मुलींच्या निवासी परिसरात प्रशिक्षित तृतीयपंथीय सुरक्षा रक्षकांना संधी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
योगेश चांदेकर
पालघर: राज्यातील शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक २४ तास तैनात करावेत आणि मुलींच्या निवासी परिसरात विशेष बाब म्हणून पात्र व प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी कुटुंबापासून दूर निवासी स्वरूपात राहत असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांचे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा लेखापरीक्षण (Security Audit) करून विद्यार्थी संख्या, इमारती, प्रवेशद्वारे व परिसराची संवेदनशीलता लक्षात घेऊन आवश्यक सुरक्षा मनुष्यबळ निश्चित करावे, असे पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मुलांच्या आश्रमशाळा व वसतिगृहांत पुरुष सुरक्षा रक्षक तैनात करावेत. मुलींच्या निवासी परिसरासाठी विशेष बाब म्हणून इच्छुक व पात्र तृतीयपंथीय व्यक्तींची निवड करून त्यांना प्रशिक्षण, चारित्र्य पडताळणी, समान वेतन व सेवाशर्तींसह सुरक्षा रक्षक म्हणून संधी द्यावी, अशी अभिनव सूचना पंडित यांनी केली आहे.
“यातून आदिवासी विद्यार्थिनींची सुरक्षा अधिक सक्षम करण्याबरोबरच तृतीयपंथीय समुदायाला सन्मानजनक व नियमित रोजगाराची संधी उपलब्ध होईल,” असे पंडित यांनी म्हटले आहे. सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी आवश्यक सुरक्षा रक्षकांची संख्या, शिफ्टनिहाय गरज आणि वार्षिक आर्थिक भाराचा प्रस्ताव १५ दिवसांत तयार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *