसुन येतं होतं. पुढे पुढे जात असता तुरळक तुरळक अशी शेतं आणि त्यांच्या शेजारून जाणाऱ्या छोट्या ‘पगदंड्या’ आणि त्यावरूनच चालत जाऊन त्या शाळांमध्ये प्रवेश होत होता. मनात विचार आला काय ह्या दगड-माती भरलेल्या छोट्या पाऊल वाटेवरूनच ही चिमुकली पावलं शाळेत जात असतील नाही….! काही अनवाणी पायांनी तर काही साध्या सपाता घालून…..!
शाळेत प्रवेश करताच शाळेच्या संचालक आणि शिक्षकांनी सुहास्यवदनाने स्वागत केले. चहा-पाणी देऊन मुलांना आमची ओळख करून दिली. आमच्या भेटीचा उद्देश त्यांना सांगितला. त्या छोट्या मुलांनीही आमचे स्वागतपर स्तवन करून आणि स्वतः रानफुलांनी तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन आमचे स्वागत केले. ते पाहून एक अप्रूप आणि कौतुक त्यांच्या विषयी मनी दाटून आले. कोणताही बडेजावपणा नाही वा कोणतीही कृत्रिमता नाही. फारच मनाला भावल्या ह्या गोष्टी…..! ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एकंदरीत सहा आश्रमशाळांना आम्ही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे तेथील शिक्षकवर्ग आणि छोट्या विद्यार्थ्यांनी आमचं स्वागत केलं.
वयाच्या सत्तरीतील आमच्या टीमला पाहून तेथील शिक्षकवर्ग आणि संचालक ह्यांनाही आमच्याबद्दल फार कौतुक वाटलं. त्यांच्या भाषणात त्यांनी त्याविषयीं स्तुतीपर उल्लेख ही केला. आणि आम्हालाही आमच्या बालपणातील ती शाळा ते शालेयपण आठवलं. फ्रॉक मधील त्या दोन छोट्या रिबन बांधलेल्या वेण्या, कंबरेला हाफ विजार हाफ शर्ट व चेहेऱ्यावरील बालपणाची निरागसता सारं सारं कसं त्या लहान मुलांना पाहून डोळ्यांसमोर तरळत होतं. आजचा तो सुटा-बु्टातला गळ्याला टाय लावलेला शहरी बालविद्यार्थ्यांपेक्षा येथला हा आदिवासी बालविद्यार्थी मनाला आपलासा वाटत होता, भावला होता. वर्गात बेंच वा टेबल खुर्च्या नसतांनाही वर्गात खाली रांगेत शिस्तीने गलका न करता बसणे, शिक्षकांची आज्ञा पाळणे येथे कसोशीने जाणवत होतं. वर्गातील भिंतीवर सुंदर सुविचार सभोवती लिहिलेले दिसत होते. विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस आहे हा एका वर्गातील भिंतीवरील सुविचार मला फार आवडला….!
प्रत्येक शाळेत गेल्यानंतर त्या चिमुकल्या मुलांच्या नजरा औत्सुक्याने आमच्या हातातील गाठोड्यांवर पडत होत्या आणि जशी गाठोड्यातील दप्तरं व शालेय वस्तू त्यांना मिळत होती त्या ते कोणताही गलका वा झुंबड न करता, पाडापाडी केल्याशिवाय घेत होते त्यांत त्यांचा तो निरागस चेहेरा आनंदाने उत्सुकतेने हर्षित होत होता. आणि त्या वस्तू आम्हीच त्यांना देतांना पाहून नकळत त्या वस्तू आम्हालाच मिळत आहेत, असा भाव आमच्याही चेहेऱ्यावर उमटत होता. दुसऱ्याला देण्यात काय आनंद असतो. तो आज आम्ही अनुभवत होतो….! हातात पडलेल्या वस्तू पाहून ती चिमुकली मुले त्या न्याहाळण्यात इतकी हरखून गेली की आम्हाला ही विसरून गेली. मी मात्र त्यांच्या चेहेऱ्यावरील समाधानी निरागस भाव कॅमेऱ्यात टिपत बसलो….!
येथील शाळांमधील शिक्षक-शिक्षिकांचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल. आदिवासी, अशिक्षित, अडाणी अशा सभोवतालच्या समाजातील त्यांच्या मुलांवर सर्व प्रकारचे संस्कार करून अंगी शिस्त बाणवून त्यांना शिक्षणाची गोडी लावून शिक्षित करणे एवढे सहज सोपे नाही हे तेथील अल्पशा वास्तव्याने आढळून आले. करमणूकीचे खेळ, हस्तकला, रांगोळ्या सारखे कलात्मक शिक्षण त्यांना देणे खरंच कौतुकास्पद आहे. येथे दुपारच्या जेवणाला विद्यार्थ्यांना मिळणारे अन्न निव्वळ वरण-भात एवढ्यावरच समाधान मानून खावे लागते. मात्र त्यासाठी ही लागणाऱ्या चिमूटभर मीठ आणि जीऱ्याचा पै न पै चा हिशोब राज्यकर्त्यांना द्यावा लागतो, मात्र देशातील संपत्ती लुबाडून पळणाऱ्या वृत्तीचा कोणी हिशोब ठेवत नाहीत, ही विदारक वस्तुस्थिती येथे दिसुन आली. येथील एका वर्गावर गोड रसाळ पपई देऊन तेथील शिक्षकांनी आमचं आगळंवेगळं आदरातिथ्य केलं. खरंच परिसरातील पपईच्या झाडावरील पपईचे आदरातिथ्य आम्हाला फारच भावलं, कोणताही मोठा खर्चिक बडेजावपणा नाही. केवळ प्रेमळ भावनेने आदराने केलेला अल्पोपहार……!
असा हा आदिवासी आश्रमशाळा अनुभव घेऊन समाधानाने सर्व शिक्षक-शिक्षिकांचा आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन आम्ही परतलो….. अर्थात, आदिवासी भागात विकासाची गंगा केंव्हा पोहोचेल याचाच मनामनात आमच्या भेडसावत होता विचार !
(लेखक हे मुंबई येथील सर ज. जी. कला महाविद्यालय येथील सुवर्णपदक विजेते चित्रकार आहेत )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *