रमेश औताडे
मुंबई : दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे.
कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही. अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून राहता कामा नये. दिव्यांग मंत्रालयाने तातडीने अनुदानास पात्र सर्व शाळांची यादी, पात्रतेचे निकष, प्रस्तावांची सद्यस्थिती आणि मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले.
0000000
