रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.कै. महेश बोभाटे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार २०२५ ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजित दळवी यांना, तर २०२६ चा पुरस्कार सुनील लवाटे यांना जाहीर करण्यात आला आहे. युवा क्रीडा पत्रकारांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा  कै.  आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार २०२५ बीबीसीच्या जान्हवी मुळे यांना, तर २०२६ चा पुरस्कार स्वदेश घाणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप रुपये १० हजार रोख, गौरवचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघाला ८४ वर्षांची समृद्ध परंपरा असून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याची परंपरा संघाने सातत्याने जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी संघातर्फे क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाचे हे नववे वर्ष आहे.
पुरस्कार विजेत्यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विशेष क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा पत्रकारितेच्या माध्यमातून खेळाडूंची कामगिरी, संघर्ष आणि क्रीडा क्षेत्रातील विविध घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविणार्‍या पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करणे हा या पुरस्कारांमागील प्रमुख उद्देश असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाने म्हटले आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *