– प्रजा फाउंडेशन कडून मुंबईतील आमदारांचा लेखाजोखा
रमेश औताडे
मुंबई : मुंबईतील आमदारांच्या विधानसभेतील कामगिरीचे धक्कादायक चित्र प्रजा फाउंडेशनच्या ‘मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड २०२६’ अहवालातून समोर आले आहे. १५ व्या विधानसभेतील मुंबईच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या १२व्या विधानसभेच्या तुलनेत तब्बल ७२ टक्क्यांनी घटली असून, प्रश्नांची गुणवत्ताही ५० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर घसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याच्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रजा फाउंडेशनने मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला. हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीतील मुंबईतून निवडून आलेल्या ३३ आमदारांच्या कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले आहे. आमदारांचा सभागृहातील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता आणि नागरिकांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व या बाबींचा अहवालात आढावा घेण्यात आला आहे.
अहवालानुसार, १५व्या विधानसभेत एकूण २,२१३ प्रश्न विचारण्यात आले. याउलट १२व्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन २००९ ते पावसाळी अधिवेशन २०१० या कालावधीत ७,९५५ प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण तब्बल ७२ टक्क्यांनी कमी झाले आहे. याचबरोबर आमदारांच्या कामगिरीचे सरासरी गुणही कमी झाले आहेत. १२व्या विधानसभेत मुंबईतील आमदारांची सरासरी ६१ गुण होती. ती १४व्या विधानसभेत ५४ पर्यंत घसरली आणि १५व्या विधानसभेत किंचित वाढून ५५ झाली. मात्र, प्रश्नांच्या गुणवत्तेची सरासरी १२व्या विधानसभेतील ५० टक्क्यांवरून १५व्या विधानसभेत केवळ ३३ टक्क्यांवर आली आहे.
00000
