Month: March 2026

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नगरसेविका अर्चना पाटील यांच्याकडून निवेदन आरती परब दिवा: साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 हिंदू नव वर्ष शोभायात्रेतून संस्कृती जतन आणि प्रसाराचा प्रामाणिक प्रयत्न

हिंदू नव वर्ष शोभायात्रेतून संस्कृती जतन आणि प्रसाराचा प्रामाणिक प्रयत्न मुंबई :  गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणारी हिंदु नववर्ष शोभायात्रा ही केवळ मिरवणूक नसून आपल्या संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या परंपरा, वेशभूषा, वाद्ये आणि गुढी उभारण्याची परंपरा समाजासमोर जिवंत ठेवण्याचे हे माध्यम ठरले, अशा शब्दांत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे यांनी वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लब चे राकेश गजानन वायंगणकर यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचा गौरव केला. जेष्ठ पत्रकार कै. विजय वैद्य आणि कर्ममूर्ती श्री महादेव रानडे यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली ही शोभायात्रा समाजातील एकात्मता आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारी ठरली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत एकतेचा सुंदर संदेश दिला.  लेझीम, ढोल, लाठीकाठी, बाईक रॅलीमुळे शिस्त व संघभावना वृद्धिंगत झाली. किंबहुना ती तरुण पिढीला योग्य दिशा देणारी ठरली. बोरीवली पूर्व येथील वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या सौ. पल्लवी राकेश वायंगणकर,  रुचिता व  हर्षिता वायंगणकर यांच्या नियोजनातून ही भव्य दिव्य शोभायात्रा निघाली. या स्पोर्ट्स क्लब तर्फे लाठीकाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जात असताना मुलांचे मनगट आणि हृदय देव, देश आणि धर्मासाठी प्रखर व्हावे हेच ध्येय समोर ठेवण्यात येते. शंखनाद, ढोल-ताशे आणि भगव्या ध्वजांनी परिसर दुमदुमला. अजय गजानन वायंगणकर व पूजा अजय वायंगणकर यांच्या शंखनादाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. सुविद्या प्रसारक संघाचे मंगुभाई दत्ताणी हायस्कूल  येथील विद्यार्थी, ढोल-ताशा व लेझीम पथकांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. मुख्याध्यापिका सुनिता कामटे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विनोद जाधव यांचे योगदान यासाठी मोलाचे ठरले. स्थानिक महिला, संस्था, मंडळे आणि ओम साई सेवा मंडळ यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य दिव्य झाला.

विलेपार्ले येथील कामगार मेळाव्याला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विलेपार्ले येथील कामगार मेळाव्याला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती मुंबई प्रतिनिधी: भाजपा कामगार आघाडी, मुंबई यांच्या वतीने आयोजित कामगार मेळावा व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विलेपार्ले येथील विश्वकर्मा बाग सभागृहात भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी तसेच भाजपा मुंबई सचिव आचार्य पवन त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर यांची मुंबई उपाध्यक्ष, विश्वकर्मा बाग चे अध्यक्ष तसेच सुतार-कारपेंटर समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे तुषार कथ्रेचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले संजय पराडकर यांची मुंबई सचिव, तसेच फेरीवाल्यांच्या समस्यांसाठी कायम अग्रेसर असलेले प्रकाश वाकाणी यांची मुंबई उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बीमल बुटा, प्रवीण बोरानिया, निलेश परब आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा मुंबईच्या नव्या नियुक्तीनंतर कामगार आघाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच मेळावा ठरला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. आमदार पराग अळवणी म्हणाले, ‘भाजपा कामगार आघाडी ही केवळ संघटना नसून कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी एक मजबूत शक्ती आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्य अधिक बळकट करून कामगारांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवाव्यात.’ आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले, “भाजपाचे प्रत्येक कार्यकर्ते हे समाजाशी जोडलेले आहेत. कामगार आघाडीच्या माध्यमातून आपण कामगारांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करणे आवश्यक आहे.’ कामगार नेते अभिजीत राणे म्हणाले, ‘मुंबईतील कामगार वर्गाच्या सशक्तीकरणासाठी भाजपा कामगार आघाडी कटिबद्ध आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर आपण अधिक व्यापक स्तरावर कामगारांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करू.’ कार्यक्रमास मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

साडी ते स्ट्रक्चर्ड स्टाईल… ‘AFEW’ने रॅम्पवर घडवला नवा ट्रेंड

मुंबई – भारतीय फॅशनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे प्रख्यात डिझायनर राहुल मिश्रा यांनी आपल्या कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण करत यंदाच्या मार्चमध्ये लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावर ‘AFEW’ या ‘प्रेट’ (ready-to-wear)…

 मध्य रेल्वे तिकीट चेकिंग परिवाराचा हिंदू नववर्ष स्वागत सोहळा उत्साहात

मध्य रेल्वे तिकीट चेकिंग परिवाराचा हिंदू नववर्ष स्वागत सोहळा उत्साहात मुंबई : मध्य रेल्वेच्या “तिकीट चेकिंग परिवार”तर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला १८ मार्चला माटुंगा (पूर्व) येथील मध्य रेल्वे ऑफिसर्स क्लब हॉलमध्ये हिंदू नववर्ष…

अशोक खरात प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी या धोकादायक संगनमताचे उदाहरण – संजय बनसोडे

अशोक खरात प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी या धोकादायक संगनमताचे उदाहरण – संजय बनसोडे अनिल ठाणेकर पुणे : नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणे ही मोठी चूक ठरेल. हे प्रकरण म्हणजे “सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी” या धोकादायक संगनमताचे स्पष्ट उदाहरण आहे. समाजातील असुरक्षितता, भीती आणि विविध समस्यांचा गैरफायदा घेत, तथाकथित अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे व सामान्य लोकांचे शोषण कसे केले जाते, याचे हे गंभीर चित्र आहे. या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की अशा प्रकारची बुवाबाजी एकट्या व्यक्तीच्या जोरावर उभी राहत नाही. त्यामागे सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता, त्याच्या मागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केली आहे. यावेळी डॉ. ठकसेन गोराने, विनायक सावळे, विजय परब, उत्तरेश्वर बिराजदार, सुधाकर काशीद, शहाजी भोसले, आरती नाईक, उत्तम जोगदंड, ॲड मनीषा महाजन, ॲड. परिक्रमा खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशोक खरात प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) पूर्णपणे निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी. कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३ या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्याची नियमावली तयार करण्याची रखडलेली प्रक्रिया शासनाने त्वरित पूर्ण करावी. प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथके तयार करून अशा प्रकारच्या भोंदूगिरीवर तात्काळ कारवाई केली जावी. अशोक खरातच्या या भयंकर शोषणाच्या प्रकरणात फलज्योतिष हे प्रमुख साधन म्हणून वापरले गेले. स्वतःला तो अंक आणि हस्तरेषाशास्त्राचा तज्ञ म्हणून मिरवत होता. प्रत्यक्षात फलज्योतिष ही मोठ्या प्रमाणावर लोकांची दिशाभूल करणारी बुवाबाजी आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यात फलज्योतिषाचाही समावेश करून त्यावर कायदेशीर नियंत्रण प्रस्थापित करावे. या प्रकरणातील सर्व पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात यावी. त्यांना कायदेशीर मदत, मानसोपचार आणि संरक्षण देण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करावी. साक्ष देणाऱ्या महिलांना पूर्ण सुरक्षा दिली जावी.आरोपी व्यक्तीचे विविध राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करून त्यांचीही चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबद्दल स्वतंत्र निवेदन करावे.सर्व राजकीय पक्षांनी तथाकथित बुवा-बाबा, मांत्रिक आणि ज्योतिषी यांच्याशी असलेले संबंध तात्काळ तोडावेत. अशा व्यक्तींना सार्वजनिक पाठबळ देणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्याची आचारसंहिता सर्व पक्षांनी तयार करावे.भारतीय राज्यघटनेने दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने व्यापक जनजागृती अभियान राबवावे. शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर विवेकवादी विचारांचा प्रसार करावा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ३ एप्रिल, शुक्रवार रोजी नाशिक येथे “फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद” आयोजित करण्यात येणार आहे. तसेच फलज्योतिषविरोधी महाराष्ट्रव्यापी संघर्ष यात्रेचे आयोजनही करण्यात येणार आहे.हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचा मुद्दा नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, सत्तेचा गैरवापर आणि महिलांवरील अत्याचार यांचा संगम आहे. त्यामुळे यावर केवळ तात्पुरती कारवाई नव्हे, तर दीर्घकालीन धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे.महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समिती स्पष्टपणे सांगते की श्रद्धा ही वैयक्तिक असू शकते; परंतु श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण, फसवणूक आणि अत्याचार हे गुन्हे आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाऊ शकत नाही.समाज, शासन आणि राजकारण या सर्वांनी मिळून अशा प्रवृत्तींचा निर्णायक अंत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, हीच महा अंनिसची ठाम भूमिका आहे, असे संजय बनसोडे यांनी सांगितले.

२९ मार्चला ठाण्यात ३० वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

२९ मार्चला ठाण्यात ३० वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा ठाणे- ठाणे जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळ, ठाणे यांच्या वतीने तिसावा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, २९ मार्च , दुपारी ४.०० ते ८.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा एन. के. टी. कॉलेज हॉल, खारकर आळी, ठाणे (प.) येथे पार पडणार असून, राज्यभरातील धनगर समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना एकत्र आणून योग्य जोडीदार निवडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वधू-वर, पालक व नातेवाईक सहभागी होणार आहेत.सदर मेळाव्याचे आयोजन  प्रमुख मार्गदर्शक  ॲड. नानासाहेब मोटे, अध्यक्ष डॉक्टर अरुण गावडे, खजिनदार रमेश तोंडे व चिटणीस सुनील राहींज यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली होत असून, ही माहिती संघटक प्रा. प्रमोद वाघमोडे यांनी जाहीर केली. या प्रसंगी प्रा. वाघमोडे यांनी समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, ‘राज्यस्तरीय वधू-वर मेळावा हा समाजातील एकोपा वाढवणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करावे.’ तसेच इच्छुक वधू-वरांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: सुरेश पिंगळे -९००४८९४२१२, बाळकृष्ण लवटे ९९६७५९१९५५

शहिद कॅप्टन विनयकुमार सचान यांना मिरवणूक द्वारे आदरांजली

शहिद कॅप्टन विनयकुमार सचान यांना मिरवणूक द्वारे आदरांजली कल्याण : येत्या मंगळवारी २४ मार्च रोजी डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी अभिवादन मिरवणुकीद्वारे आदरांजली वाहण्यात येणार आहे. शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील कॅप्टन विनयकुमार सचान या सचान कुटूंबातील सुपुत्राने देशहित रक्षणासाठी प्राण पणाला लावले. त्याला वर्षे पूर्ण होत आहेत. मंगळवार २४ मार्च या स्मृतीदिनी त्यांच्या स्मारकावर आदरांजली अर्पण करण्याकरिता सकाळी ठिक ८ वाजता वीर सावरकर वाचनालय एम.आय.डी.सी. निवासी विभाग येथे उपस्थित राहून तद्नंतर सचान यांच्या राहत्या घरी जावून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. तेथून दिव्यज्योत प्रज्वलीत करुन सर्वाच्या समवेत घरडा सर्कल येथील  कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकापर्यंत मिरवणुकीने ज्योत नेण्यात येणार आहे. शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानची स्थापना २०१० साली झाली असून यंदा त्यांच्या या उपक्रमाचे १६ वे वर्ष आहे. कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हे जागृत देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकावर स्मृतिगंधाच्या सुमनांची आदरांजली वाहण्याकरिता मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकूंद म्हात्रे यांनी केले आहे.

२०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट-गणेश नाईक

२०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट-गणेश नाईक अनिल ठाणेकर ठाणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, २०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून, गायमुख ते फाऊंटन दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच पेण येथे “तिसरी मुंबई” विकसित करण्यात येणार असून, या प्रकल्पातून सुमारे १२ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ऊर्जा क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यात MSEM केंद्र उभारण्यात येणार असून, यामुळे सुमारे ५० लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड मा के नाम’ या अभियानालाही चालना देण्यात येणार आहे.पालघर येथे आशिया खंडातील दहावे सर्वात मोठे बंदर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहितीही गणेश नाईक यांनी दिली. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा संपर्क मंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आधार देणारा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीला गती देणारा आणि महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेणारा आहे.गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.“मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना” सुरूच राहणार असून, यासाठी सुमारे २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०” अंतर्गत १६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होऊन १००% कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.राज्यातील जलसंपत्तीचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी विविध नदीजोड प्रकल्प राबवले जाणार आहेत. वैनगंगा-नळगंगा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, नार-पार-गिरणा आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्यातील मेट्रो नेटवर्क १२०० किमीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो-११, तसेच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. विविध द्रुतगती मार्ग, उन्नत मार्ग आणि ग्रीनफिल्ड महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक अधिक सुलभ व वेगवान होणार आहे.“महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना” अंतर्गत हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारले जाणार असून, ग्रामीण भागातील रस्ते आणि संपर्क व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्याद्वारे दुर्गम भागांना जोडण्यावर भर दिला जाणार आहे.या सर्व उपक्रमांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन विकासाला गती मिळेल, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार

मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार ‘सुरक्षेची खात्री, मगच प्रवासाची सुसाट भरारी’ – प्रताप सरनाईक मीरा-भाईंदर:  गेल्या दीड दशकापासून मीरा-भाईंदरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ते मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. ‘प्रवासाला थोडा विलंब झाला तरी चालेल, पण प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य नाही,’ असा ठाम विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काशीगाव मेट्रो स्थानकाची सविस्तर पाहणी केली. सुरक्षिततेची सर्व तांत्रिक प्रमाणपत्रे प्राप्त झाली असून, आगामी एप्रिल महिन्यात ही सेवा जनतेसाठी खुली होणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. एप्रिलमध्ये घुमणार मेट्रोची शिट्टी २००९ च्या निवडणूक वचननाम्यात दिलेले ‘मेट्रोचे वचन’ आज पूर्णत्वास येत असल्याने १५ वर्षांच्या संघर्षाचे फळ मिळत असल्याची भावना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. तसेच मेट्रोची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षा विषयक (Security Certificates) प्रमाणपत्रे मिळण्यास काही काळ लागल्याने उद्घाटनाला विलंब झाला, मात्र आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानकावरील आपत्कालीन यंत्रणा, दुर्घटना नियंत्रण कक्ष आणि प्रवासी सुविधांची बारकाईने पडताळणी केली. कोणत्याही संकटाच्या वेळी ही यंत्रणा सक्षमपणे कार्य करेल, याची त्यांनी खात्री केली. एका तासाला ४,५०० म्हणजे  दिवसाला जवळ जवळ ५० हजार प्रवाशांना या मेट्रो मार्गिकेमुळे दररोज सुखकर, वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण पूर्तता आणि पडताळणी आज स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते या मेट्रोचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रसंगी बोलताना मंत्री प्रतात्प सरनाईक म्हणतात कि, “मी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सुविधा देण्याला महत्त्व देत नाही, तर त्या सुविधेमध्ये माझ्या नागरिकांचा जीव सुरक्षित असण्याला माझे प्रथम प्राधान्य आहे. आज सर्व तपासण्या पूर्ण झाल्या असून एप्रिलपासून मीरा-भाईंदरकर मेट्रोचा सुखद प्रवास अनुभवू शकतील. वाचन दिले आणि ते पूर्ण हि केले. आता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास फक्त वेगवानच नाही, तर सुरक्षित आणि सुखकरही असेल”