स्वराज्यभूमीच्या कामांना गती देण्याचे संकेत
मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी मुंबईतील टिळक स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकमान्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आश्विनी भिडे यांनी टिळकांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून ध्वजारोहण केले. यावेळी स्थानिक नगरसेविका स्नेहल तेंडुलकर आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांनी त्यांचा लोकमान्यांची पगडी आणि टिळकांचे चित्र-चरित्र देऊन सत्कार केला.
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन केले. कोणताही औपचारिक बडेजाव न करता त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त व स्मारक समितीचे सल्लागार यांनी विद्यमान आयुक्तांचे स्वागत केले.
यंदाच्या पुण्यतिथी कार्यक्रमात नागरिकांचा वाढता आणि उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळकांचे योगदान आणि त्यांनी दिलेला स्वराज्याचा संदेश आजही जनमानसात तितकाच प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दरम्यान, कार्यक्रमानंतर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी स्वराज्यभूमी स्मारक समितीच्या कार्यकारिणी सदस्यांना विधान भवनात चहापानासाठी निमंत्रित केले. यावेळी स्वराज्यभूमी स्मारकाच्या प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
