– पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
अशोक गायकवाड
मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग तसेच मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात झालेला सामंजस्य करार आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होत असून त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला. करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना एकूण ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर व गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. याच धर्तीवर इतर नामांकित संस्थांसोबतही सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर अधिकाधिक रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
00000
