आठ वर्षांत ९,२८६ कोटींचा तोटा
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमावर आर्थिक संकट अधिकच गडद होत असून, गेल्या आठ वर्षांत झालेला तब्बल ९,२८६ कोटी रुपयांचा तोटा हा नैसर्गिक नसून ‘वेट लीज’ खासगीकरण मॉडेलमुळे पद्धतशीरपणे निर्माण झालेला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात बेस्टसमोर ३,००० कोटी रुपयांच्या संभाव्य तुटवड्याचे संकट उभे ठाकल्याने ३१ लाख मुंबईकर प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची बेस्ट बस आज व्हेंटिलेटरवर पोहोचली आहे,” अशी टीका करत संबंधितांनी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर ठेकेदारधार्जिण्या धोरणांचा आरोप केला. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका स्वतःची सार्वजनिक बससेवा संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा करण्यात आला.
सन २०१८ मध्ये बेस्टच्या मालकीच्या सुमारे ३,२०० बस होत्या. मात्र आज हा आकडा केवळ २४९ वर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वतःच्या बस खरेदी करण्यासाठी निधी नसल्याचे सांगितले जाते, मात्र ‘ब्युटीफिकेशन’च्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याची टीकाही करण्यात आली.
दरम्यान, खासगी कंत्राटदारांच्या बस वारंवार रस्त्यात बंद पडणे, अपघात होणे, तसेच कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. लाखो मुंबईकरांना रोज वेठीस धरणाऱ्या या खासगी व्यवस्थेला प्रशासनाचे संरक्षण मिळत असल्याचाही आरोप करण्यात आला. ‘अपयशी ठरलेले ‘वेट लीज’ मॉडेल तातडीने बंद करा. संबंधित अधिकाऱ्यांकडून याची सखोल माहिती घेतलीच पाहिजे’, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
-0000
