ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरी शो इंडिया २०२६ मध्ये कुशल कारागिरांच्या कल्याणावर भर
मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील हॉटेल सहारा स्टार येथे ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरी शो इंडिया (JTGJS) २०२६ च्या २२ व्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले. ज्वेल ट्रेण्ड्झ आयोजित या सहा दिवसीय बी२बी प्रदर्शनात १५० हून अधिक आघाडीचे दागिने उत्पादक, १०० हून अधिक प्रदर्शक, तसेच १२ देशांतील ५,००० हून अधिक नोंदणीकृत किरकोळ विक्रेते आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले असून, भारतीय रत्न व दागिने उद्योगासाठी हे प्रदर्शन देशातील अग्रगण्य व्यावसायिक व्यासपीठ म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
यावेळी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, “रत्न व दागिने उद्योग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून देशाच्या निर्यातीत त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कौशल्य विकास, नावीन्य आणि उद्योजकतेच्या माध्यमातून या उद्योगाला आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. शाश्वत विकास आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या उद्योगामागे महाराष्ट्र शासन ठामपणे उभे आहे. लाखो कुशल कारागिरांचे कल्याण तितकेच महत्त्वाचे आहे. दागिने उद्योगातील कुशल कामगारांना आवश्यक आर्थिक सुरक्षा आणि संरक्षण मिळावे यासाठी सर्वसमावेशक विमा व सामाजिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने शासन उद्योग संघटनांसोबत सकारात्मकरीत्या काम करेल. उद्योगाच्या समस्या सोडवून त्याची दीर्घकालीन स्पर्धात्मकता अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरीचे गोविंद वर्मा म्हणाले, “JTGJS हे केवळ व्यापार प्रदर्शन नसून भारतीय रत्न व दागिने उद्योगाची ताकद, नावीन्य आणि जागतिक स्पर्धात्मकता अधोरेखित करणारे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील आघाडीचे प्रदर्शक सहभागी झाले असून सोने, हिरे, जडाऊ, टेंपल, अँटिक आणि फॅशन ज्वेलरी सह मौल्यवान रत्ने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, नाविन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स आणि आधुनिक दागिने उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले आहे.”
ज्वेल मेकर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जीवनलाल शाह म्हणाले, “भारतातील लाखो कुशल कारागीर हे रत्न व दागिने उद्योगाचा कणा आहेत. त्यांना योग्य ओळख, कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरण मिळाल्यास भारताचे जागतिक नेतृत्व अधिक मजबूत होईल. व्यापारी, खरेदीदार आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणावर झालेला सहभाग नव्या व्यावसायिक संधी निर्माण करेल आणि मुंबईची ‘भारताची ज्वेलरी कॅपिटल’ म्हणून ओळख अधिक दृढ करेल. महाराष्ट्रातील मालाड, बोरिवली आणि दहिसर परिसरातील हिरे उद्योगांमधून सुमारे दोन लाख हिरे कारागीर, दोन लाख सुवर्णकार आणि सुमारे एक लाख अन्य कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
आमची दृष्टी केवळ सोन्याच्या दागिन्यांपुरती मर्यादित नाही. चांदी, प्लॅटिनम आणि इतर मौल्यवान धातूंमधील आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे, कारागिरांचे सक्षमीकरण करणे आणि जागतिक रत्न व दागिने उद्योगात भारताचे नेतृत्व अधिक बळकट करणे हा आमचा संकल्प आहे.” पुढील सहा दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, निर्यातदार आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांना नेटवर्किंग, नव्या बाजारपेठांचा शोध आणि व्यावसायिक भागीदारीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. JTGJS २०२६ मुळे भारताचे जागतिक रत्न व दागिने व्यापारातील स्थान अधिक मजबूत होण्याबरोबरच मुंबईची ‘भारताची ज्वेलरी कॅपिटल’ म्हणून ओळख अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
००००
