वारकरी परंपरेतून पर्यावरण संवर्धनाचा जागर
सुनिल इंगळे
उल्हासनगर :आषाढी एकादशीच्या निमित्ताने एसएसटी महाविद्यालयाने आपल्या स्थापनेपासून सातत्याने जोपासलेली वृक्षदिंडी यंदाही भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि निसर्गसंवर्धनाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या वृक्षदिंडीस विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब क्षिरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत पोलीस अधिकारी व कर्मचारीही या जनजागृतीपर उपक्रमात सहभागी झाले.
महाविद्यालयाच्या संजीवनी सांस्कृतिक समिती, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), ग्रीन क्लब आणि डीएलएलई विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणींच्या प्रतिमेच्या पूजन व आरतीने झाली. त्यानंतर महाविद्यालयातून निघालेली वृक्षदिंडी नेताजी चौक व व्हीनस चौक मार्गे पुन्हा महाविद्यालयात दाखल झाली. मार्गभर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा जयघोष, टाळ-मृदंग, लेझीम आणि अभंगांनी परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ या संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर करत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘हरित पर्यावरण, सुरक्षित भविष्य’ असे संदेश देत जनजागृती केली.
यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. दिंडी पूर्ण झाल्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दरवर्षी आयोजित केली जाणारी ही वृक्षदिंडी आज एसएसटी महाविद्यालयाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनली असून, शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी, भारतीय संस्कृतीची जपणूक आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा उपक्रम उल्हासनगर परिसरात प्रेरणादायी ठरत आहे.
०००००
