बोटे मोडण्याचे विज्ञान…

आजीच्या काळात बाळाला दृष्ट लागली असेल म्हणून त्याच्या डोक्याला हात लावून ती आपल्या कानांच्या वरच्या बाजूला बोटे मोडीत असे. आवाज आला तर दृष्ट लागली असेल असे मानले जायचे. एखाद्याला त्याच्या काही कामाबद्दल शिव्याशाप द्यायचे असतील तरीही त्या व्यक्तीच्या नावाने बोटे मोडली जायची. आपण चारचौघात बसलो असताना बोटे मोडली जाण्याच्या आवाजाकडे फारसे कुणाचे लक्ष जात नसे. पण आपण केवळ बोटेच मोडतो का? तर असे नसते. शरीर आळसावले असेल तर आपण शरीराच्या वरच्या भागाला किंवा मानेला थोडा झटका देतो. ‘कट’ या बारीकशा आवाजाने शरीर किंवा मान काहीशी सैल होते.
बोटे मोडण्याची क्रिया समाधान होण्याची म्हणून सामान्य समजली जात असली तरी शरीरात त्यामुळे काय होते हे समजावून घेणे गरजेचे आहे. शरीरात अनेक सांधे असतात, तेथे काही कारणामुळे हालचाल योग्य होत नसेल तर मेंदू आपल्याला त्या सांध्याशी संबंधित भाग हलवण्याची सूचना करतो. सांधे बोटांचे असतील तर आपण बोटे मोडतो अथवा मान अथवा कंबर असा भाग असेल तर या भागाला जरासा झटका दिला जातो. ही क्रिया चारचौघात करणे चांगले समजले जात नसले तरी ही क्रिया करण्यासाठी विचार करावा लागत नाही तर ती आपसूक होते.
आपण जेव्हा बोटे मोडतो तेव्हा शरीरात काय होते हेही समजून घ्यावे लागेल. बसल्यानंतर एकाएकी उठावे लागले तर पाठ आणि कंबर आखडते. अशा वेळी थोडासा झटका दिला की आपल्याला बरे वाटते. यावेळी कदाचित आवाज येणार नाही. बोटे मोडण्याचा आवाज हा आपला नेहमीचा सोबती असला तरी त्याचा अजून फारसा वैज्ञानिक शोध घेतला गेला नाहीय. बोटांचे अथवा शरीराचे इतर सांधे असे मोडल्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो असे म्हटले जात असले तरी त्यात तथ्य असते का? आणि बोटे मोडल्यानंतर आपले समाधान का होते? हा दुसरा असे प्रश्न मनात येतात.
जीवनशैलीशी संबंधित संधिवातासारख्या रोगांचे तज्ञ क्लोदाघ टूमे म्हणतात की आपली हाडे एकमेकांवर घासली गेल्यामुळे हा आवाज येत नसून कॅव्हिटेशन नावाच्या प्रक्रियेमुळे येतो. आपल्या अनेक सांध्यांमध्ये सायनोव्हियल नावाचा एक द्रव असतो. या द्रवामुळे सांध्यांना वंगण आणि आधार मिळतो. सांधा ओढला जातो अथवा फिरतो तेव्हा आतला दाब एकाएकी कमी होतो आणि द्रवात विरघळलेले वायू फुग्याचे रूप घेतात. आपण बोटे मोडतो तेव्हा असे फुगे तयार होतात आणि फुटतात. त्याचाच हा आवाज असतो. त्यामुळे अशा रीतींने बोटे अथवा सांधे मोडणे यात कोणत्याही संधिवाताची शक्यता नसते.
बोटे मोडली की आपल्याला बरे का वाटते या प्रश्नाचे उत्तर असे की सांधा ओढला गेल्यामुळे त्यांचा कडकपणा कमी होतो. अशा थोड्या हालचालीमुळे वेदना असतील तर त्या कमी होऊन बरे वाटते. आणि यामधून मेंदूला एक प्रकारचे बक्षीस मिळत असल्याने तोही खुश होत असल्याने हळूहळू ही सवयदेखील लागू शकते.
प्रसन्न फीचर्स

काहीतरी नवीन…

श्याम तारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *