रमेश औताडे
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने ९ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मराठ्यांचे वादळ धडकणार असून आता आर या पार ची लढाई दिल्लीत लढणार. असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
मराठा समाज ३५ वर्षे संघर्ष करत आहे. मात्र न्यायालयीन कसोटीवर टिकेल असे कायमस्वरूपी आरक्षण देण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. वेळोवेळी सरकारने मराठा समाजाला आश्वासन दिले होते. प्रत्येक वेळी आनंदोत्सवही साजरा केला; मात्र आरक्षणाचा प्रश्न आजही कायम आहे. नानासाहेब जावळे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या भावना अधिक काळ दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे आम्ही सरकारला मुदत दिली आहे.
त्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होण्याअगोदर आरक्षणाचा योग्य निर्णय घ्यावा. सरकारने जर गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिले नाही तर, देशातील मराठा समाजबांधवांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. भीमराव मराठे, लक्ष्मण शिरसाठ, पंजाबराव काळे, राहुल पाटील आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
