स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी
दिवा, दि. २७ मे : कडक उन्हाळ्यात दिवा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. उकाड्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत असून स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिव्यात वाढत्या वीज चोरीचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण येत असून त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पूर्ववत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे मोठ्या लोकवस्तीच्या भागासाठी एकाच ट्रान्सफॉर्मरवर भार असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती वारंवार करावी लागत आहे. दिव्यातील काही भागात दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याच्या वेळेतही वीजपुरवठा बंद होत असल्याने अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित वीज कंपनीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दिवेकरांकडून जोर धरत आहे.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *