मुंबई : राज्यपाल महोदयांच्या निर्देशानुसार सातारा आणि पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागांचा एकात्मिक विकास प्रकल्प गतिमान करण्यात येणार असून, या ठिकाणी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अद्ययावत संकुल उभारण्यात येणार आहे. सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या संकुलाच्या माध्यमातून वीरपत्नी तसेच माजी सैनिकांच्या पत्नींनी स्थापन केलेल्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.
हा उपक्रम माजी सैनिकांच्या कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणारा राज्यातील पहिलाच एकात्मिक विकास प्रकल्प साकारला जाणार आहे, असे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज सातारा व पंढरपूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागाकडील जागेच्या एकत्रित विकासासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे (भा.प्र.से.), माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार (भा.प्र.से.), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे (भा.प्र.से.), उपसचिव विजय पोवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे माजी सैनिक कल्याण (पुणे विभाग) संचालक, सातारा जिल्हाधिकारी, सोलापूर निवासी जिल्हाधिकारी, पंढरपूर देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व सोलापूर जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी पंढरपूर येथे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवास, प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रशासकीय सेवा तसेच अन्य आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे सर्व सोयी-सुविधांनी युक्त अद्ययावत संकुल उभारण्याच्या प्रस्तावाबाबत सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सातारा व पंढरपूर येथील संबंधित जागांची सद्यस्थिती, जागांची तपासणी, उपलब्ध पायाभूत सुविधांचा आढावा तसेच दोन्ही विभागांच्या जागांच्या एकात्मिक विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली.
राज्यपाल महोदय यांचे निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या विकास प्रकल्पामध्ये पर्यटन विकासाबरोबरच माजी सैनिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, विभागांमधील प्रभावी समन्वय आणि वेळबद्ध कार्यवाही सुनिश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *