वाहनांचा ताफा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न
हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल
कल्याण : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही अनेकदा नाव आलेल्या आरोपींनी किरकोळ वादाचे निमित्त करून थेट फिर्यादीच्या घरावरच गुंडांसह धडक देत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे वाहनांचा ताफा घेऊन आरोपी फिर्यादीच्या घरावर चाल करायला गेले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वारंवार गुन्हे करूनही अशा प्रवृत्तीवर लगाम का लागत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
हिललाईन पोलीस ठाण्यात  प्रवीण पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ फिर्यादी प्रवीण पवार हे घरी जात असताना आरोपी हरिदास पाटील याने त्यांच्या वाहनासमोर स्वतःचे वाहन उभे केल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर हा वाद मिटविण्याऐवजी आरोपीने आपल्या साथीदारांना पाचारण केले आणि थेट पवार यांच्या दारात प्रवेश केला होता. त्यानंतर काही वेळातच राम पाटील, विश्वास पाटील, सोरा पाटील, मधुर भंडारी, प्रेम भैरू यांच्यासह इतर साथीदारांनी थेट फिर्यादीच्या घरासमोर धडक दिली होती.
पवार यांना घराबाहेर येण्यास भाग पाडत शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर “जिवंत सोडणार नाही” अशी उघड धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही अशा सराईत गुन्हेगारांकडून खुलेआम कायद्याला आव्हान देणाऱ्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांची गुंडगिरी मोडीत काढावी, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल, अशी तीव्र प्रतिक्रिया उसाटणे परिसरातून व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश सुरेवाड करत आहेत.
000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *