गुरुदेव चौकातील धोकादायक ट्रान्सफॉर्मरची तक्रार; प्रशासन तातडीने हलले
पाहणीनंतर महावितरणला त्वरित दुरुस्ती व सुरक्षेचे आदेश
कल्याण : डोंबिवलीत करंट लागून महिलेचा मृत्यू आणि नेरूळ येथे उघड्या वीजतारा व पाण्यातील विद्युत प्रवाहामुळे दोन विद्यार्थ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेलजवळील संत रोहिदास महाराज चौकातील धोकादायक ट्रान्सफॉर्मरमुळेही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत तक्रारीची दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीने दुरुस्ती व सुरक्षेचे आदेश दिले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी संबंधित ट्रान्सफॉर्मरच्या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने पाहणीची मागणी केली होती. त्यानंतर केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, ‘क’ प्रभागाचे क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर ट्रान्सफॉर्मर परिसरातील धोका लक्षात घेऊन महावितरणला लेखी पत्राद्वारे उघड्या वीजतारा इन्सुलेट करणे, ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करणे आणि परिसर सुरक्षित करण्याचे निर्देश देण्यात आले.
रुपेश भोईर यांनी सांगितले की, डोंबिवली व नेरूळमधील दुर्घटनांतून धडा घेत पावसाळ्यात शहरातील सर्व उघड्या वीजतारा, ट्रान्सफॉर्मर आणि वीजखांबांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवितहानी टाळता येईल. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून महावितरणने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात उघड्या वीजतारा, तुटलेले वीजखांब किंवा विद्युत पेट्यांमधून स्पार्किंग दिसल्यास त्याची तात्काळ माहिती महावितरणला द्यावी, जेणेकरून वेळेत आवश्यक उपाययोजना करता येतील.
