मॉल, निवासी टॉवर व्यावसायिक संकुल उभारणार
अनिल ठाणेकर
मुंबई, आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने आपल्या मालकीच्या २३ बस आगारांचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर पुनर्विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावातून मिळणाऱ्या निधीच्या आधारे बेस्टच्या ताफ्यात सुमारे पाच हजार नवीन बसेस समाविष्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बेस्टच्या मालकीच्या सुमारे १३२ एकर जागेवरील २३ बस आगार ३० ते ६० वर्षांच्या दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव आहे. या जागांवर मॉल, संग्रहालये, निवासी टॉवर, शॉपिंग कॉम्प्लेक्स, क्रीडा सुविधा तसेच इतर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रस्तावात कोलाबा, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, वडाळा, धारावी, शिवाजीनगर, वांद्रे, सांताक्रूझ, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, अणिक (सायन), प्रतीक्षा नगर, देवनार, माजगाव, ओशिवरा, मालाड, मरोल, दिंडोशी, गोराई, कांदिवली या २३ आगारांचा समावेश आहे.
बेस्ट समितीचे अध्यक्ष आर. गुप्ता यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पातून सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असून, त्याचा वापर नवीन बस खरेदी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केला जाणार आहे. मात्र, या प्रस्तावाला विरोधाचे सूरही उमटले आहेत. बेस्ट समितीचे सदस्य नितीन नंदगावकर यांनी आगारे खासगी विकासकांना भाड्याने देण्याऐवजी बेस्टनेच त्यांचा पुनर्विकास करावा, अशी भूमिका मांडली आहे. व्हर्सोवा आगारावर बेस्ट ने स्वतः मॉल उभारल्याचे तसेच कुर्ला आणि माहिम आगारांवर निवासी टॉवर विकसित झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले.
दरम्यान, हा प्रस्ताव सध्या मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मुंबईतील बेस्ट च्या अनेक प्रमुख आगारांचे स्वरूप बदलण्याची शक्यता असून, सार्वजनिक वाहतूक आणि शहरी विकास या दोन्ही क्षेत्रांवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.
००००००००००००
