आदिवासी भागातील ‘होमस्टे’मुळे स्थानिकांना रोजगार
हरिभाऊ लाखे
नाशिक: पावसाची एक सर कोसळली की नाशिककरांना वर्षा सहलीचे वेध लागतात. शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ, तर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा परिसरातील धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांनी फुलून जातात. या गर्दीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत असली, तरी आदिवासीबहुल भागातील स्थानिकांसाठी हा पावसाळा रोजगाराची नवी संधी घेऊन येत आहे. विशेषतः ‘होमस्टे’ संकल्पना, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांमुळे या भागातील पर्यटनाला वेगळी ओळख मिळत आहे.
उन्हाच्या कडाक्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या पहिल्याच सरी वर्षा सहलीचे निमंत्रण घेऊन येतात. यंदा जूनमध्ये तुरळक पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही काळ पर्यटनावर परिणाम झाला असला, तरी मुसळधार पाऊस, धबधबे आणि निसर्ग अनुभवण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. नाशिक शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ आणि इतर पर्यटनस्थळांवर दर आठवड्याच्या शेवटी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम मका कणीस, भुट्टा, वडापाव, कांदा भजी, खारे शेंगदाणे आणि फुटाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रांग लागते. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे.
त्र्यंबकेश्वरमधील आंबोली, वाघेरा घाट, कश्यपी धरण, हरसूलमधील दावलेश्वर, खैराई किल्ला, तसेच सुरगाणा परिसरातील भिवतास धबधबा, खोकविहीर येथील केळावण, तातापाणी, पिंपळसोड, भारुंडी आदी ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत आहेत. शहराच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या आदिवासीबहुल परिसरात नाशिकसह मुंबई, पुणे आणि परराज्यांतील पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. दिवसभर निसर्गाचा आणि जैवविविधतेचा अनुभव घेतल्यानंतर आदिवासी कुटुंबांकडून त्यांचा पारंपरिक पाहुणचार केला जातो. त्यामुळे या सहलींना केवळ पर्यटन नव्हे, तर ग्रामीण आणि आदिवासी जीवनशैलीचा अनुभव अशीही ओळख मिळत आहे.
नाशिकमधील काही पर्यटन व्यावसायिकांकडून या सहलींचे नियोजन केले जाते. त्याअंतर्गत आदिवासी बांधवांच्या घरांमध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. महिला बचत गटांकडून भोजनाची जबाबदारी सांभाळली जाते. पर्यटकांच्या पसंतीनुसार शाकाहारी किंवा मांसाहारी भोजनाची व्यवस्था केली जात असली, तरी बहुतांश पर्यटक शाकाहारी जेवणालाच पसंती देतात. भात, डाळ, उडीद डाळीचे भुजिया, नागलीची भाकरी, विविध रानभाज्या आणि स्थानिक पद्धतीचे पदार्थ यांचा समावेश असलेले अमर्यादित भोजन अवघ्या १२० ते १५० रुपयांत उपलब्ध करून दिले जाते.
