चिंचवड ( पुणे) येथील एस अरेना येथे शीख हेल्पलाइन फाऊंडेशन आणि हंड्रेड मास्टर्स बॅडमिंटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात समारोप झाला. स्पर्धेच्या अंतिम दिवशी विविध वयोगटांतील खेळाडूंनी उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोर्टवर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यांमुळे संपूर्ण वातावरणात उत्साहाचे वातावरण होते. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, भूतान, मलेशिया आणि सिंगापूर येथील सुमारे ४०० मास्टर्स खेळाडूंनी सहभाग घेतला. ४० ते ८५ वर्षे वयोगटातील खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा केवळ बॅडमिंटन स्पर्धा न राहता मैत्री, बंधुभाव, आरोग्य आणि सक्रिय जीवनशैलीचा सुंदर उत्सव ठरली.
विशेष म्हणजे, ८५ वर्षांवरील खेळाडूंनीही कोर्टवर उतरून आपल्या खेळाची जिद्द आणि उत्साह दाखवला. त्यांच्या सहभागाला उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विजेत्या खेळाडूंना हंड्रेड कंपनीच्या बॅडमिंटन रॅकेट्स, तर उपविजेत्या खेळाडूंना बॅडमिंटन किट बॅग देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक सहभागी खेळाडूला सहभाग प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
विविध गटातील विजेते
८०+ पुरुष दुहेरी : मनोज हसानी / मधु एन.
८०+ मिश्र दुहेरी : तुषार मुळे / शुभदा आर. पाटील
९०+ पुरुष दुहेरी : डॉ. राजेश रेकापल्ली / टी. व्ही. एन. राजेश
९०+ महिला दुहेरी : शैलजा / रोनेका
९०+ मिश्र दुहेरी : डॉ. राजेश रेकापल्ली / सुजाता शेट्टी
१००+ पुरुष दुहेरी : एस. चिलुकुरी / हर्षा गौडा
१००+ मिश्र दुहेरी : लेन्सी जॉन / रॉय
११०+ पुरुष दुहेरी : एस. चिलुकुरी / अरुण स्वामी व्ही.
११०+ महिला दुहेरी : शारदा संपत / लेन्सी
११०+ मिश्र दुहेरी : शैलजा आर. / शेखर यादव
१२०+ पुरुष दुहेरी : पंकज शाह / सतीश एम.
१२०+ महिला दुहेरी : लेन्सी जॉन / शारदा संपत
१२०+ मिश्र दुहेरी : रमेश गोलांडे / आरती वैद्य
१३०+ पुरुष दुहेरी : बिष्णू लाल श्रेष्ठ / एन. के. राणा
१३०+ महिला दुहेरी : सुलभा रविंद्र आपटे / ज्योत्स्ना पटवर्धन
१३०+ मिश्र दुहेरी : आनंद घाटे / शैलजा
१४०+ पुरुष दुहेरी : पारस सिरोहिया / अशोक शर्मा
१४०+ मिश्र दुहेरी : रमा गौतम / गुरबक्ष एस. जुनेजा
१५०+ पुरुष दुहेरी : सुधीर ए. वाटवे / अरुण दहिवाल
१५०+ महिला दुहेरी : नंदिनी नागराजन / श्यामोला खन्ना
१५०+ मिश्र दुहेरी : नंदिनी नागराजन / राकेश शर्मा
स्पर्धेचे आयोजक आणि शीख हेल्पलाइन फाऊंडेशनचे संस्थापक राज सिंह यांनी सांगितले, “ही स्पर्धा केवळ जिंकणे किंवा हरणे यापुरती मर्यादित नाही. विविध वयोगटांतील आणि विविध देशांतील खेळाडूंना एकत्र आणून मैत्री, बंधुभाव, आरोग्यदायी जीवनशैली आणि सक्रिय वृद्धत्वाचा संदेश देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. ४० ते ८५+ वयोगटातील खेळाडूंनी दाखवलेली ऊर्जा आणि जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे.” ते पुढे म्हणाले, “शीख हेल्पलाइन फाऊंडेशनच्या माध्यमातून मास्टर्स बॅडमिंटनच्या प्रवासात एक नवा इतिहास निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेतील प्रत्येक खेळाडू आमच्यासाठी विजेता आहे.”
या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्व खेळाडू, परदेशी व देशांतर्गत संघ, पंच, स्वयंसेवक, वैद्यकीय व फिजिओ टीम, तांत्रिक टीम, प्रायोजक, सहकारी आणि शीख हेल्पलाइन फाऊंडेशन व हंड्रेड मास्टर्स बॅडमिंटनच्या संपूर्ण टीमचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. “LOVE ALL, PLAY ALL” हा संदेश देत या स्पर्धेने बॅडमिंटनच्या माध्यमातून देश-विदेशातील मास्टर्स खेळाडूंमध्ये मैत्री, एकोपा आणि सकारात्मक जीवनशैलीचा सुंदर संदेश दिला.
