ॲग्री स्टॅक वर तात्काळ नोंदणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सिंधुदुर्ग : कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असून त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘फार्मर आयडी’ नसलेले१२०७ शेतकरी असून त्यांनी तातडीने ‘ॲग्रीस्टॅक ‘वर नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ नाही त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन केले आहे.
कर्जमुक्ती योजनेच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे जिल्हा सुकटे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रदीप मालगावे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ६५०० कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत ३७०८ आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यापैकी २१४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १५६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे यामध्ये १२०७ शेतकऱ्यांकडे ॲग्री स्टॅक/फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली
आधार प्रमाणे करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या ३७०८ शेतकऱ्यांचे याद्या संबंधित विकास सेवा संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत जिल्हा उपनिबंधक तसेच तालुका सहाय्यक निबंधक या कार्यालयांमध्ये याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत १एप्रिल २०१९ ते ३१,मार्च,२०२५ या कालावधीत वाटप केलेले अल्पमुदत पीक कर्ज, ३० सप्टेंबर,२०२५ रोजी थकीत आणि ३१,मार्च,२०२६ अखेर परतफेड न झाले असल्यास मुद्दल व व्याजासह अधिकतम दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे थकीत कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित बँक किंवा संस्थेला परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता ओटीएस अंतर्गत २ लाख रुपये पर्यंत चा लाभ मिळणार आहे तसेच २०२२-२३,२०२३ -२४ आणि २०२४ -२५ यातील आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली.
००००००००
