अनिल ठाणेकर
ठाणे-मुंबईमध्ये गणेशमूर्ती आगमनाच्या वेळी मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील गणेशोत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने आगाऊ नियोजन करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते नजीब सुलेमान मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. यासोबतच गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांचे डिपॉझिट व भाडे माफ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईतील दुर्घटनेची पुनरावृत्ती ठाणे शहरात होऊ नये आणि गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे मुल्ला यांनी पत्रात नमूद केले आहे.
ठाणे शहरातील मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमन व विसर्जन मार्गांची महापालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाद्वारे तातडीने पाहणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्डे, उंच-सखल भाग, अर्धवट विकासकामे, झाडांच्या धोकादायक फांद्या, विद्युत वाहिन्या तसेच इतर अडथळे वेळीच दूर करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
मोठ्या व उंच गणेशमूर्तींच्या बाबतीत मूर्तीची लोखंडी फ्रेम, वेल्डिंग, सपोर्ट सिस्टिम, ट्रॉली, चाके, ब्रेक आणि अन्य वाहतूक व्यवस्थेची आवश्यक तांत्रिक तपासणी करूनच मिरवणुकीस परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मूर्ती वाहून नेताना योग्य सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान नागरिकांची अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी प्रमुख मार्गांवर टोचन वाहन, अतिरिक्त ट्रॉली, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवावे, अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.
विसर्जन घाटांवर मोठ्या गणेशमूर्तींसाठी आवश्यक क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था, सुरक्षित प्रकाशयोजना, बॅरिकेडिंग आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुंबईतील दुर्घटनेनंतर केवळ दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी ‘दुर्घटना होऊ नये’ यासाठी आगाऊ नियोजन करण्याची गरज असल्याचे मुल्ला यांनी पत्रातून अधोरेखित केले आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी वरील सर्व उपाययोजना पूर्ण करून संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. गणेशोत्सव हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असल्याने सुरक्षितता, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *