आमदार कुमार आयलानी यांच्या उपक्रमाचे शहरात स्वागत; गरजूंना मोठा दिलासा

सुनील इंगळे
उल्हासनगर :उल्हासनगरात धीरज कुमार आयलानी यांच्या स्मरणार्थ ‘चार साहिबजादे एमआरआय आणि सीटी स्कॅन केंद्रा’चे भव्य उद्घाटन मंगळवारी सेंट्रल हॉस्पिटलजवळील अरुण कुमार वैद्य सभागृह (टाऊन हॉल) येथे करण्यात आले. गरीब व गरजू नागरिकांना परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, हे या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. कुमार आयलानी यांच्या लोककल्याणकारी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीना आयलानी, आरजू धीरज आयलानी आणि बिंदिया आयलानी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पूज्य मधुसूदनजी महाराज यांच्या हस्ते रिबन कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामार्फत एमआरआय फक्त १८०० रुपयांत, सीटी स्कॅन १००० रुपयांत, रक्त तपासणीवर ४० ते ५० टक्के सवलत तसेच औषधेही परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, पोलीस उपआयुक्त सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, टीएलआर राजेंद्र लोंढे, महापौर अश्विनी निकम, सेंट्रल हॉस्पिटलचे डॉ. मनोहर बनसोडे, उद्योगपती उद्धव रूपचंदानी, महेश अग्रवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चार साहिबजादे ट्रस्टचे चेअरमन सरदार गुरविंदर सिंग बावा, गुरु नानक खालसा कॉलेजचे प्रतिनिधी, पाटणा साहिब बोर्डाचे जसवीर सिंग धाम, श्री गुरु सिंग सभा इंदूरचे अध्यक्ष हरपाल सिंग मोनू भाटिया, मेहर सिंग रंधावा, डॉ. जसवीर कौर मक्कड़ (संचालिका, खालसा कॉलेज मुंबई) आणि डॉ. हरमीत सिंग सलूजा (सीईओ) यांचीही विशेष उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
