महावितरण अधिकार्यांना दिले निवेदन
कल्याण : कल्याण नजीक मोहनेसह आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक राहुल कोट यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. परिसरातील वीज वाहिन्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांना वारंवारच्या वीज समस्येतून दिलासा मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्र. ०४ अंतर्गत मोहने, शनिवार पाटील नगर, यादवनगर, जेतवननगर, फुलेनगर, गाळेगाव, शिवसृष्टी तसेच आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना प्रचंड सनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसातून अनेक वेळा रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाळ्याच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होत असून, मुख्य वीजवाहिन्या, जंपर, इन्सुलेटर तसेच इतर विद्युत यंत्रणांची वेळेवर तपासणी व प्रतिबंधात्मक देखभाल होत नसल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पुढील आठवड्यात हवामान अनुकूल होताच दोन स्वतंत्र तांत्रिक पथके नियुक्त करून पॉवर हाऊस ते मोहने, आर. ‘स. गाळेगाव तसेच शिवसृष्टी ते आंबिवली रेल्वे स्टेशनपर्यंत संपूर्ण मुख्य वीज वाहिन्यांचे पेट्रोलिंग, जंपर तपासणी, नाडांच्या फांद्या छाटणे, सैल जोडण्या दुरुस्त करणे व आवश्यक ती प्रतिबंधात्मक देखभाल तातडीने करण्यात यावी.
हे काम तातडीने पूर्ण करून वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावा. अन्यथा नागरिकांच्या वाढत्या संतापाची व गैरसोयीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील असा इशारा नगरसेवक राहुल कोट यांनी दिला आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *