अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर (Collector Land) राहणाऱ्या कुटुंबांना जागा नावावर करून दिली जाणार
मिरा-भाईंदर : गुरुपौर्णिमेचे पावन पर्व, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मिरा-भाईंदरकरांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या जनहितकारी उपक्रमांचा भव्य शुभारंभ आज मिरा रोड पूर्व येथील पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात करण्यात आला. सदर आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आणि ‘कलेक्टर लँड (Collector Land) कायमस्वरूपी नाव नोंदणी मार्गदर्शन अभियाना’मुळे शहरातील हजारो नागरिकांना एकाच छताखाली मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ‘शासन आपल्या दारी आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी’ ही संकल्पना प्रत्यक्ष भूमीवर उतरवण्याचे काम या अभियानातून होत आहे.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रताप सरनाईक भावुक परंतु ठाम स्वरात म्हणाले कि, “अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर (Collector Land) राहणाऱ्या कुटुंबांसाठी हा केवळ जमिनीच्या कागदपत्रांचा किंवा टेक्निकल विषयाचा भाग नाही. हा त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, भविष्याला स्थैर्य देण्याचा आणि पिढ्यानपिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे १५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी जागा आता संबंधित रहिवाशांच्या कायमस्वरूपी नावे करण्याची प्रक्रिया आपण सुरू करत आहोत. तुमच्या वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला न्याय देण्यासाठी आणि तुमच्या निवाऱ्याला कायदेशीर आधार देण्यासाठी आमचे शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे!”
या शिबिरामध्ये मिरा-भाईंदरमधील नागरिकांना शासकीय जागेच्या कायमस्वरूपी नाव नोंदणीसाठी लागणारे अर्जाचे नमुने, नियम, अटी व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. महसूल विभाग व जिल्हा प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन विकास आणि लोककल्याण यांची सांगड घालून पुढे जात असल्याचे सांगत, १ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सर्व पात्र नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
