– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी

आरती परब

दिवा : दिवा शहरातील वैभव हॉटेलच्या मागे असलेल्या ‘दत्त निवारा’ इमारतीच्या जिन्याचा आणि स्लॅबचा काही भाग रविवारी कोसळल्यानंतर येथील रहिवाशांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बाधित कुटुंबांना दिवा परिसरातील बीएसयूपी (BSUP) योजनेतील रिकाम्या घरांमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेकडे केली आहे.

रविवारी घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, इमारतीची रचना अत्यंत कमकुवत झाल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने रहिवाशांना इमारत तातडीने खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह अनेक रहिवासी सुरक्षित निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देत बाधित कुटुंबांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या आदेशाचा सन्मान राखत रहिवासी इमारत खाली करत असल्याने त्यांना दिवा परिसरातील बीएसयूपी योजनेतील रिक्त घरांमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

तसेच, इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आणि पुढील कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेसाठी ठाणे महानगरपालिकेने आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीमुळे बाधित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळणार का, याकडे दिवा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *