

ठाणे – श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने १०१ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३ व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संस्थेच्या क्रीडानगरीत पार पडले. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मनीष मुंदडा, चिटणीस रमण गोरे, उप चिटणीस संतोष सुर्वे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विशवस्त केशव मुकणे, विश्वस्त रवींद्र आंग्रे हे उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महिला आणि पुरुष गटातील सामने अत्यंत चुरशीचे व रंगतदार झाले. महिला गटात जय भारत स्पोर्ट्स क्लब खारेगाव (ठाणे), ज्ञानशक्ती युवा संस्था (ठाणे), टागोर नगर मित्र मंडळ (मुंबई उपनगर), रा फ नाईक नवी मुंबई (ठाणे), विवेक स्पोर्ट्स क्लब वसई (ठाणे) ह्या संघानी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, पुरुष गटात श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे),नंदकुमार क्रीडा मंडळ बदलापूर (ठाणे), भाऊ स्पोर्ट्स डुंगे (ठाणे), श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळ (मुंबई शहर), श्री हनुमान सेवा क्रीडा मंडळ कल्याण (ठाणे), शूर जवान क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), उत्कर्ष क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) ह्या संघानी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महिला गटातील अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात नवी मुंबईच्या रा फ नाईक मुंबई शहरच्या शताब्दी स्पोर्ट्स क्लब संघाचा ३४-३० असा ४ गुणांनी मात करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच रा फ नाईक संघाच्या रेखा चिकणे हिने अतिशय उत्कुष्ट चढाया करीत मध्यन्तराला २१-१४ अशी ७ गुणांची आघाडी घेतली. तिला आरती शेळकेने पक्कडीत सुंदर साथ दिली. मध्यन्तरानंतर शताब्दी स्पोर्ट्स क्लब संघाच्या नंदिनी मौर्या, संकष्टी वाळुंज यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती आपल्या संघाचा पराभव टाळू शकली नाही.
महिला गटातील दुरया सामन्यात मुंबई उपनगरच्या टागोर नगर मित्र मंडळाने ठाण्याच्या प्रेरणा कला केंद्र संघाचा २७-२३ असा ४ गुणांनी पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मध्यन्तराला टागोर नगर मित्र मंडळाने १७-०९ अशी ८ गुणांची आघाडी घेतली ती सानिका निमाणे, प्रतीक्षा भागवत यांच्या सुंदर खेळामुळे. पराभूत संघाकडून साधना यादव एकाकी लढली.
पुरुष गटातील पहिल्या सामन्यात ठाण्याच्या नंदकुमार क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या अमर ज्योत क्रीडा मंडळाचा ३४-२७ असा ७ गुणांनी पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मध्यन्तराला नंदकुमार क्रीडा मंडळाकडे १३-११ अशी २ गुणांची नाममात्र आघाडी होती. मध्यन्तरानंतर नंदकुमार क्रीडा मंडळाच्या निशांत मोरे, ओंकार खाडे यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली व सामना आपल्या संघाकडे झुकविला. पराभूत संघाकडून रोहित भोसले याने सुंदर खेळाचे प्रदर्शन केले.
पुरुष गटातील दुसऱ्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात अलहिदा डावात मुंबई उपनगरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने ठाण्याच्या विजय क्रीडा मंडळाचा ६-५ असा १ गुणांनी पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला. मध्यंतराला उत्कर्ष क्रीडा मंडळाकडे २०-१८ अशी नाममात्र आघाडी होती ती शाम व राकितेश यांच्या सुंदर लढायांमुळे. मध्यन्तरानंतर सामन्यात रंगत भरली ती विजय क्रीडा मंडळाच्या स्मित पाटीलच्या उत्कुष्ट खेळीमुळे. त्याने आमना संपायला ३ मिनिटे बाकी असताना खोलवर चढाई करीत ३ गुणांची कमाई करीत सामना आपल्या संघाकडे झुकवला. परंतु उत्कर्ष क्रीडा मंडळाने आपला अनुभव लावत सामना समसमान गुणांवर संपवला. अलहिदा डावात उत्कर्ष क्रीडा मंडळाने अतिशय शिस्तबद्ध खेळ करीत सामना १ गुणांनी जिंकला.
पुरुष गटातील तिसऱ्या सामन्यात ठाण्याच्या जय बजरंग क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या मुलुंड क्रीडा मंडळाचा अलहिदा डावात ८-५ अशी ३ गुणांनी पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
दिवसाचे उत्कुष्ट खेळाडू :
महिला गट : आरती शेळके (रा. फ. नाईक नवी मुंबई,ठाणे)
पुरुष गट : राकेश हेगडे (उत्कर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)
महिला गटातील अन्य निकाल :
ज्ञानशक्ती युवा संस्था, ठाणे वि. वि. स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (४७ – २८)
जय भारत स्पोर्ट्स क्लब खारेगाव,ठाणे वि. वि. भारतमाता स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर (१७ – ०५)
पुरुष गटातील अन्य निकाल :
जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद,ठाणे वि. वि. मुलुंड क्रीडा मंडळ,मुंबई उपनगर (३५ – ३२)
शूर जवान क्रीडा मंडळ,मुंबई उपनगर वि. वि. नवरत्न क्रीडा मंडळ,ठाणे (४५ – ४३)
उजाला क्रीडा मंडळ वळ,ठाणे वि. वि. नवरत्न मंडळ, मुंबई उपनगर ( ३६ – ३२)
