राही सरनोबतचे सोनेरी पुनरागमन

पिस्तुलात बिघाड होऊनही

25 मीटरमध्ये मारली बाजी

डेहराडून ः  आजारपणामुळे जवळजवळ दोन वर्षे स्पर्धात्मक नेमबाजीपासून दूर असलेली कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सोनेरी वेध घेत शानदार पुनरागमन केले. सातव्या फेरीत राहीच्या पिस्तुल बिघाड होऊनही संयमी खेळ करीत तिने सुवर्ण यशाचा अचूक निशाणा घेतला.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशुल शूटिंग रेज राहीच्या यशाने जय महाराष्ट्राने दुमदुमली. अनुभवी राहीने 25 मीटर पिस्तुल प्रकारातील अंतिम लढतीत 35 गुणांनी सुवर्णपदकाचा वेध घेतला. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या राही हिने चौथ्या फेरीपासून आघाडी घेतली. सातव्या फेरीत राहीच्या पिस्तुलात थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता. त्याकडे दुर्लक्ष करीत तिने शेवटपर्यंत संयम दाखवित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या तांत्रिक बिघाडाच्या वेळी सिमरन हिने राही हिला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र राहीने पिस्तुलाच्या बिघाडानंतरचे दोन्ही नेम अचूक साधले आणि आपली विजयी आघाडी कायम ठेवली.
राहीच्या सोनेरी पुनरागमनाचा आनंद पदक वितरण समारंभातही प्रकटला. महाराष्ट्रातील चाहत्यांनी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करीत तिचे अभिनंदन केले. अनेक दिवसांनंतर यश मिळतयं याचा आनंद असला, तरी आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेसाठी माझी तयारी सुरू आहे. माझ्या खेळात काही बदल करून आता देशासाठी पदक जिंकण्याचे माझे ध्येय असेल, असे राहीने सांगितले.
समरन प्रीत कौर ब्रार (पंजाब) व टी. एस. विद्या (कर्नाटक) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या रिया थत्ते हिने चौथा क्रमांक पटकाविला. जुलै 2022 ते मे 2023 या कालावधीमध्ये कोरोनाच्या आजारपणामुळे एक वर्षे राही ही पूर्णपणे अंथरुणावरच होती. त्यावेळी तिची नेमबाजीची कारकीर्द संपुष्टात येणार की काय अशी भीती निर्माण झाली होती. ऑक्टोबर 2023 पासून तिने सुरुवातीला काही मिनिटे सराव सुरू केला त्यानंतर तिने सन 2024 ऑलिंपिक मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ही संधी हुकल्यानंतर तिने पुन्हा आपल्या तंदुरुस्तीवर अधिक लक्ष केंद्रित केले.
गतवर्षापासून राहीने आपल्या तांत्रिक कौशल्यामध्ये परिपूर्णता आणण्यावर भर दिला. त्यामुळेच तिला येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अव्वल यश मिळवता आले. ती सध्या पुण्यातील बालेवाडीत सराव करीत आहे. 2011 मध्ये रांची येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने पहिल्यांदा भाग घेतला होता. त्यानंतर आजपर्यंत तिने अनेक पदके जिंकली आहेत. आय एस एस एफ जागतिक चषक मालिकांमध्ये  चार सुवर्ण, एक रौप्य व दोन कास्य पदके तिने जिंकली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्य, तर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एक सुवर्ण व एक कांस्यपदक अशी तिने कमाई केली आहे. दोन वेळा तिने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *