कल्याण : ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात विठ्ठल रुक्मिणी मंदिर आयोजित आषाढी वारीने या वर्षी तिसऱ्या वर्षात पदार्पण केले. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरा मधील रोजनबर्गमध्ये सकाळी सुरुवात झाली. सुमारे ४०० हून अधिक वारकरी साडे सहा मैलांचे अंतर तीन तास चालून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचले. आठ- दहा वर्षे वयाच्या मुला मुलींपासून ते वयाची ऐंशी वर्षे उलटलेल्या वृद्धांपर्यंत सर्वजण टाळ व वीणा यांच्या साथीने विठू नामाच्या गजरामध्ये पावलं टाकत होते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसोबत पताका, दंड, खांदेपालट करत दिंड्या मार्गक्रमण करत होत्या.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यावर ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या मोरया ढोलताशा पथकाच्या भोवती रिंगणामध्ये आणखी वारकरी सहभागी झाले आणि वारीच्या उत्साहाने वेगळीच उंची गाठली.  मंदिरातील महाआरतीच्या वेळी भक्तीचा पूर लोटला. यावेळी प्रफुल्ल खारकर, शिवानी खारकर व अक्षता खारकर कुटुंबाने बनवलेल्या रुचीपूर्ण प्रसादरुपी फराळाने सर्वांची क्षुधा शांत झाली. अनेकानेक स्वयंसेवक, भक्त, पुजारी यांच्यातील देवत्व अनुभवत आणि स्वतःमधील माऊली जागवत वारीचा सोहळा संपन्न झाला. या मंडळींना आता कार्तिकी वारीचे वेध लागलेले आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *