मुंबई: संत हारळे चैरिटेबल ट्रस्ट LIC पुरस्कृत यांच्या वतीने आयोजित ‘दहीहंडी मनसे सराव शिबिर २०२६’ भायखळा घोडपदेव येथे उत्साहात पार पडले. या सराव शिबिराला विविध गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला मनसे सरचिटणीस संजय नाईक, मनसे नगरसेविका सुप्रिया दळवी, नगरसेवक रमाकांत रहाटे, जगदीश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. या सराव शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते परशुराम क्रीडा मंडळाचे थरारक सादरीकरण. मंडळाच्या गोविंदांनी तब्बल ८ थर रचून ४ चंद्र लावण्याची दमदार कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांना सरावासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कलागुणांना आणि खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या शिबिरामागे होता. परिसरातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन मनसे विभागाध्यक्ष अमोल रोग्ये आणि विभाग सचिव महेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, आयोजक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे शिबिराला मोठे यश मिळाले.“एकजुटीची ताकद… मनसेची ताकद!” या घोषणेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
००००
