शिस्त, सलोखा आणि क्रीडाभावनेचा अद्वितीय संगम

कल्याण : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली २५ व्या ब्रह्मऋषी व्यासदेवजी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबई झोन अंतर्गत राजीव गांधी स्टेडियम, बेलापूर येथे १७, १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुंबईतील सेवादल क्षेत्र I ते VII, डोंबिवली, वसई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, खरसई (रायगड), नागपूर, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, चिपळूण आणि गोवा येथील एकूण २१ निवडक संघ सहभागी होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे निरंकारी सेवादल आणि श्रद्धाळू भक्तांमध्ये आध्यात्मिक चेतनेसह मानवी मूल्यांचा व क्रीडाभावनेचा विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे आयोजन केवळ स्पर्धात्मकतेपुरते मर्यादित न राहता, खेळाच्या माध्यमातून शिस्त, एकता आणि सलोखापूर्ण वातावरणाची निर्मिती व्हावी, या दिव्य हेतूने सन २००० मध्ये बाबा हरदेव सिंहजी यांनी मुंबई येथे या क्रिकेट स्पर्धेची पायाभरणी केली. सुरुवातीला सन २०११ पर्यंत ही स्पर्धा केवळ मुंबई परिक्षेत्रापुरती मर्यादित होती; परंतु सन २०१२ पासून या स्पर्धेचे महाराष्ट्रातील विविध झोनमध्ये आयोजन केले जाऊ लागले, ज्यामुळे अधिकाधिक सेवादल सदस्य आणि श्रद्धाळू भक्त या उपक्रमाशी जोडले गेले.
मंडळाच्या नेरुळ सेक्टरचे संयोजक वसंत गोड यांनी माहिती देताना सांगितले, की या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा, मेंबर इंचार्ज (वित्त व लेखा) जोगिंदर मनचंदा तसेच मेंबर इंचार्ज (प्रचार-प्रसार) मनमोहन छाबडा यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील. याशिवाय महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक आणि नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांची उपस्थितीही या सोहळ्याला अधिक विशेष बनवेल. निरंकारी स्पोर्ट्स कमिटी (महाराष्ट्र) तर्फे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापक आणि सुनियोजित तयारी करण्यात येत आहे.
हि स्पर्धा युवकांमध्ये आत्मिक जागरूकतेसोबतच मानवी मूल्यांचे संवर्धन तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार करणारे प्रभावी माध्यम ठरेल. या माध्यमातून सहभागी युवावर्ग दिव्य गुण आत्मसात करून केवळ संतुलित, सुंदर आणि यथार्थ जीवनच जगणार नाहीत, तर त्याचबरोबर आपल्या जीवनाचे वास्तविक मुख्य ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *